संघर्ष आणि समर्पणाचा विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2019   
Total Views |


asf_1  H x W: 0


मुंबईच्या दि. १७ मार्च, १९३८च्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या सर्वसाधारण सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "गरिबांचा पक्ष गरिबांनी चालविला पाहिजे. कारण, गरिबांच्या व्यथेची जाणीव गरीब व्यवस्थित समजू शकतो." डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर गरीब, तळागाळातल्या समाजाचा आणि मुख्यत: कामगारांचा आवाज बुलंद करणारे कामगार नेते म्हणून विजय कांबळे यांनी यशस्वीरित्या आपली ओळख निर्माण केली. इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे राहावे या ध्यासाने झपाटलेल्या विजय कांबळे यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आढावा...


महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋण केवढे मोठे आहे! जो आमचा दीनदुबळा, गरीब-उपेक्षित आणि भयानक अशा अस्पृश्यतेच्या शापाने गांजलेला, पीडलेला माणूस आहे, त्याला या गर्तेतून वर काढण्याचे काम जर कोणी केले असेल, तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच. हा महामानव होता म्हणूनच एक 'विजय कांबळे' मागास दलित समाजातून उभा राहून हजारो कामगारांचे नेतृत्व समर्थपणे करू शकला." कामगार चळवळीचा अर्ध्या शतकाचा म्हणजे ५० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले विजय कांबळे सांगत होते. मूळ कराडच्या घोगावचे शिक्षक असलेल्या बाबुराव धोंडिबा कांबळे यांचे ते पुत्र. तसे विजय यांचे मूळ नाव विद्याधर! मात्र, कालौघात ते झाले 'विजय.' विजय यांनी रयत शिक्षणसंस्थेमधून शिक्षण घेतले आणि पुढे क्रीडा, साहित्य, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रांमध्ये विजय यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला.कामगाार क्षेत्रात आघाडीचे काम करणाऱ्या 'श्रमिक उत्कर्ष सभा' या कामगार संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष. त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपदही भूषविलेले. तसेच ते 'महाराष्ट्र कॅरम असोसिएशन'चेही अध्यक्ष. 'श्रमिक उत्कर्ष सभे'च्या माध्यमातून त्यांनी हजारो कामगारांचे प्रश्न रीतसर मार्गी लावले.

 

'चार दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा' हा बाबांचा संदेश विजय यांच्या अगदी रक्तात भिनलेला. डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळावी म्हणून विजय यांनी तन-मन-धन अर्पून संघर्ष केला. इंदू मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेबांचे भव्य स्मारक होणार आहे. याबद्दल बोलताना विजय म्हणतात, "इंदू मिलची जागा कोणत्याही सरकारने स्वत:हून दिली नव्हती. त्यासाठी आम्ही प्रचंड आंदोलने केली. ते स्मारक कसे असावे हे कोण ठरवणार? प्रशासनाने ठरवायचे का? या स्मारकासाठी आम्ही रक्त आटवले, त्यामुळे आम्हाला बाजूला टाकून, आमचे मत विचारात न घेता, हे जनतेला विचारात न घेता स्मारक निर्माण करण्याचा घाट घातला असेल तर, आंबेडकरी जनता याबाबत जाब विचारल्याशिवाय राहणार नाही." विजय यांचे म्हणणे बरोबरच आहे. कारण, या स्मारकासाठी जवळ जवळ दोन दशकं त्यांनी एकाकी लढा दिला. आज स्मारकासाठी जागा मिळाली, तर अनेक नागोबा आयत्या पिठावर रेघा मारायला आले. विजय यांची स्मारकाप्रतीची तळमळ जाणून घ्यायलाच हवी. नव्वदचे ते दशक होते. 6 डिसेंबर रोजी महामानव बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी समाजबांधवांचा महासागर लोटला होता. त्यावेळी विजयही पहाटेच चैत्यभूमीवर निघाले. रस्त्यावर एका कोपऱ्यातल्या नळाजवळ एक आजी उभी होती. आजी काय करत आहे पाहण्यासाठी विजय तिच्याजवळ गेले आणि म्हणाले, "काय करते आहेस आजी?" त्यावेळी वार्धक्याने वाकलेली, गरिबीच्या खुणा अंगोपांगी ल्यायलेली मात्र, बाबांना वंदन करण्यास आल्याचा सार्थ अभिमान सुरकुतलेल्या चेहऱ्यावर असणारी ती आजी म्हणाली, "काय नाय. गावातून निंगताना भाकरी घिटली होती संगट. आता कडक झाली. तिला पाण्यात भिजिवती म्हणजी मऊ व्हयील लेकरा." आजीचे हे शब्द ऐकून विजय यांचे काळीज हेलावून गेले. गरीब भोळी जनता, बाबासाहेबांना वंदन करायला येणारे हे बांधव कुठे राहत असतील, काय करत असतील, त्यांच्या हालाला पारावर नाही. त्याच क्षणी त्यांच्या मनात आले की, महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर येणाऱ्या बांधवांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे. त्यातूनच मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा अगदी योग्य होती, असे त्यांना वाटले.

 

'समता विचार मंच'च्या माध्यमातून विजयनी हा विषय महाराष्ट्रभर पोहोचवला. ३ हजार, २०० गावांमध्ये या विषयासंदर्भात त्यांनी सभा घेतल्या. इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी द्यायलाच हवी, ही मागणी जनसमुदायाकडून होऊ लागली. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात काँग्रस-राष्ट्रवादीचे सरकार होते. शरद पवार व्यासपीठावर विजय यांना प्रोत्साहन देत. मात्र, त्या सरकारच्या काळात इंदू मिलचे प्रकरण निकालात निघालेच नाही. उलट सत्ताधाऱ्यांकडून फसवणूकच होत होती. पण, विजय यांनी मात्र धीर सोडला नाही. ज्या महामानवाने समाजाला माणूस बनवले, त्या महामानवाचे स्मारक उभारायला हवे आणि तेही इंदू मिलच्या जागेतच, हे त्यांनी पक्के ठरवले. त्यांनी बाहेरगावहून स्थापत्त्यकार मागवले. भूमिमापन, स्मारक कसे असावे, याचा तंत्रशुद्ध आराखडा तयार केला. अशातच सरकार बदलले. भाजपच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली आणि विजय यांनी इंदू मिल आणि बाबासाहेबांच्या स्मारकाविषयी त्यांना सांगितले. मोदींनी शांतपणे ऐकून होकार दिला. काही काळाने इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिली गेली. आता स्मारकाचे काम सुरू झाले, तर त्या स्मारकाच्या तयारीसंदर्भातल्या बैठकीमध्ये विजय यांचा सहभाग असणे नीती आणि तत्वाला धरून योग्यच असते. पण तसे होताना दिसत नाही. विजय म्हणतात, "बाबासाहेबांचे स्मारक हा माझ्या जीवनाचा विषय आहे. या स्मारकासाठी प्राधिकरण लवकरात लवकर तयार करावे, जेणेकरून स्मारकाचे काम तत्परतेने आणि पारदर्शीपणे होईल. मी बाबासाहेबांच्या स्मारकाचा आराखडा बनवला आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून आणि या आराखड्याद्वारे स्मारकाचे काम खूपच चांगले होईल." असे जरी असले तरी विजय अजूनही खूप आशावादी आहेत. असो, कामगार चळवळींमध्ये खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पेरले, ते विजय कांबळे यांनी...

 

सावध असा तुफानाची हीच सुरुवात आहे

कामगार आहे मी, तळपती तलवार आहे

 

कवी नारायण सुर्वे यांनी शोषण, अन्यायाविरुद्ध तळपणाऱ्या धारदार तलवारीसारख्या कामगाराचे वर्णन केले. असा तळपत्या तलवारीसारखे आणि तुफानासारखे झंजावाती व्यक्तिमत्त्व विजय कांबळेंना लाभले होते. ते म्हणतात की, "कामगारांच्या संघर्षात अनियंत्रित संपाचे हत्यार उपसा. कामगारांना घरी बसवा. कंपन्या बंद पाडा. यात कुणाचे भले होणार? बौद्धिक कौशल्य वापरून कायद्याचा आणि समन्वयाचा आधार घेऊनही कामगारांना न्याय मिळवून देता येतो. त्यासाठी कामगारांचा बळी देणे हे योग्य नाही." त्याकाळी डॉ. दत्ता सामंत यांचा बोलबाला होता. कामगार नेते म्हणून त्यांचे एक प्रस्थ. डॉ. दत्ता सामंत आणि विजय यांच्यामध्ये चर्चा होत असे. त्यावेळी दत्ता सामंत म्हणत, "विजय, कामाची तुझी पद्धत बरोबर नाही. आपण हात टाकला की बघ तोडा, झोडा आणि संघर्ष करतो." यावर विजय म्हणायचे, "डॉक्टर, असे करून चालणार नाही. शेवटी कारखाना जगला तरच कामगार जगणार आहे, हे मला विसरून चालणार नाही." हे तत्त्व विजय यांनी आयुष्यभर जपले.

 

विजय हेसुद्धा त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात कामगारच होते. कुर्ल्याच्या प्रीमियम कंपनीत काम करताना कामगारांचे दु:ख त्यांनी प्रत्यक्ष भोगले होते. पुढे कामगार क्षेत्रातला अनुभव घेताना त्यांना समाजातल्या विकृतीचाही अनुभव कित्येकदा आला. कित्येकांनी त्यांचा वापर करून घेतला. त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला. पण, विजय डगमगले नाहीत. 'उडान पंखो से नहीं हौसले से होती हैं।' हा हौसला, जिद्द त्यांच्या रक्तातच आहे. त्यामुळेच त्यांनी नव्याने 'श्रमिक उत्कर्ष सभा' काढली. त्यावेळीही प्रतिस्पर्ध्यांनी त्यांना भरपूर त्रास देण्यास सुरुवात केली. अशा लोकांना विजय स्वत: भेटत आणि सांगत, "भाईगिरी, दादागिरी स्वत:च्या जीवावर करावी, भाडोत्र्यांच्या जीवावर नव्हे." त्यांच्याविरुद्ध कटकारस्थान करणारी लोक त्यांच्या बोलण्याने घाबरतही. कारण, 'अरे'ला 'कारे' म्हणण्याची आणि लाथेला ठोसा देण्याचे जिगर विजय यांच्याकडे आहे, हे त्यांना माहिती होते. पुढे इंदिरा गांधी, शरद पवार वगैरेंशी त्यांचा निकटचा संबंध आला. इतका की, लोक त्यांना शरद पवारांचा जीवलग मानू लागले. विजय यांनीही शरद पवारांसाठी जीवाचा कोट केला. पण, शरद पवार यांनी नेहमीच तळ्यात-मळ्यातच खेळ केला. कामगार संघटनेचे काम करताना कित्येक निर्णय कामगार विरोधी होत. त्यावेळी विजय हे शरद पवार स्वेच्छेने कामगारहित पाहतील, असे वाटत असे. पण, तसे कधीच घडले नाही. राष्ट्रवादीतल्या इतर वरिष्ठ नेत्यांनीही कामगारांच्या भल्यासाठी त्यांना तातडीचा फोन केला तर या नेत्यांनी कधीही फोन उचलण्याची तसदीही घेतली नाही, असे विजय दु:खाने सांगतात. पण, कुणी साथ दिली नाही म्हणून विजय डगमगले, थांबले नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मशाल घेऊन त्यांनी शोषित पीडितांच्या जीवनातला सर्व प्रकारचा अंधार दूर करण्याचे कार्य केले आणि आजही करत आहेत. त्यांच्या कामात सातत्य आहे, जीवनात अनेक वेळा यश-अपयश आले. मात्र, विजय यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरची निष्ठा कधी ढळली नाही की समाजाबद्दलचे प्रेम कधी आटले नाही.

@@AUTHORINFO_V1@@