चर्चला किंकाळ्या ऐकू येतील?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2019
Total Views |


agralekh_1  H x


दयासागर येशूचे नाव घेणारी सगळीच मंडळी अनुयायांच्या आयुष्यातील दुःख-दैन्य, पीडा दूर होईल, असा दावा करत फिरत असतात. त्यांच्या गोड-गोड बोलण्याला भुलणार्‍यांची संख्याही कमी-जास्त असतेच. पण हे वरवरचे झाले, आत काहीतरी विचित्रच चालू असते आणि त्याचीच झलक फ्रॅन्को मुलक्कलचे बलात्कार प्रकरण, साक्षीदार नन्सना दिलेल्या वागणुकीतून दिसते. अशावेळी मोठमोठ्या घंटांच्या घणघणाटात लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुली-महिलांच्या किंकाळ्या या लोकांना ऐकू येतील का?



देशभरात हैदराबादेतील डॉक्टर महिलेवरील सामुहिक बलात्कार व निर्घृण हत्याकांडानंतर संतापाची लाट उसळलेली असतानाच आणखी एक धक्कादायक वृत्त समोर आले
. धक्कादायक अशासाठी कारण हा प्रकार ज्यांनी कोणी केला त्यांचे बाहेर दाखवायचे मुखवटे वेगळे आहेत आणि प्रत्यक्षातले चेहरे निराळे. परंतु, मुखवटा गळून पडला तरी त्याच्या आतले चेहरे मुख्य माध्यमातून वेळेवर समोर येत नाहीत व त्यांचे उद्योग जसेच्या तसे सुरूच राहतात. गेल्यावर्षी केरळमधील एका ननने जालंधरच्या बिशप फ्रॅन्को मुलक्कलवर बलात्काराचा आरोप केला व नंतर हे प्रकरण पेटलेदेखील. बलाढ्य चर्च आणि ख्रिश्चन संस्था-धर्ममार्तंडांच्या विरोधात जात काही नन्स पुढे आल्या व त्यांनी फ्रॅन्को मुलक्कलविरोधात आंदोलनही केले. इतकेच नव्हे, तर त्यानंतर केरळसह इतरत्रच्या चर्चमधील पाद्य्रांचे एकेक प्रतापही उघड होत गेले, तेही तिथल्या नन्सच्या तोंडूनच. तसेच फ्रॅन्को मुलक्कलविरोधात नन्सनी तक्रार केल्याने पोलीस यंत्रणेने गुन्हे नोंदवून तपासही चालू केला, त्याला बेड्याही ठोकण्यात आल्या. परंतु, ‘शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता नये’चा लौकिक असलेल्या न्यायालयातून फ्रॅन्को मुलक्कलला जामीन मिळाला व तो उजळ माथ्याने फिरू लागला. आता जानेवारीच्या 6 तारखेपासून या प्रकरणावरील पुढील सुनावणी सुरू होणार असून त्यानंतरच बिशपच्या आयुष्यात ‘सजा आहे की मजा’ ते समजेल. हे झाले फ्रॅन्को मुलक्कलचे पण त्या नन्सचे काय, ज्यांनी आपल्यावरील अन्याय-अत्याचाराविरोधात चर्चच्या पुढ्यात उभे ठाकून एल्गार पुकारला? ज्यांनी आपल्या सहकारी स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत साक्ष दिली, त्यांचे काय झाले? पांढरा शुभ्र झगा घालून दयाळूपणाचा आव आणणार्‍या चर्च वगैरे संस्थांनी या नन्सबरोबर कोणते काळे उद्योग केले? नन्स आणि साक्षीदारांना कशाप्रकारे छळले? नुकतीच या सर्वच प्रश्नांच्या उत्तरांची ‘आप बिती’ बलात्कार प्रकरणातील साक्षीदार-सिस्टरनेच सांगितली व चर्च आणि त्यासंबंधीत संस्थांचे क्रौर्यही उघड झाले.



फ्रॅन्को मुलक्कलच्या लैंगिक शोषणादी कारनाम्यांची साक्ष देणार्‍यांत सिस्टर लिसी यांचे नाव प्रमुख होते
. पीडित नन्सनी फ्रॅन्को मुलक्कलने आपल्यासोबत केलेल्या विकृत चाळ्यांची माहिती सिस्टर लिसी यांना दिली होती व त्यावरुनच त्या मुख्य साक्षीदारही ठरल्या. पोलिसांसमोर जबाब नोंदवताना लिसी यांनी बिशपच्या कारवायांची पोलखोल केली व पीडित नन्सला न्याय मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. परंतु, त्यानंतर कॅथलिक चर्च, ख्रिश्चन संस्था आणि त्यातले कार्डिनल, बिशप्स, पाद्री वगैरे म्होरक्यांचे पित्त खवळले. त्यातूनच सुडाने चवताळलेल्या या लोकांनी सिस्टर लिसीला आधी केरळ सोडायला व दुसरीकडे कुठेतरी राहायला सांगितले. तथापि, त्यांनी केरळबाहेर जाण्यास नकार दिल्याने लिसीविरोधात शिस्तभंग, नियमभंग आणि आणखी कसल्या कसल्या ‘भंगा’ची कारवाई केली गेली. फ्रान्सिस्कन क्लॅरिस्ट कॉन्ग्रेगेशन-(एफसीसी)-धर्मसभेने सिस्टर लिसी यांना निलंबित केले. लिसी यांच्या चारित्र्यावर डाग लावण्यासाठी निवडलेली कारणेही मजेशीर होती-कार खरेदी करणे, ड्रायव्हिंग लायसन तयार करणे आणि पुस्तक प्रकाशित करणे! भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेल्या अधिकारांचा वापर करुनच लिसी यांनी हे सगळे केले, पण ते ख्रिश्चन धर्मसभेला रुचले नाही, त्यांनी त्याला अपराध ठरवले. पुढे लिसी यांना केरळमधील मुवत्तुपुझा येथील कॉन्व्हेंटमध्ये पाठवण्यात आले. पण इथले राहणेही सुखासुखी नव्हते तर ते नजरकैदेतले जिणे होते. कॉन्व्हेंटमध्ये आल्यापासूनच त्यांच्याशी सातत्याने वाईट व्यवहार केला जाऊ लागला. प्रचारक असलेल्या लिसी यांच्या बाहेर जाण्यावर बंदी आली, दैनंदिन प्रार्थनेवरही निर्बंध लादले गेले. कॉन्व्हेंटमधल्या कोणत्याही धार्मिक वा अन्य कार्यात त्यांना बाजूला ठेवले गेले. जणू काही वाळीत टाकले, त्यांच्यावर बहिष्कारच घातला म्हणा ना! हे सगळे का? कारण, कॉन्व्हेंटचे पाद्री बिशप फ्रॅन्को मुलक्कलच्या अतिशय जवळचे आहेत! म्हणजेच इथेही ओळखीचा बाजार, पण जिच्या आयुष्याचा कचरा केला ती व तिला न्याय मिळावा म्हणून साक्ष देणारी मात्र वाऱ्यावर!




अर्थात
, हे उद्योग इथेच थांबले नाही तर लिसी यांच्यावर साक्ष-जबाब बदलण्यासाठी दबावही टाकला गेला. चर्च आणि ख्रिश्चन संस्थांच्या वरिष्ठ लोकांनी लिसी यांनी फ्रॅन्को मुलक्कलविरोधात साक्ष देऊ नये म्हणून जंग जंग पछाडले. घालून पाडून बोलणे, अपमान-अवमान करणे तर नेहमीचेच झाले. परंतु, सिस्टर लिसी कोणत्याही दडपशाहीसमोर झुकल्या नाही, त्या आपल्या विधानावर ठाम राहिल्या. नुकतीच एका माध्यमाला त्यांनी मुलाखत दिली व मी माझा जबाब कधीही बदलणार नाही, अशी ग्वाहीही दिली. खरे म्हणजे चर्चसारख्या पैशाने, बळाने ताकदवान असलेल्या संस्थेविरोधात न्यायासाठी उभे राहिलेल्या सिस्टर लिसी यांचे कौतुक करायला हवे. पण त्याचवेळी चर्च आणि ख्रिश्चन संस्थांची यंत्रणा ‘आपल्या त्या बाब्या’ला वाचवण्यासाठी कशी काम करते हेही समजून घेतले पाहिजे. दयासागर येशूचे नाव घेणारी ही सगळीच मंडळी अनुयायांच्या आयुष्यातील दुःख-दैन्य, पीडा दूर होईल, असा दावा करत फिरत असतात. मोठमोठ्या प्रचारसभांच्या माध्यमातून आपले मोठेपण मिरवत आपली संख्या वाढवण्याचा प्रकारही करतात. त्यांच्या गोड-गोड बोलण्याला भुलणार्‍यांची संख्याही कमी-जास्त असतेच.




पण हे वरवरचे झाले
, आत काहीतरी विचित्रच चालू असते आणि त्याचीच झलक फ्रॅन्को मुलक्कलचे बलात्कार प्रकरण, साक्षीदार नन्सना दिलेल्या वागणुकीतून दिसते. छोट्या छोट्या गोष्टींवरून हे भंगले ते भंगले म्हणत शिक्षा देणारी चर्च, एफसीसीसारख्या धर्मसभा एखाद्या ननचे बिशप, कार्डिनल वा पाद्य्राने शीलभंग केले तर मात्र, त्याच्या बचावासाठीच काम करतात. त्यामागे बदनामीची, नाव खराब होण्याची भीती असते की आणखी कशाची हे ठाऊक नाही. परंतु, घरदार सोडून येशूच्या प्रार्थनेसाठी, सेवेसाठी येणार्‍या मुली-महिलांची मात्र चिंता नसते, हेच यातून स्पष्ट होते. जानेवारीच्या न्यायालयीन सुनावणीत कदाचित फ्रॅन्को मुलक्कलला शिक्षा सुनावलीही जाईल, पण केरळमधील बलात्कार प्रकरणाशी संबंधित चर्चेस, ख्रिश्चन संस्था, बिशप्स, कार्डिनल यांच्यावर त्या बडग्याचा परिणाम होईल का? मोठमोठ्या घंटांच्या घणघणाटात लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्यांच्या किंकाळ्या या लोकांना ऐकू येतील का? शेवटी, इतरांना चांगुलपणाचे पाठ शिकवणारे, पुरोगामी, विचारवंत आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटोंसारखे संवेदनशील व्यक्तिमत्त्व तरी या अन्यायाविरोधात एखादा शब्द काढतील का?

@@AUTHORINFO_V1@@