समाजोत्थानासाठी आधार एक यशस्वी 'योजना'

    05-Dec-2019
Total Views |
pAGE 4 _1  H x
 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "एखाद्या समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील महिलांची स्थिती पाहावी." मात्र, दुर्देवाने आपल्या समाजात महिलांच्या स्थितीत अजूनही काही सकारात्मक फरक पडलेला नाही. त्यामुळे मालेगावच्या शेतकरी कन्या आणि आता विवाहानंतर मुंबईत स्थायिक झालेल्या योजना ठोकळे यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी मुख्यत महिलांसाठी काम करण्याचे ठरवले. हे काम करताना योजना यांनी धम्माचा विचार कायमच अंगिकारला आहे. योजना ठोकळे यांनी आपल्या समाजकार्याचा उलगडलेला हा प्रवास...

 

मालेगाव विभागात खतविक्रीची 'आरसीएफ'ची माझ्याकडे एजन्सी आहे. त्यानिमित्ताने माझे कायम गावी ये-जा असायची. विरेंद्र ठोकळे यांच्याशी विवाह झाल्यानंतर मी तशी बर्‍यापैकी मुंबईत रूळले. पण, तरीसुद्धा गावातील जगणे, त्या आठवणी सदैव लक्षात राहतील. माझी आई विठाबाई आणि वडील नामदेव अहिरे हे गावातले आदर्श जोडपे. माझे गाव मालेगावमधील सोनजगाव. या गावात वडिलांची ४० एकर शेती. वडील गावातील राजकारणात सक्रिय होते. दोनदा ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यामुळे घरी गावकर्‍यांचे येणे-जाणे असायचे. घरचे वातावरण तसे संस्कारशील आणि सुसंस्कृत.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्माचे पालन कटाक्षाने करायलाच हवे, असा घरचा अलिखित नियम. माझे वडील बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक. ते आम्हाला बाबासाहेबांची जीवनगाथा सांगत. बाबासाहेबांच्या आयुष्यातले प्रसंग ऐकून कित्येकदा मला रडू कोसळे. बाबासाहेबांचा अभिमान वाटे. मनात रमाईंबद्दल प्रेम दाटून येई. माझे आजोबा निंबाजीबाबा यांच्या तर शब्दाशब्दांत बाबासाहेबांचे विचार. बाबासाहेबांनी येवल्याला जेव्हा सभा घेतली होती, त्यावेळी माझे आजोबा त्या सभेला हजर होते. त्यांनी बाबासाहेबांना जवळून पाहिलेले, एकलेले. तो किस्सा ते आम्हाला अभिमानाने सांगायचे. गावात वडिलांनी बुद्धविहाराचे उद्धाटन करायला आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांना आमंत्रित केले होते. त्यावेळी मी तशी लहान होते. पण, वडिलांनी मोठ्या हौसेने मला त्या कार्यक्रमाला नेले होते. त्या कार्यक्रमात बाबासाहेबांचे जीवनगान पुन्हा ऐकले. ते चरित्र मनात कायमच कोरले गेले.

 

त्यामुळे बाबासाहेबांचे विचार आयुष्यात जगण्याचा मला छंद लागला. समता, स्वातंत्र्यता, बंधुता ही मूल्य मी आजही अगदी कसोशीने पाळते, नव्हे ती सवयीतच जडली. तशी मी बंडखोर नाही, पण प्रत्येक परिस्थितीवर मात करायची हा विचार बाबासाहेबांमुळे मनात रूजलेला. त्यामुळेच विवाहानंतर शहरात आले, तेव्हा शहरी वातावरणाशी जुळवणे सुरुवातीला थोडे कठीण गेले. माझी बोली अहिराणी आणि सासरचे वातवरण 'फर्स्ट क्लास नेव्ही'चे. कारण, पती विरेंद्र नेव्हीमध्ये. साहजिकच सुरवातीला खूप न्यूनगंड निर्माण झाला. पण, मी ठरवले की ही परिस्थिती बदलायची. मी शहरी रितीरीवाज, भाषा, शिकले. माझे शिक्षण पूर्ण केले. सामाजिक क्षेत्रात, धम्मकार्यात काम सुरू केले. त्यातूनच माझे विचारविश्व विस्तारत गेले. संपर्क वाढला. शहरातील दुर्बल, शोषितांसाठी काम करणे हे मी ध्येय ठरवले.

 

'आधार महिला संस्था' २००७ पासून महाराष्ट्रभर कार्यरत आहे. संस्थेचे मुलुंड, घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर, कुलाबा अशा ठिकाणी कौशल्य विकास केंद्र सुरू केले. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीसारख्या वनवासीबहुल भागामध्ये वनवासी भगिनींसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू केले. इथल्या महिलांना शिलाई प्रशिक्षण, सौंदर्य प्रसाधनगृह, शेळीपालन, विद्युत वस्तूंची दुरूस्ती, याचे प्रशिक्षण दिले. प्लास्टिकवर बंदी आली आणि एकाएकी कापडी पिशव्यांचा भाव वधारला. त्यानंतर मग इगतपुरीच्या महिलांना कापडी पिशव्या शिवण्याचे काम मोठ्या प्रमाणात मिळाले. त्यातून त्यांचे चार पैसे सुटले. संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे, 'आधार' संस्थेने बार्टी, पुणे या संस्थेच्या सहयोगाने मुंबईतील रमाबाई नगरमध्ये केंद्र निर्माण केले. रमाबाईनगरमध्ये शहीद स्मारकामध्ये सध्या बार्टीच्या साहाय्याने 'आधार' संस्था समाजपयोगी उपक्रम राबविते. वस्तीतील अनुसूचित जातीजमातीच्या भगिनींसाठी विनामूल्य नर्सिंग प्रशिक्षण दिले जाते.

 

शेकडो भगिनींनी या उपक्रमाचा लाभ घेतला आणि आज त्या स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. एक महिला म्हणून मला नेहमी वाटायचे की, प्रशिक्षण घेतले किंवा हातात कला असली तरी त्याला संधी मिळायला हवी. कारण, नोकरीच नसेल किंवा उद्योगधंद्याच्या वाटाच नसतील तर प्रशिक्षणाचे काय करायचे? त्यामुळे महिलांना प्रशिक्षण देताना 'आधार' संस्थेने आधीपासून एक नियमच केला. समाजातील भगिनींना ज्या क्षेत्रात प्रशिक्षण देणार, त्या क्षेत्रामध्ये त्यांना स्वयंरोजगार अथवा नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच रमाबाईनगरमध्ये नर्सिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थिंनींना नोकरी मिळावी याची आधीच तरतूद केली. घाटकोपर आणि जवळपासच्या परिसरातील मोठ्या रुग्णालयांशी आम्ही संपर्क साधला. रुग्णालयांत काम करण्यासाठी परिचारिका हव्या असतील, तर आमच्याशी संपर्क साधा, अशी विनंती वजा आवाहन केले. त्यासाठी सातत्याने रुग्णालयांशी संपर्क ठेवला.

 

तसेच, आमच्या केंद्रातून प्रशिक्षित मुली प्रत्यक्ष नोकरी करताना किंवा स्वयंरोजगारावर उदरनिर्वाह करत असल्यास, कोणत्याही कारणाने अपयशी ठरू नयेत, यासाठीही आम्ही प्रयत्नशील असतो. कारण होते काय की, शिक्षण असते, प्रशिक्षणही पदरी असते; पण कुठेही काम करतानाचे उपयुक्त असणारे सामान्य ज्ञान, जगण्याची पद्धती जर उमेदवारांमध्ये नसेल, तर ते कुठेही टिकूच शकत नाही. त्यामुळे आमच्या केंद्रातल्या विद्यार्थिनींसाठी आम्ही व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचेही आयोजन करतो. तसेच त्यांचे वर्तमान घडामोडींचे ज्ञान, सामान्य ज्ञान योग्य असावे, यासाठी विविध कार्यक्रमही आवर्जून घेतले जातात. नुकताच आम्ही संविधान दिनही मोठ्या उत्साहात साजरा केला.

 

वस्तीतील विद्यार्थिंनींना आणि त्यांच्या पालकांना संविधानाची योग्य माहिती मिळावी म्हणून 'आधार' संस्थेने नुकताच एक कार्यक्रम राबविला. कारण, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला अखंड राखणारे आणि प्रगतीपथावर नेणारे संविधान आपल्याला दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "संविधान हा राष्ट्राचा धर्मग्रंथ आहे." त्या संविधानाचा जागर घरोघरी झाला पाहिजे. त्यामुळे संविधान दिनानिमित्त बार्टी सेंटर, रमाबाई नगर येथील विद्यार्थिंनींना संविधान उद्देशिकेची प्रत देण्यात आली, तसेच उद्देशिकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले.

 

या कार्यक्रमाला बार्टीचे संचालक कैलास कणसे, तसेच भाजप अनुसूचित जातीजमाती मुंबईचे अध्यक्ष मयुर देवळे, भाजप मुंबई महिला मोर्चाच्या शशीबाला टाकसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी योगिता साळवी यांनी संविधानाची रचना, व्याप्ती आणि संविधान देशासाठी कसे मौलिक आहे या विषयावर मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम या वस्तीमध्ये करणे गरजेचे होते. कारण, 'विद्रोहा'च्या नावाने आणि 'आंबेडकरी जलसा'च्या नावाने काही जण 'संविधान बदलले' किंवा 'संविधान हटविणार आहेत,' असे धांदात खोटे पसरवतात. त्यामुळे समाजामध्ये अस्थिरतेचे वातावरण तयार होते. संविधानाचे मूळ स्वरूप लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे होते. तो उद्देश या कार्यक्रमातून पूर्ण झाला.
 

ज्या क्षेत्रात फारशा महिला संस्था कारर्यरत दिसत नाहीत, अशाच एका क्षेत्रामध्ये 'आधार' संस्था काम करते. ते क्षेत्र आहे सार्वजनिक शौचालयाचे व्यवस्थापन. आधार संस्थेमार्फत एका सार्वजनिक शौचालयाचे व्यवस्थापनही केले जाते. शौचालयासोबतच वस्ती स्वच्छतेबाबतही संस्था काटेकोरपणे काम करते. तसेच माझे माहेर मालेगावचे. मी कृषिकन्या. आमची गावी शेती. मी सुद्धा लग्नापूर्वी शेतीत घाम गाळला आहेच. आजही गावी गेले की मला शेतीची कामे करायला आवडतात. त्यामुळे बळीराजाचे प्रश्न मी अगदी जवळून पाहिले आहेत, अनुभवले आहेत. आम्हा शेतकर्‍यांच्या घरचे सगळे सुखदु:ख पीकपाण्यावर अवलंबून. बरे पिकपाणी चांगले झाले तरी शेतमालाला चांगला बाजारभाव मिळेल, याची शाश्वती नाहीच. तर दुसरीकडे विवाह झाल्यावर मी शहरात येऊन याच्या विपरीत परिस्थिती पाहिली.

 

शेतातला ताजा भाजीपाला खाणारी मी. पण, इथे शहरात भाजी चांगली मिळतच नसे. एकदा रेल्वेने जाताना मी पाहिले की, सर्रास गटाराच्या पाण्यावर भाजीपाला पिकवला जात होता. पालेभाज्या होत्या. बहुतेक मुळा, मेथी असावी. नाल्याचे पाणी दुर्गंधीयुक्त आणि रसायनांनी भरलेले. तो दिवस मी विसरूच शकत नाही. वाटले की गावातली ताजी भाजी मिळाली तर? त्यातून मग 'आधार' संस्थेच्या सहयोगाने आम्ही 'शेतातला माल घरात' असा उपक्रम सुरू केला. त्यानुसार आमच्या मालेगाव, नाशिक परिसरातील शेतकर्‍यांसोबत एक करार केला. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा त्यांनी मुंबईत भाजीपाला घेऊन यायचे. इथे मी त्यांना भर बाजारात, चौकात लोकांना आणि त्यांनाही परवडेल अशा दरात भाजीपाला विकायचा. त्यांना भाजीपाला विकण्यासाठी संस्थेने जागाही उपलब्ध करून दिली. आमचा हा प्रयोग खूप यशस्वी ठरला. 'आधार' संस्थेने असे विविध आणि एकमेकांशी दुरान्वयेही संबंध नसलेले अनेक उपक्रम आजवर राबविले आहेत. हे सगळं मी करू शकले, कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची, संघर्षाची ऊर्जा माझ्या मनात कायमच आहे.



pAGE 4 _1  H x