बेवारस पार्थिवांवर अंत्यसंस्कार करणारा वारसदार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2019
Total Views |
ssss_1  H x W:


उल्हासनगर (शिवाजी वाघ) : काही व्यक्तींचे आपले काम आणि आपण एवढेच विश्व असते. मात्र, काही माणसे आपले कर्तव्य सांभाळत वेगळ्या वाटा निवडतात. आपल्या आयुष्याचे ध्येय निर्धारित करतात. अशीच एक व्यक्ती उल्हासनगर महानगरपालिकेत कार्यरत असून गेल्या २२ वर्षांपासून ते बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांचे अस्थिविसर्जन धर्मपरंपरांप्रमाणे करतात. त्यांनी आतापर्यंत तब्बल १५ हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

 

उल्हासनगरमधील दीपक वलेचा यांची कहाणी नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सिंधी भाषिक दीपक वलेचा यांचे कुटुंब फाळणीनंतर सिंध प्रांत सोडून उल्हासनगरात निर्वासित म्हणून स्थायिक झाले. त्यावेळी त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्याच काळात त्यांचे वडील प्रभूदास वलेचा यांना लकवा व हृदयरोगाच्या आजाराने पछाडले. होते. उपचारादरम्यान उल्हासनगरातील शासकीय रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. बिकट परिस्थितीमुळे वडिलांचे पार्थिव घरी घेऊन जायलाही त्यांच्याजवळ पैसे नव्हते. त्यावेळी एका टेम्पोवाल्याला विनंती करून वडिलांचे पार्थिव घरी आणले. मग अंत्यविधीचा प्रश्न निर्माण झाला. शेजारी, नातेवाईक यांच्याकडून कसेबसे पैसे जमा करून अंत्यविधी पार पडला. त्याचवेळी दीपक वलेचा यांनी निश्चय केला की, माझी आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यावर मयतांच्या गरजू नातेवाईकांना मदत करणार, तसेच बेवारस मृतदेहाचा अंत्यसंस्कार करणार.

 

कालांतराने दीपक वलेचा उल्हासनगर महानगरपालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून रुजू झाले. पगार कमी होता, पण सामाजिक कार्य करण्याचा निश्चय त्यांनी केला होताच. त्यांनी बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम सुरू केले. त्यांनी आपला मोबाईल क्रमांक उल्हासनगरातील शासकीय रुग्णालयांना दिलेला आहे. मयत बेवारस असल्यास रुग्णालय प्रशासन त्यांना कळवते व पुढील विधी दीपक वलेचा आपल्या स्वखर्चाने पार पाडतात. उल्हासनगरातील चारही समशानभूमीत बेवारस मयतांच्या अस्थी जमा करण्यात येतात. कधी तेथील कर्मचारी जमा करतात, तर कधी दीपक स्वतः जाऊन अस्थी जमा करतात. या सर्व अस्थी जमा करून ते त्र्यंबकेश्वर येथे घेऊन जातात. तेथे हिंदू धर्माच्या रितीनुसार पुजार्‍यांकडून अस्थी विसर्जित केल्या जातात.

 

अस्थी घेऊन जाण्यापासून तर पूजेला लागणारे साहित्य व पुजार्याला दक्षिणा देण्यापर्यंत सर्व खर्च आपल्या कमाईतून दीपक देतात. चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्यामुळे त्यांचा पगारसुद्धा तुटपुंजाच आहे. त्यातच कुटुंबाची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावर आहे. मग हाती घेतलेले काम पूर्ण कसे करणार? दीपक वलेचा आपल्या कधी आपल्या सर्व्हिस पीएफ फंड, तर कधी कर्मचारी पतपेढीतून कर्ज घेतात. एखाद्या वेळेस अचानक एखाद्या मयताचा नातेवाईक आल्यास पैसे खिशात नसतात. त्यावेळी उसने पैसे मागून वलेचा मदत करतात. गेल्या २२ वर्षांत त्यांनी तब्बल १५ हजार बेवारस मयतांचा अंत्यविधी व अस्थिविसर्जन केले आहेदीपक वलेचा यांच्या कार्याची दखल घेत त्यांना रोटरी क्लब, लायन्स क्लब, सिटी क्लब, सिंधू युथ संस्था व उल्हासनगर महानगरपालिकेच्या सभागृहाने त्यांचा सन्मान केला आहे. दीपक वलेचा यांच्या या कामाचे सगळ्यांकडून कौतुक केले जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@