नॅशनल पार्कमधील दृष्टिहीन 'कोयने'ला मिळाले पालक !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2019   
Total Views |

tiger_1  H x W:


राष्ट्रीय उद्यानाच्या 'वन्यप्राणी दत्तक योजने'ला बळकटी

 

मुंबई (अक्षय मांडवकर) - बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील 'कोयना' नामक मादी बिबट्याला पालक मिळाले आहेत. राष्ट्रीय उद्यानाच्या 'वन्यप्राणी दत्तक योजने'अंतर्गत मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या कुटुंबाने तिचे पालकत्व स्वीकारले आहे. 'कोयना' ही आठ वर्षांची मादी असून ती दृष्टिहीन आहे. या योजनेअंतर्गत समाजातील अतिमहत्त्वाच्या आणि प्रसिद्ध व्यक्ती वन्यप्राण्यांना दत्तक घेत असल्याने योजनेला बळकटी मिळत आहे.


tiger_1  H x W: 
 
 
 

गेल्या सात वर्षांपासून 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'मध्ये 'वन्यप्राणी दत्तक योजना' राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पिंजराबंद अधिवासातील म्हणजेच 'व्याघ्र-सिंह सफारी' व 'बिबट्या निवारा केंद्रा'तील प्राण्यांना दत्तक देण्यात येते. दत्तकत्वाचा कालावधी वर्षभराचा असतो. याकरिता राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून काही रक्कम आकारण्यात येते. यामध्ये दत्तक प्राण्याचा वर्षभराचा वैद्यकीय आणि उदरभरणाच्या खर्चाचा समावेश असतो. राष्ट्रीय उद्यानाच्या या योजनेमधील पालकांच्या यादीत आता मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर आणि त्यांच्या कुटुंबाचा समावेश झाला आहे. बिबिट्या निवारा केंद्रातील 'कोयना' नामक आठ वर्षांच्या मादीला बोरीकर परिवाराने दत्तक घेतल्याची माहिती व्याघ्र-सिंह सफारीचे अधिक्षक विजय बारब्दे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली. १ डिसेंबर रोजी १ लाख २० हजार रुपयांचे दत्तक मूल्य राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडे जमा करून बोरीकर परिवाराने 'कोयने'चे पालकत्व स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या महिन्यात प्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी येथील 'तारा' नामक मादीचे पालकत्व स्वीकारले होते.

 
 

tiger_1  H x W: 
 
 

कोयना अभयारण्यातून १ आॅक्टोबर, २०१२ रोजी ही मादी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाल्याची माहिती पशुवैद्यक अधिकारी डाॅ. शैलेश पेठे यांनी दिली. कोयना अभयारण्यातून आल्याने तिचे नामकरण 'कोयना' असे करण्यात आले. राष्ट्रीय उद्यानात दाखल झाल्यासमयी ती दृष्टिहीन आणि एक वर्षांची होती. अशा परिस्थितीत तिच्यासाठी नैसर्गिक अधिवासात तग धरणे शक्य नसल्याने तिचे पालनपोषण बिबट्या निवारा केंद्रामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या आठ वर्षांपासून ती निवारा केंद्रात नांदत असल्याचे, पेठे म्हणाले. सद्य परिस्थितीत राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट्या निवारा केंद्रात ९ बिबट्यांचे वास्तव्य आहे. त्यापैकी ७ बिबट्यांना दत्तक योजनेअंतर्गत पालक मिळाले आहेत.

 
 

वन्यजीवांची आवड असल्याने आमच्या कुटुंबाने 'कोयना' बिबट्याला दत्तक घेतले आहे. 'कोयना' दृष्टिहीन असल्याने दत्तक योजनेमध्ये आजवर ती दुर्लक्षित राहिली होती. त्यामुळे शाररिक दृष्ट्या उत्तम आरोग्य असणाऱ्या बिबट्यांना दत्तक घेण्यापेक्षा मानवतेच्या दृष्टीने आम्हाला तिला दत्तक घेणे अधिक योग्य वाटले. - मिलिंद बोरीकर, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@