'गुगल'मध्ये 'सुंदर' क्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2019   
Total Views |
google _1  H x



जगातील सर्वात बलाढ्य मानल्या जाणार्‍या 'गुगल'चे 'सीईओ' पद भूषविणे ही निश्चितच अभिमानाची बाब. मात्र, त्याच कंपनीचे पालकत्व असलेल्या 'अल्फाबेट' या कंपनीच्या सर्वोच्चपदावर विराजमान होणे ही त्याहूनही मोठी जबाबदारी आणि गौरवाचा क्षण...

दि. ४ नोव्हेंबर रोजी 'अल्फाबेट'चे संस्थापक लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन हे पायउतार झाले. त्यांची जागा आता 'गुगल'चे सीईओ सुंदर पिचाई घेणार आहेत. 'गुगल'मध्ये अंतर्गत बदलांनंतर निर्माण झालेल्या 'अल्फाबेट' कंपनीची पुढील जबाबदारीही आता पिचाई यांच्याच खांद्यावर राहील. मात्र, या सार्‍या घडामोडींनंतर सुंदर पिचाई यांचा 'गुगल'सोबत असलेला १५ वर्षांपासूनच प्रवासही तितकाच महत्त्वाचा ठरतो.

 

''गुगल'ने २०१५ मध्ये अंतर्गत बदल करत 'अल्फाबेट' स्थापन केली. 'अल्फाबेट' हा 'गुगल'च्या विविध कंपन्यांचा एक समूह आहे. या अंतर्गत 'वायमो' ही स्वयंचलित गाडी बनवणारी कंपनी, 'वेरीली' ही जैव विज्ञानासंबंधातील कंपनी, 'कॅलिको' ही आरोग्य संबंधातील प्रॉडक्ट कंपनी, 'लून' ही ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा देणारी कंपनी आदी कंपन्या या अंतर्गत येतात. हा 'गुगल'चा मूळ व्यवसाय नसला तरीही 'स्मार्ट' उत्पादनांची निर्मिती करणार्‍या कंपन्या म्हणून त्यांची ओळख आहे. आता या कंपन्यांमध्ये अंतर्गत बदलांचे कारण काय? ते आत्ताच का? याचा खुलासा खुद्द कंपनीनेही केला नाही आणि पायउतार होणार्‍या लॅरी आणि सर्गेई यांनीही केलेला नाही. कंपनीतील निर्णयात्मक अशा 'सीईओ' आणि अध्यक्ष अशा दोन पदांपासून दूर राहून कंपनीच्या भागदारीचा हिस्सा त्यांनी कायम ठेवला आहे. दोन्ही पदांची जबाबदारी आता सुंदर पिचाई यांच्याकडे असेल, हे स्पष्ट झाले.
 

पिचाई यांच्या काळातील 'गुगल'ची झालेली भरभराटही यावेळी महत्त्वाची ठरते. पिचाई यांच्या नेतृत्वात कंपनीचा महसूल गेल्या तीन वर्षांमध्ये ७४ टक्क्यांनी वाढला आहे. २०१५ मध्ये ६७.३९ अब्ज महसूल असलेल्या कंपनीचा महसूल ११६.३२ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. ४७ वर्षीय पिचाई यांनी स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी कंपनीतर्फे क्लाऊड, मोबाईल, सर्च आदी मंचावर कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. 'अल्फाबेट'च्या महसुलात 'गुगल'च्या व्यवसायात ८५ टक्क्यांची भागीदारी आहे. गेल्या चार वर्षांतील वाढता आलेख पाहता, 'गुगल'ने आपल्या एकूण प्रवासाच्या ८० टक्के नफा हा या काळातच दिला आहे. पिचाई यांच्याकडे दोन वर्षांपूर्वीच 'अल्फाबेट'चा कारभार हाती आला होता. त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांच्या जबाबदार्‍या वाढवण्याचा निर्णय कंपनीतर्फे घेण्यात आला.

 

'गुगल'वर गेल्या काही काळात गोपनीयता भंग आणि चुकीची माहिती पसरवणे, राजकीय मतभेद आदींपासून एका मोठ्या कंपनीला दूर ठेवण्यात पिचाई काहीसे यशस्वीही झाले. तरीही 'गुगल'वर सातत्याने आरोप होत राहिले. मात्र, मुळातच विनम्र असलेल्या पिचाई यांनी या सार्‍यातून स्वतःसहकंपनीला तारण्याचे काम यथायोग्य पार पाडले. पिचाई यांच्याकाळातील वाढलेली गुगलची लोकप्रियता आणि उत्पादनांची मागणी विलक्षणीय आहे. 'गुगल टुलबार', 'गुगल क्रोम' विकसित करण्यात पिचाई यांचा मोठा वाटा आहे.

 

२१ वर्षांपूर्वी केवळ 'सर्च इंजिन' म्हणून सुरू झालेल्या 'गुगल'कडे आता स्वयंचलित कार बनवण्याचेही तंत्र उपलब्ध आहे. 'अल्फाबेट'ची सर्वात मोठी उपकंपनी म्हणून 'गुगल' ओळखली जाते. 'गुगल मॅप्स', 'युट्यूब', 'गुगल-पे' आणि 'अ‍ॅड सेन्स' ही प्रमुख उत्पादने आहेत. या पसार्‍यात 'अल्फाबेट'चे १० पैकी ९ कर्मचारी हे फक्त 'गुगल'चे काम पाहतात. त्यामुळे पिचाई यांच्या नियुक्तीबद्दल तसे आश्चर्य व्यक्त करण्यासारखे काहीच नाही. या पदावर रुजू झाल्यानंतर पिचाई यांच्यासमोर मोठे आव्हान आहेत. 'वेयमो' आणि 'वेरिली' या कंपन्यांचा म्हणावा तितका विस्तार झालेला नाही. त्यांचा विस्तार तसेच इतरही आव्हाने पिचाई यांच्यासमोर आहेत. 'गुगल'ने आपल्या प्रतिस्पर्धकांना 'सर्च'मध्ये 'ब्लॉक' केल्याच्या प्रकारामुळे दंडही ठोठावण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 'गुगल'वर राजकीय भेदभाव केल्याचाही आरोप लावला आहे. कंपनीच्या कर्मचार्‍यांचा रोषही व्यवस्थापनाला भोगावा लागत आहे, असे अनेक प्रश्न पिचाई सोडवतील, अशी सदिच्छा!

@@AUTHORINFO_V1@@