कांदा आणखी रडवणार?

    04-Dec-2019
Total Views |

onion_1  H x W:


मुंबई : राज्यातील घाऊक बाजारात कांद्याची आवक घटल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा दर आता दीडशे रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. सुका कांदा काही ठिकाणी किलोमागे एकशे सत्तर रुपयांहून अधिक दराने विकला जात असून, घाऊक बाजारात ७० ते ९० रुपये किलोने मिळणारा ओला कांदा किरकोळ बाजारात शंभर रुपये किलोने विकला जात आहे. कांद्याची दरवाढ आणखी पंधरा दिवस राहण्याची शक्यता आहे. बाजारात उन्हाळी कांदा संपल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

यंदा पाऊस लांबल्याने कांदा शेतात सडला. काही उत्पादक साठवलेला उन्हाळी कांदा सध्या बाजारात पाठवत आहेत. त्यामुळे घाऊक बाजारातील जुन्या कांद्याला प्रतिकिलो १२० ते १० रुपये दर मिळत आहे.

तुटवडा भरून निघावा यासाठी केंद्र सरकारने तुर्कस्तानमधून १२ हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आणखी दहा ते बारा दिवस लागणार आहेत. याच काळात राज्यातील कांदा घाऊक बाजारात विक्रीसाठी मोठय़ा प्रमाणात येण्याची शक्यता आहे.


 


साठवणुकीच्या मर्यादेत बदल...

 कांद्याच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीच्या मर्यादेत बदल केला आहे. आता किरकोळ विक्रेत्यांना पाच टनांपर्यंत तर घाऊक विक्रेत्यांना २५ टनांपर्यंतच कांदा साठवता येणार आहे. खुल्या बाजारात कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आयात केलेल्या कांद्यासाठी ही मर्यादा लागू असणार नाही असं केंद्रीय ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी ट्विट करून सांगितले. यापूर्वी किरकोळ विक्रेत्यांना १० तर घाऊक विक्रेत्यांना ५० टन कांदा साठवण्याची परवानगी होती.