महापरिनिर्वाणदिनाबाबत मुख्यमंत्र्यांचा निरुत्साह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2019
Total Views |
bj_1  H x W: 0


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाविषयी निरुत्साही असून त्यामुळेच त्यांच्याच सरकारने ६ डिसेंबरच्या तयारीसाठी बोलावलेली बैठक मुख्यमंत्र्यांनी स्वतः घेणे अपेक्षित असतानाही ते गैरहजर राहिले, असा गंभीर आरोप बुधवारी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार भाई गिरकर यांनी केला. आपण स्वतः या बैठकीला उपस्थित होतो, पण काँग्रेस-राष्ट्रवादीचा एकही मंत्री या बैठकीत नव्हता असे ते म्हणाले. १९७८ पासून आजतागायत ठाकरे कुटुंबीयातील कोणीही चैत्यभूमीला मानवंदना देण्यास आलेले नाही, असा आरोपही गिरकर यांनी केला. यावेळी पत्रकार परिषदेस भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, सहमुख्यप्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते विश्वास पाठक उपस्थित होते.

 

भाई गिरकर पुढे म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादीचा डॉ. आंबेडकर यांना असलेला विरोध सर्वश्रुत आहे. काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना निवडणुकीत पाडले होते. त्यामुळे त्यांचे मंत्री चैत्यभूमीकडे दुर्लक्ष करतात. हे स्वाभाविक आहे. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी असे दुर्लक्ष करावे याचे आश्चर्य वाटते. येत्या ६ डिसेंबर रोजी दादर येथे चैत्यभूमीला सुमारे १५ लाख लोक भेट देतील असा पोलीस यंत्रणा आणि विविध संघटनांचा अंदाज आहे. या दिवसावर पावसाचेही सावट आहे.

 

असे असताना इतक्या मोठ्या तयारीसाठी स्वतःच्याच सरकारने बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी गैरहजर राहणे ही गंभीर चूक आहे, असे गिरकर म्हणाले. इतर मंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीला केवळ सुभाष देसाई हे एकमेव मंत्री उपस्थित होते. या बैठकीला महापालिकेची सर्व खात्यांचे प्रमुख, सर्व संबंधित सरकारी विभागांचे प्रमुख, पोलीस प्रमुख, रेल्वे पोलीस अधिकारी, रेल्वे अधिकारी तसेच अनेक संबंधित सामाजिक संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते निमंत्रित होते. हे सर्व जण या बैठकीस उपस्थितही होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही बैठक घेणे अपेक्षित असताना त्यांच्यासह सर्व मंत्री गैरहजर राहणे ही बाब गंभीर आहे, असे गिरकर म्हणाले.

 

भाई गिरकर यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस ६ डिसेंबरच्या चैत्यभूमीवरील कार्यक्रमासंदर्भात अनेक बैठका स्वतः घेत असत. स्वतः सर्व व्यवस्थांमध्ये लक्ष घालत. मात्र, नवीन मुख्यमंत्री ठाकरे याविषयात गंभीर नाहीत असे दिसते आहे. भाई गिरकर यांनी यावेळी असेही सांगितले की, शपथविधी झाल्यावर आज इतके दिवस झाले तरी मुख्यमंत्री ठाकरे यांना आणि त्यांच्या इतर मंत्र्यांना चैत्यभूमीवर जाण्यास वेळ मिळालेला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी झाल्यावर प्रथम चैत्यभूमीला भेट दिली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह या मंडळींनी पदग्रहण करताच चैत्यभूमीला भेट दिली होती, असेही गिरकर यांनी सांगितले.

 

स्व.बाळासाहेब ठाकरे हे १९७८ मध्ये चैत्यभूमीला भेट देऊन आल्यानंतर आजतागायत ठाकरे कुटुंबीयांपैकी कोणीही चैत्यभूमीला मानवंदना द्यायला गेलेले नाही. या विषयी दलित समाजात आक्रोश आहे, असे एका दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांने भर बैठकित सुभाष देसाई यांना ऐकवले अशी माहितीही भाई गिरकर यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतः या ६ डिसेंबरच्या तयारीत लक्ष घालावे आणि सर्वप्रथम चैत्यभूमीला स्वतः भेट द्यावी, असे आवाहन भाई गिरकर यांनी केले.

 
 
@@AUTHORINFO_V1@@