संघ विचारांचा प्रकाश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2019   
Total Views |


asf_1  H x W: 0


रा. स्व. संघाच्या जिव्हाळ्यातून प्रकाश यांचे आयुष्य उभे राहिले. त्या संघविचारांचे अमृतकण समाजमनात पेरणे, हेच ध्येय असलेले प्रकाश क्षीरसागर. त्यासाठी ते सध्या काम करत आहेत कुटुंब प्रबोधनाचे...


मला त्याचे नेहमी कौतुक वाटे, इतकी ऊर्जा त्याच्यामध्ये कशी येते कोण जाणे? रात्रभर नाटकाची तालीम करून तो सकाळी संघाच्या शाखेवर हजर असे. तो अंबेजोगाईच्या प्रभात शाखेचा कार्यवाह होता. तो काळ संघविरोधी. त्याचे वडील सरकारी नोकरीत. त्यामुळे त्याने संघासाठी इतके झोकून काम करावे, याच्या विरोधात त्याच्या घरचे. पण याची निष्ठा आणि कार्यतत्परता वाखाणण्यासारखी. त्याच्याकडे बघून मलाही हुरूप येई. कारण, माझ्याही घरात संघासाठी प्रचारक वगैरे निघण्यापेक्षा काम-धंदे करा असे वातावरण. तरीही मी प्रचारक म्हणून निघालेलो. मला त्यावेळी अशी ऊर्जा देणारा तो म्हणजे पुढच्या काळात भाजपचे नेतृत्व करणारे प्रमोद महाजन होय. प्रमोद आणि शरद हेबाळकर आम्ही एकमेकांचे त्याकाळचे सोबतीच. या दोघांकडून मला आयुष्यभर पुरेल इतकी ऊर्जा मिळाली. याचबरोबर माझ्या आयुष्याचे शिल्पकार म्हणाल तर दामूअण्णा दाते होय." कुटुंब प्रबोधन, रा.स्व.संघ, पश्चिम महाराष्ट्रचे प्रांत सह संयोजक प्रकाश क्षीरसागर सांगत होते. दामूअण्णांचे नाव घेताना प्रकाश यांचा स्वर दाटून आला. शिक्षक असलेले, तीन वर्षे संघ प्रचारक राहिलेले, बाबूजींच्या सावरकर सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित होताना स्वातंत्र्यवीर सावरकरांवर १००१ भाषण करणारे, अनुताई वाघांच्या कोसबाडच्या ग्रामबालशाळेत पत्नी कल्पनासह १० वर्षे स्वेच्छेने कार्य करणारे प्रकाश. आकाशवाणी दुरदर्शन यावर प्रकाश आज शैक्षणिक बाबींवर मार्गदर्शन करतात. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे लिखाणही उल्लेखनिय आहे. त्यांच्या समाज आणि साहित्य सेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. प्रकाश यांच्या आयुष्याचा आलेख म्हणजे संघ कार्यकर्ता आणि संघाचे नाते काय असते, हे सांगणारे एक भावविश्वच आहे.

 

मोहरी, तालुका- जामखेड, जिल्हा- अहमदनगरचे क्षीरसागर कुटुंब. भगवंत आणि कमलाबाई क्षीरसागरांना चार अपत्ये. त्यापैकी एक प्रकाश. भगवंत हे गावचे पोलीस पाटील. थोडी शेती-भाती. त्या जिरायती शेतीतून फारसे उत्पन्न निघत नसे. भगवंत हे संघाचे स्वयंसेवक. १९४८ साली रा. स्व. संघावर बंदी आली. त्या बंदीविरुद्ध संघस्वयंसेवकांनी सत्याग्रह केला. त्या सत्याग्रहामध्ये रामभाऊ म्हाळगींसोबत भगवंत यांनीही सत्याग्रह केला होता. देशप्रेम, समाजभान हे प्रकाश यांच्या रक्तातच. हे सगळे करत असतानाच भगवंत मुलांवर चांगले संस्कार कसे होतील, याकडे कटाक्षाने लक्ष देत. असो, मोहरी गावात चौथीपर्यंतच शाळा. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रकाश यांना त्यांच्या गोसावीकाकांकडे पुण्याला पाठविण्यात आले. तिथेही तशी आर्थिक परिस्थिती बेताची. या काकांचे घर उद्यमशील. त्यामुळे प्रकाश यांना पहाटे चार वाजता उठावे लागे. सगळे आटपून पाच ते नऊ ते दुधाची आणि पेपरची लाईन टाकत. घरी आले की गृहपाठ करत. शाळेत जात. तिथून आले की पुन्हा उद्योगाला लागत. हा उद्योग म्हणजे शेव-चिवड्याची पाकिटे बनवणे. ही पाकिटे बनवून किर्लोस्कर कंपनीच्या कँटीनमध्ये द्यायचे. काका आणि काकू प्रकाश यांना जीव लावीत. मात्र, दिवस कष्टाचेच होते. या काळात मनाला उभारी दिली ती संघ शाखेने. त्यावेळी पुण्याच्या भिडे वाड्याजवळ संघ शाखा लागे. प्रकाश त्यावेळी संघशाखेत जाऊ लागले. संघशाखेत मन लागण्याचे एक प्रमुख कारण होते ते म्हणजे दामूअण्णा दाते. आईवडिलांविना पुण्याला शिकायला आलेल्या प्रकाश यांच्यावर दामूअण्णांनी मायेचे छत्र धरले. पोटच्या पोरासारखी काळजी घेतली. प्रकाश यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या तालमीत प्रकाश घडत होते. पुढे दहावी पास झाल्यानंतर प्रकाश यांना वाटले की, आपण डीएड् करावे, शिक्षक व्हावे. पण त्यावेळी घरच्यांचा आग्रह झाला की नोकरी करावी. वडिलांनी प्रकाश यांना चिंचवडला एका कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून पाठवले. त्या काळी पुण्याहून चिंचवडला जाणे सोपे नव्हते. पण मनाविरुद्ध का होईना प्रकाश ते काम करू लागले. मन आक्रंदत असे कारण एक तर संघशाखा सुटली होती. दुसरे त्यांना शिक्षक व्हायचे होते, त्यांना या कामात अजिबात रस नव्हता. दिवस चालले होते. एके दिवशी कामाहून परतताना त्यांना स्टेशनवर दामूअण्णा भेटले. त्यांच्याभोवती घोळका होता. पण दामूअण्णांनी प्रकाश यांना आवाज देत विचारले, "कुठे आहेस? तू कामाला जातोस असे कळले. बरा आहेस ना?" त्यांच्या चौकशीने प्रकाश यांना रडू कोसळले. ते रडू लागले. दामूअण्णा त्यांना धीर देत इतकेच म्हणाले की, "रडू नकोस, शांत हो, संध्याकाळी मोतीबागेत ये."

 

प्रकाश दामूअण्णांना भेटले. शिक्षक व्हायचे आहे, मात्र मी आता कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण घेत आहे. कंपनीबरोबर तसा करार आहे. दामूअण्णा म्हणाले, कंपनीचा करार मोडून तू अचानक असे काम सोडू शकत नाहीस. मात्र,असे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न करून प्रकाश यांना त्या करारातून सोडवले. इतकेच नव्हे तर डीएड्च्या शिक्षणाची व्यवस्थाही केली. प्रकाश यांच्या जीवनातली अशक्य वाटणारी परिस्थिती बदलली. ती सुरुवात होती. पुढे शिक्षण घेतल्यानंतर ते अंबेजोगाईला शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यानंतरही समाजाची सेवा करता यावी म्हणून प्रकाश तीन वर्षे संघप्रचारक म्हणून राहिले. पुण्यात आल्यावर ते भाड्याने राहू लागले. याच दरम्यान एकदा दामूअण्णा घरी आले. ते चटकन म्हणाले, "प्रकाश किती दिवस भाड्याने राहशील, स्वतःचे घर घे." प्रकाश यांनी आर्थिक अडचण सांगितली. त्यावेळीही दामूअण्णांनी बँकेतून कर्ज मिळवून द्यायची मदत केली. आज पुण्यात प्रकाश यांचे प्रशस्त घर आहे. दामूअण्णांच्या प्रेमाची आणि संघशिक्षणाची प्रेरणा म्हणून या घरातली एक प्रशस्त खोली कायमच संघस्वयंसेवकांसाठी राखीव आहे. आज आयुष्याच्या या वळणावर कुटुंब प्रबोधनासाठी प्रकाश आणि त्यांची पत्नी अखंड कार्यरत आहेत. कुटुंब व्यवस्था निकोप राहावी, मुलाबाळांना नीट वळण लागावे, त्यातून चांगला समाज घडावा, हे प्रकाश यांचे ध्येय आहे. संघ विचारांच्या ज्योतीचा हा प्रकाश, समाजासाठी दीपस्तंभ आहे.

@@AUTHORINFO_V1@@