बाबरी मशिदीच्या उभारणीसाठी सरकारकडून पाच जागांचे पर्याय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2019
Total Views |



babari _1  H x



लखनौ
: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारने सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद उभारण्यासाठी मंगळवारी पाच जागांचे पर्याय सुचविले. अयोध्येतील पंचक्रोशी परिक्रमेच्या परिघाबाहेर मशीद उभारण्यासाठी सरकारने पाच जागा सुचविल्या आहेत. यासोबतच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगीसाठी या जागांची यादीदेखील पाठविण्यात आली आहे. यामध्ये अयोध्या-फैजाबाद महामार्ग, अयोध्या-वस्ती मार्ग, अयोध्या-सुलतानपूर मार्ग, अयोध्या-गोरखपूर मार्ग या जागांचा पर्याय बाबरी मशिदीसाठी देण्यात आला आहे. या जागा पंचक्रोशी परिक्रमेच्या परिघाबाहेर निश्चित करण्यात आल्या आहेत. हिंदू आणि मुस्लीम समाजाचे उत्सव एकाच वेळी आल्यास कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेऊनच या जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, सरकारने दिलेला प्रस्तावावर सुन्नी वक्फ बोर्डाकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.



अनेक वर्षांपासून प्रलंबित असणार्‍या रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाप्रकरणी ९ नोव्हेंबर
,२०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला होता. अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिरासाठीच देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तसेच मशिदीच्या उभारणीसाठी ५ एकर जागा देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने विरोध केला होता. मशिदीसाठी पर्यायी पाच एकर जमीन स्वीकारण्यासही विरोध असल्याचे मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस जफरयाब जिलानी यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे आता बाबरी मशिदींच्या उभारणीसाठी देण्यात आलेल्या पाचपैकी कोणत्या जागांच्या पर्यायांचा स्वीकार ते करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@