राष्ट्रवाद विरुद्ध जातवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2019
Total Views |

ag_1  H x W: 0



एकंदरीतच हा बुरखे फाटण्याचा मोसम अजून किती काळ चालणार हे पाहावे लागेल. कारण, यांचे बुरखे फाटून त्याची लक्तरे निघत नाहीत, तोपर्यंत यांना अस्सल मानणार्‍यांचेही डोळे खाडकन उघडणार नाहीत.


‘एनआरसी’च्या निमित्ताने सध्या देशात जे काही सुरु आहे, ते एका अर्थाने चांगलेच म्हणावे लागले. आपण अराजकाचे पांथस्थ नसलो तरी राष्ट्रजीवनाच्या प्रवाहात ज्या प्रकारचे अंत:प्रवाह वाहात असतात, ते कधी ना कधी स्पष्ट व्हावे लागतात. ते आता होत आहेत. ढोंगी मानवतावाद्यांचे रोहिंग्यांसाठी फुटणारे पान्हे कसे एकांगी आहेत, ते या निमित्ताने सिद्ध झाले. या सगळ्या प्रक्रिया ‘देश’ म्हणून संकल्पना मानणारे आणि न मानणारे अशांच्या सीमारेषा स्पष्ट करणार्‍या असतील. वस्तुत: या देशात दोन प्रकारच्या विचारधारा आहेत. एक आहे, ‘राष्ट्र’ ही संकल्पना मानणार्‍यांची, तर दुसरी आहे, ती कुठल्याशा परकीय संकल्पनांच्या आधारावर हा देश चालावा, अशा प्रकारच्या मनिषा बाळगणार्‍यांची.


अहिंसा
, मानवता, घराणेशाहीला विरोध, फॅसिस्ट शक्तींना विरोध अशा काही संज्ञा घेऊन ही मंडळी प्रवास करीत असतात. यातले त्यांना किती कळले, हा मोठा प्रश्न असल्याने त्यावर न बोललेले बरे. पण, या सगळ्या संकल्पना जेव्हा हिंदूंच्या बाबत विचार करण्याची वेळ येते, तेव्हा कशा विरळ होतात याचेच उदाहरण आता पेश होत आहे. या अराजक माजविण्याच्या काळात वर उल्लेखलेल्या संकल्पना किती दांभिक आहेत, याचा सामाजिक आणि राजकीय प्रत्यय येत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपपेक्षाही कडक शब्दांत फटकारून नंतर काँग्रेसवासी झालेले उद्धव ठाकरे हळूहळू आता पाठीचा कणा नसल्यासारखे वागू लागले आहेत.


याकूब मेमनसारख्या देशद्रोह्याच्या समर्थनासाठी स्वाक्षर्‍या देऊन त्याला फाशीची शिक्षा होऊ नये यासाठी प्रयत्न करणारा असलम शेख आताच्या या मंत्रिमंडळात
‘कॅबिनेट’ दर्जाचा मंत्री असेल. याकूबला वाचविण्याचे प्रयत्न करणारा हा इसम. आपण याकूबला वाचवू शकत नाही, याची त्याला पुरेपूर कल्पना होती. मात्र, आपल्या जमातीत तो मोठा होऊन बसला. याकूब मेमनचा मुंबईतल्या बॉम्बस्फोटातला हात स्पष्ट झाला होता. त्याच्यावर न्यायिक प्रक्रियेनुसार खटला चालवूनच त्याचा निकाल देण्यात आला होता. तरीसुद्धा त्याच्या जनाज्याचा तमाशा करण्यात आला आणि शेकडो मुसलमान या देशद्रोह्याच्या शेवटच्या प्रवासात सहभागी झाले.


याकूब मेमनचा जनाजा तेव्हा निघाला असला तरी शिवसेनेच्या ढोंगी राष्ट्रप्रेमाचा जनाजा आता निघाला आहे
. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हे तसेच लोक आहेत, याचा लोकांना परिचय होताच, आता शिवसेनाही त्यात सामिल झाली आहे. एकंदरीतच हा बुरखे फाटण्याचा मोसम अजून किती काळ चालणार हे पाहावे लागेल. कारण, यांचे बुरखे फाटून त्याची लक्तरे निघत नाहीत, तोपर्यंत यांना अस्सल मानणार्‍यांचेही डोळे खाडकन उघडणार नाहीत. आधी म्हटल्याप्रमाणे ज्यांना या देशात ‘राष्ट्रवादा’ची संकल्पना मान्य नाही, त्यांच्या ‘राष्ट्र’ म्हणून संज्ञा तोकड्या आहेत. त्या तोकड्या संज्ञा ‘राष्ट्रवाद’ म्हणून उपयोगी पडू शकत नाहीत. कारण, राष्ट्रवादाच्या संकल्पनेकडे परदेशी चष्म्यातून पाहण्याचे काम ही मंडळी करीत असतात.

स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी या संकल्पना आपल्याकडे रूजविल्यात, त्यांच्या मनावर राष्ट्रवादाच्या भलत्याच कल्पनांचे ओझे आहे. हिटलर किंवा यासारख्या अन्य कुठल्या तरी मंडळींचा राष्ट्रवाद म्हणजेच राष्ट्रवाद, असे त्यांना वाटते. त्याच कल्पनांतून झपाटून ही मंडळी राष्ट्रवादाच्या संकल्पेला विरोध करतात. भारतात दोन भारत नांदत असतात. एक आहे सांस्कृतिक भारत, ज्यामुळे गेली शेकडो वर्षे हा देश एकसंघ आहे. इथल्या यात्रा-जत्रा, मंदिरे, शंकराचार्यांनी निर्माण केलेले मठ. या सगळ्यामुळे हा देश एकसंघ राहिला. दुसरा आहे राजकीय भारत, जो एका अर्थाने स्वातंत्र्यानंतर आकाराला यायला सुरुवात झाली. खरे तर विचारवंत म्हणून मिरविणार्‍या या मंडळींनी देश स्वतंत्र झाल्यानंतर ‘नागरिकत्व’, ‘राष्ट्रीयत्व’ यांसारख्या संकल्पना स्पष्ट करायला हव्या होत्या आणि त्या या मंडळींनी केल्या नाहीत आणि काँग्रेसप्रणित जातीयवादालाच खतपाणी घालण्याचे काम केले.


निरोगी चर्चा या मंडळींना कधीच नको होत्या
. इतरांना असहिष्णू ठरविण्याच्या या मंडळींच्या अहमहमिकेमध्ये यांचा घाणेरडा चेहरा उघडा पडला. केरळमध्ये जे झाले ते याचेच प्रतीक होते. डाव्यांचे मुकुटमणी असलेल्या इरफान हबीब यांनी केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांच्या अंगावर धाऊन जाण्याचा पराक्रम नुकताच करून दाखविला. ही मंडळी मुसलमानांमध्ये भ्रम पसरवू शकतात, त्यांना रस्त्यावर उतरायला भाग पाडू शकतात. यांच्याशी चर्चा होऊ शकत नाही. उत्तर प्रदेश सरकारने ज्याप्रकारे यांच्याकडून वसुली करण्याचा दंडक निर्माण केला आहे, तसाच यांच्यासाठीही केला पाहिजे. केवळ दंगेखोरांना शिक्षा करून चालणार नाही, दंगेखोरांना खोट्या चिथावण्या देणार्‍यांकडूनही नुकसानभरपाई करून घेतली पाहिजे.


या सगळ्या प्रकाराला डाव्या पत्रकारांची गुपचूप फूसही आहे
. उत्तर प्रदेशात एका मौलवीला पोलिसांनी कसे चोपले, याची छायाचित्रे मुक्त माध्यमांवर पसरवली गेली. हातात प्लास्टर, डोक्याला बँडेज, पायावर जखमा अशा जाम्यानिम्यासकट हे महाशय डाव्या माध्यमांचे ‘पोस्टरबॉय’ झाले होते. पण, दुसर्‍याच दिवशी कोणीतरी या महाशयांचे पोलिसांवर दगड भिरकावतानाचे फोटो प्रकाशित केले आणि या सगळ्या प्रकरणातली हवाच निघून गेली. माध्यमे किती एकतर्फी असू शकतात, याचेच हे प्रतीक होते. तरी बरे, आता माध्यमांशी तोडीस तोड स्पर्धा करणारी समाजमाध्यमे आली आहेत. त्यामुळे सत्याचा सूर्य यांचा कोंबडा आरवला नाही तरीसुद्धा उगवायचा राहात नाही.

@@AUTHORINFO_V1@@