स्वकर्तृत्वाची ‘मनीषा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2019   
Total Views |

anchor_1  H x W



डोंबिवली : मूळच्या सावंतवाडीमधील तळवडे गावच्या असलेल्या मनीषा राणे या डोंबिवली शहरातील अत्यंत ओळखीचा चेहरा. कारण, मनीषा डोंबिवलीतील गरजू व गरीब महिलांसाठी आधार देणारी सावली ठरल्या आहेत.


डोंबिवलीतील महिलांसाठी ‘राणेताई’ अशी त्यांची एक आगळीवेगळी ओळख. एका गरीब व सर्वसामान्य घराण्यात जन्माला आलेल्या मनीषा यांच्या घरात आई-वडील, दोन भाऊ असे छोटे कुटुंब. मनीषा यांचे वडील शेतकरी. याशिवाय गावचे गावकर म्हणून मंदिरात ते गार्‍हाणी घालायचे. गावांमध्ये त्यांना खूप मान होता. त्यांची आई घरकाम करून त्यांचा उदरनिर्वाह करायची. त्यांच्या उत्तम पालनपोषणात आईचा महत्त्वाचा वाटा आहे. बिकट परिस्थितीमुळे त्या आपल्या आईला मदत करीत. त्यांनी आपले आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. नंतर त्या कळवा येथे पत्र्याच्या खोलीत राहावयास आल्या. काही वर्षांनंतर त्यांनी चिचोळी पाडा येथे भाड्याने घर घेतले.


या छोट्या खोलीत राहताना त्यांना १०० रुपये भाडे देणेसुद्धा कठीण होते. मात्र, त्यांनी याची झळ आपल्या मुलांना लागू दिली नाही. या कालावधीतच त्यांच्या नवर्‍याने अंबुजा सिमेंट उद्योग सुरू केला. यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली. मात्र, डोक्यावर कर्ज वाढतच होते. अनेक कर्जदार घरी येत. यामुळे एक गृहिणी, एक आई म्हणून त्यांचा संघर्ष सुरूच होता. दोन मुलांचे पालनपोषण व शैक्षणिक जबाबदारी यासाठी मनीषा कामासाठी घराबाहेर पडल्या. या काळात त्यांनी घरकामे करायला सुरुवात केली. त्यांनी दोन घरात घरकाम करण्यात करण्यास सुरुवात केली. या कामाचे त्यांना १६०० रु. मिळे, मात्र ते जीवन जगण्यासाठी त्यांनी पुन्हा धडपड सुरू केली. या दरम्यान त्यांची ओळख रवींद्र चव्हाण यांचे बंधू अजय चव्हाण यांच्याबरोबर झाली. अजय चव्हाण यांना मनीषा राणे यांची परिस्थिती कळल्यानंतर त्यांना तत्कालीन नगरसेवक रवींद्र चव्हाण यांच्याकडे कामासाठी विनंती केली. यानंतर मनीषा यांची समाजकार्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली.


रवींद्र चव्हाण मनीषा यांना त्यांच्या कार्यालयात काम दिले. याच दरम्यान आपण महिलांनी एकत्र येऊन काम केले तर अजून चांगले काम करू शकतो, असा विचार मनीषा यांच्या मनात आला. याच परिसरातील ओळखीच्या विलासिनी सावंत, रसना नाईक, त्रिंबककर, संपदा सामंत यांच्या मदतीने फंड चालवण्यासाठी सुरुवात केली. १०० रुपयांपासून सुरू झालेला फंड आता लाखांपर्यंत पोहोचला आहे. या फंडातील पैशाने अनेक गरजू महिलांना त्यांनी मदत केली.


परिसरातील समाजसेवक देवेन सोनी यांनी महिलांना कांदेबटाटे व इतर उपयोगी वस्तू विकण्यासाठी मदत केली. याचा उपयोग मनीषा राणे आणि त्यांच्या गटातील महिलांना झाला. आज अनेक महिलांना स्वत:च्या पायावर स्वाभिमानाने उभे राहण्यासाठी मनीषा राणे मदत करीत आहेत. आपल्या खडतर परिस्थितीतून त्यांनी मार्ग काढत दुसर्‍या गरजू महिलांनाही मदत करण्याचा विडा उचलला आहे. या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपले शिक्षण पूर्ण करू शकलो नाही, याची खंत मनीषा यांना होते. यामुळेच त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पुढील वाटचालीस मन:पुर्वक शुभेच्छा!

@@AUTHORINFO_V1@@