वीटभट्टी ते मुंबई विद्यापीठ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2019   
Total Views |


saf_1  H x W: 0


वीटभट्टीवर काम करणारा मजदूर ते मुंबई विद्यापीठाच्या 'बोर्ड ऑफ स्टडीज इन इंग्लिश'चे प्रमुख असा जीवनप्रवास असणारे डॉ. शिवाजी सरगर. त्यांच्या आयुष्यातले चढ-उतार निश्चितच विचार करण्यासारखे आहेत...


शिवाजी धोंडीराम सरगर. मूळ गाव ऐढे उपाळे, खानापूर, सांगली. पण, १९३० साली सरगर कुटुंब आजोळी आले, उब्रंज कर्‍हाड साताऱ्याला. त्यांच्या वडिलांचा पारंपरिक पेशा मेंढपाळाचा. पुढे त्यांच्या वडिलांनी हा व्यवसाय सोडला आणि मिळेल ते काम करू लागले.एरवी ते शेतमजुरी आणि गावातील बाजारातहमालीदेखील करायचे. धोंडीरामांची पत्नी सावित्रीबाई. सावित्रीबाईदेखील काबाडकष्टच करायच्या. या दोघांना दोन मुले आणि सहा मुली. चौथीपर्यंत शिवाजी नेमाने शाळेत जात. मात्र, चौथीला असताना शाळेच्या प्रफुल्ल कुलकर्णी या शिक्षकाने त्यांना बोलावले आणि सांगितले की, "उद्यापासून तू शाळेत यायचेच नाहीस. तुझ्या वडिलांना घेऊन ये." जवळ जवळ एक महिना असेच चालले. शेवटी धोंडीराम शाळेत गेल्यावर कुलकर्णी मास्तर म्हणाले, "तुमचा मुलगा हुशार आहे. या शाळेपेक्षा जरा मोठ्या आणि चांगल्या शाळेत हा शिकला तर याच्या हुशारीला वाव मिळेल." त्यांनी धोंडीराम यांना गळच घातली. त्यांचा आग्रह पाहून मग शिवाजींना रयत शिक्षण संस्थेच्या मोठ्या शाळेत घातले. शिवाजी म्हणतात, "कुलकर्णी मास्तरांची तळमळ किती! माझे भले व्हावे यासाठी त्यांनी केवढे प्रयत्न केले!"

 

शिकताना त्यांना इंग्रजीची गोडी लागली, ती गावातल्या पाटील सरांमुळे. ते हुशार मुलांसाठी मोफत इंग्रजीची शिकवणी घ्यायचे. दिवस जात होते. आठवीला गेल्यानंतर शिवाजी वीटभट्टीवर काम करू लागले. त्या काळात त्यांचे अभ्यासातून लक्ष उडाले. वाटू लागले, हेच जर आपल्याला करायचे आहे, तर मग का शिकावे? त्यांनी दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरलाच नाही. त्या काळात कवर नावाच्या त्यांच्या शिक्षकांचे बोलावणे आले. ते शिवाजी यांना म्हणाले की, "का रे शिवज्या, माज आला. परीक्षेचा अर्ज भरला नाहीस. गुपगुमान भर. पैसे नाहीत तर मी भरतो," असे म्हणून त्यांनी पैसेही भरले. त्यामुळे शिवाजींनीपरीक्षा दिली. ते उत्तीर्णही झाले. त्याच संस्थेच्या महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. पण, घरी आजूबाजूला शैक्षणिक वातावरणच नव्हते. परिस्थितीबाबत मनात अनेक प्रश्न उमटायचे. परिणामी, अकरावीला एक विषय राहिला. वडिलांनी त्यांना सांगितले, "शिक्षण सोड. मुंबईला नोकरी कर." त्यानंतर शिवाजी मुंबईला आले. नातेवाईकांच्या घरी राहून एका खाजगी कंपनीत पॅकिंगचे काम करू लागले. पण, मुंबईत त्यांचा जीव कोंडला. ते पुन्हा गावी परतले. येथील आयटीआयमध्ये 'बेंच फिटर'चा कोर्स करू लागले. इथे त्यांच्या अस्वस्थ मनात काहीतरी नवीन शिकण्याची ऊर्मी निर्माण झाली. त्यांनी पुढे कला शाखेचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पुढे शिवाजी यांना 'बजाज कंपनी'त नोकरी मिळाली. नोकरी करता करताच त्यांनी कला शाखेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्याचवेळी गावातीलचरयत संस्थेच्या महाविद्यालयामध्ये इंग्रजी विषयाच्या अध्यापक पदासाठी जागा रिकामी झाली. शिवाजी तिथे रितसर प्रक्रिया करून रूजू झाले. मात्र, महाविद्यालयात एक-दोघा 'मातब्बरां'नी प्रश्न उपस्थित केला की, "गावातल्या वीटभट्टीवर काम करणारा मुलगा इथे इंग्रजी शिकवणार?" त्यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी शिवाजी यांची बाजू उचलून धरली. कष्टातून शिक्षण घेत शिवाजी यांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले आणि आम्ही गुणवत्तेप्रमाणेच त्यांना नोकरी दिली, हे प्राचार्यांनी सप्रमाण सांगितले.

 

इथून पुढे २२ वर्षे शिवाजी रयत शिक्षण संस्थेमध्येच प्राध्यापक म्हणून ते काम करत होते. पुढे त्यांनी 'एक्सप्लॉयटेशन अ‍ॅण्ड प्रोटेस्ट इन आफ्रिकन, अमेरिकन अ‍ॅण्ड दलित ऑटोबायोग्राफी' या विषयावर एम.फिल आणि 'विद्रोहाचे सौंदर्यशास्त्र' या विषयामध्ये पीएच.डी केली. त्या काळात ते बदली होऊन पनवेल येथील महाविद्यालयात नोकरी करू लागले. त्यानंतर रितसर नियमानुसार अर्ज करून गुणवत्तेनुसार ते मुंबई विद्यापीठामध्ये २०१४ साली प्राध्यापक म्हणून काम करू लागले. याच काळात अरविंद मार्डिकर या संघ स्वयंसेवकाशी परिचय झाला. मार्डिकर विद्यापीठीय निवडणूक लढवत मुंबई विद्यापीठाच्या 'बोर्ड ऑफ स्टडीज इन इंग्लिश'चे प्रमुख झाले. "गावातून आलेल्या अध्यापकाने कधीही स्वत:ला कमी लेखू नये, तर आपण केलेला जीवनसंघर्ष हीच आपली ताकद आहे," असे मार्गदर्शन मार्डिकर शिवाजींना करायचे. त्या काळात शिवाजी प्राध्यापकांसाठीही काम करू लागले. २०१६ साली शिवाजी मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख झाले. २०१८ साली ते मुंबई विद्यापीठाच्या 'बोर्ड ऑफ स्टडीज इन इंग्रजी'चे प्रमुख झाले. त्यांनी जबाबदारीला योग्य न्याय दिला. पीएच.डी, संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भरपूर मार्गदर्शन देता यावे, यासाठीच शिवाजी यांनी दिवाळीच्या तसेचउन्हाळ्याच्या सुट्टीत दोन-तीन दिवस इतकीच रजा घेतली असेल. गरजू विद्यार्थ्यांना विद्यार्जनामध्ये, उच्च शिक्षणामध्ये कुठलीच अडचण येऊ नये, यासाठी ते सदैव तत्पर असतात. कर्मवीर भाऊराव पाटील त्यांचे आदर्श आहेत. ते म्हणतात की, "कोणतेही काम करताना त्यातून समाजाला थोडा तरी फायदा कसा होईल ते पाहा. मी आयुष्यात हेच केले. त्यामुळे समाज जोडला गेला. माझ्यासोबत उभा राहिला. त्यामुळेच आज इथपर्यंत आहे."

@@AUTHORINFO_V1@@