देशातील वनक्षेत्रात लक्षणीय वाढ ! : प्रकाश जावडेकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2019
Total Views |


dgf_1  H x W: 0

 


नवी दिल्ली : जगात मोजक्याच देशांच्या वनक्षेत्रात गेल्या काही वर्षात वाढ झाल्याचे पहावयास मिळाले आहे. त्यामध्ये आता भारताचाही समावेश झाला असून देशातील आता सुमारे २५ टक्के क्षेत्रफळ हे वनांनी आच्छादित आहे. गेल्या दोन वर्षात देशातील वनक्षेत्रात ५,१८८ चौरस किमीची वाढ झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वन, पर्यावरण, हवामानबदल आणि माहिती व नभोवाणी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी केले.

 

वन सर्वेक्षण अहवाल, २०१९ च्या प्रकाशनवेळी ते बोलत होते. देशातील वनक्षेत्राच्या सर्वेक्षणाचे काम भारतीय वन सर्वेक्षण विभागकडून १९८७ सालापासून करण्यात येते. त्याचा अहवाल दर दोन वर्षांनी त्याचा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. सन २०१९ सालच्या अहवालात भारतातील वनक्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यावेळी जावडेकर म्हणाले की, २०१४ ते २०१९ या कालावधीत देशातील वनक्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. त्याचप्रमाणे २०१७ च्या तुलनेत ५,१८८ चौरस किमीची वाढ झाली आहे.

 

विशेष म्हणजे सघन वनक्षेत्र, विरळ वनक्षेत्र आणि सामान्य वनक्षेत्र अशा तिन्ही श्रेणींमध्ये वाढ होणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे. देशातील कार्बन उत्सर्जनातदेखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, त्यामुळे परिस करारातील अटींचे पालन करण्यात भारत यशस्वी ठरणार आहे. गेल्या दोन वर्षात कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमधील वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील वृक्षावरणातही वाढ झाली असल्याचे जावडेकर यांनी नमूद केले.

@@AUTHORINFO_V1@@