मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी होणार आहे. यावेळी काही संभाव्य मंत्र्यांची नावे समोर येत आहेत. परंतु, यामध्ये बऱ्याच दिग्गज नेत्यांची नावे गायब दिसली. यामध्ये बरेच दिवस ज्या नावाची चर्चा होती ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. यांचे नाव मंत्रिमंडळाच्या मंत्रीच्या यादीत नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. अशोक चव्हाण की पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावांमध्ये स्पर्धा होती मात्र, यामध्ये अशोक चव्हाण यांची वर्णी लागली आहे.
याशिवाय समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, शेकापचे विधानपरिषदेवरील आमदार जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. शिवसेनेकडून पाठिंबा देणाऱ्या तिघा आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. परंतु काँग्रेस राष्ट्रवादीकडून मित्रपक्षांची नावे पुढे करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. तर राष्ट्रवादीकडून रोहित पवार यांचेदेखील नाव यामध्ये नाही. तसेच, संजय राऊत यांचे बंधू आणि विक्रोळीचे आमदार सुनिल राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे राऊतही नाराज असल्याचे म्हटले जात आहे.