तिढा उपांत्य फेरीचा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2019
Total Views |

vedh_1  H x W:

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २०१९ या सरत्या वर्षात उत्कृष्ट कामगिरी केली. काही सामन्यांचा अपवाद वगळल्यास भारतीय संघाच्या यशाची वाटचाल यंदाच्या वर्षी समाधानकारक राहिली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आगामी २०२०च्या वर्षात आणखी प्रगती करण्याच्या दिशेने भारतीय क्रिकेट संघ प्रयत्नशील राहणार आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. या टी-२० विश्वचषक स्पर्धेचा भारत हा एक प्रबळ दावेदार मानला जात आहे. दुसर्‍यांदा टी-२० विश्वचषक स्पर्धेचा मानकरी होण्यासाठी भारत प्रयत्नशील असून प्रत्येक दौर्‍यामध्ये टी-२० सामन्यांचे आयोजन आवर्जून केले जात आहे. या सर्व टी-२० मालिका भारत यशस्वीरित्या जिंकतही आहे. मात्र, भारताने या मालिका जिंकण्यासह बादफेरींचे आव्हान कसे मोडून काढता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत अनेक क्रिकेट समीक्षक सध्या व्यक्त करत आहेत. कारण, बादफेरीतील आव्हान मोडून काढण्यात अखेरच्या क्षणी भारताला अपयश येत आहे. त्यामुळेच तीन वेळा उपांत्य फेरीतून भारताला विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. २०१९च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यातच भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. इतक्या कमी धावसंख्येचे आव्हान असताना कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता की, भारत या सामन्यात पराभूत होईल. २३९ धावसंख्येचे आव्हान भारताला पेलता आले नाही. परिणामी, अवघ्या १९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. २०१६ साली घरगुती धरतीवर झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतही भारताला उपांत्य फेरीतूनच माघार घ्यावी लागली होती. वेस्ट इंडिजने अगदी शेवटच्या षटकात भारताचा पराभव केला आणि या स्पर्धेचे जेतेपद पटकाविले होते. इतकेच नव्हे तर २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेतही भारताला उपांत्य फेरीच्या सामन्यातच पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी तगड्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताला नमवले आणि विश्वचषक स्पर्धेवर आपले नाव कोरले. तीन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये भारताला केवळ उपांत्य फेरीच्या सामन्यांतूनच बाहेर व्हावे लागले आहे. त्यामुळे भारतीय संघाला हा उपांत्य फेरीचा तिढा सोडविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.


पुन्हा लंकादहन
!

नव्या वर्षात भारतीय संघ आपल्या घरगुती धरतीवर श्रीलंकेसोबत या वर्षातील पहिली मालिका खेळणार आहे. दरवेळीप्रमाणे यंदा कोणताही मोठा दौरा श्रीलंकेसोबत नसून केवळ तीन टी-२० सामन्यांची मालिकाच या उभय देशांत खेळविण्यात येणार आहे. २०२० साली ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर होणार्‍या आगामी टी-२० स्पर्धेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भारतीय धरतीवर खेळविण्यात येणार्‍या या टी-२० सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या श्रीलंकेपुढे आपले अस्तित्व सिद्ध करण्याचे आव्हान असेल. कारण फलंदाजीसाठी पोषक मानल्या जाणार्‍या भारतीय खेळपट्ट्यांवर खेळताना भारतीय संघाला नमवणे, हे प्रतिस्पर्ध्यांपुढे नेहमी आव्हानात्मकच राहिले आहे. क्रिकेटविश्वात तगडे मानले जाणार्‍या अनेक संघांना भारतीय संघाला या खेळपट्ट्यांवर नमवणे सहजासहजी शक्य झालेले नाही. तेथे सध्याच्या दुबळ्या श्रीलंकेचे अस्तित्व कसे टिकणार?, असा सवाल क्रिकेट समीक्षकांकडून विचारण्यात येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सध्याच्या श्रीलंकेच्या क्रिकेट खेळाडूंमध्ये ती क्षमता नाही, जी आधीच्या संघातील खेळाडूंमध्ये होती. सलामीवीर फलंदाज सनथ जयसूर्या, कर्णधार अर्जुन रणतुंगा, यष्टीरक्षक कुमार संघकारा, मधल्या फळीतील भरोसेमंद फलंदाज महेला जयवर्धने, तडाखेबाज तिलकरत्ने दिलशान आदी सर्व मोठे खेळाडू निवृत्त झाल्यानंतर सध्याच्या श्रीलंका संघातील एकही खेळाडू फॉर्मात नाही. पहिल्या दहा खेळाडूंमध्ये श्रीलंका संघाचा एकाही फलंदाज, गोलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडूचा समावेश नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत हा संघ कितपत चांगली कामगिरी करेल, असा प्रश्न आहे. इतकेच नव्हे तर विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर संघाचे नेतृत्व कोणत्या खेळाडूकडे सोपवायचे, हादेखील एक मोठा प्रश्न पाहुण्या संघापुढे आहे. संघात असलेले अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूज, थिसारा परेरा आदी खेळाडूंकडेही नेतृत्वाची जबाबदारी बोर्डाने सोपवली. मात्र, अनुभवी खेळाडूही फॉर्मासाठी झुंजत असल्याने नेतृत्व नेमक्या कोणत्या खेळाडूकडे सोपवायचे, याच विवंचनेत सध्या संघ व्यवस्थापन आहे. त्यामुळे या दुबळ्या संघाचा भारतीय संघापुढे निभाव तरी कसा लागणार, असा प्रश्न निर्माण झाला असून बलाढ्य भारतीय संघ पुन्हा एकदा लंकादहन करणार, हे नक्की!

- रामचंद्र नाईक 

@@AUTHORINFO_V1@@