१३० कोटींचा विचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2019   
Total Views |

vv_1  H x W: 0



डॉ. मोहनजी भागवत म्हणतात की, भारतात राहणार्‍या १३० कोटी लोकांना आम्ही ‘हिंदू’ समजतो, तेव्हा त्यात कसली विसंगती नसते. विद्वानांच्या व्याख्येप्रमाणे आणि त्यांच्या विश्लेषणाप्रमाणे समाज चालत नसतो. हिंदू समाज तर अजिबात चालत नाही.



हैदराबाद येथील भाग्यनगर येथे आयोजित ‘विजय संकल्प’ रॅलीत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे नुकतेच भाषण झाले. वृत्तपत्रांच्या सवयीप्रमाणे हे भाषण अनेकांच्या डोक्यावरून गेले. डोक्यावरून जाण्यासारखे या भाषणात खरं तर काही नाही. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत किचकट भाषेत बोलत नाहीत. झोप येणारे तात्त्विक भाषण करीत नाहीत. हा ‘विजय संकल्प मेळावा’ कशासाठी? ‘विजय संकल्प’ म्हणजे काय? ‘राक्षसी विजय’, ‘राजसी विजय’ आणि ‘धर्म विजय’ म्हणजे काय? आणि आपले काम ‘धर्म विजया’साठी कसे चालू आहे, हे त्यांनी अत्यंत साध्यासोप्या भाषेत सांगितले. वृत्तपत्रांचे काम जसे भाषण झाले तसे देण्याचे आहे. त्यातून विकृत अर्थ काढण्याचे नाही.



हे काम मुंबईतील एका प्रतिष्ठीत दैनिकाने केले आहे
. संपादकीय खालीच ‘धावते जग’ या सदरात या वृत्तपत्राने आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले,“या देशात राहणारे सर्व १३० कोटी लोक हिंदूच आहेत.” वृत्तपत्र म्हणते की, सरसंघचालकांनी असे विधान करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. सरसंघचालकांचे हे विधान वृत्तपत्राने ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’, ‘राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी’ आणि ‘राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी’ याच्याशी नेऊन जोडले आहे. सरसंघचालक आपल्या भाषणात म्हणाले,“विविधतेत एकता आहे, असे नसून एकतेत विविधता आहे.” हे वाक्य विद्वान वृत्तपत्र लेखकाला ‘संभ्रम’ निर्माण करणारे वाटले. सामान्य बुद्धीच्या वाचकाला मात्र हे वाक्य गहन अर्थ असलेले वाटते. “अशा विधानांवरून संघ बदलत असल्याचे किंवा संघाची भूमिका व्यापक होत असल्याचा अभास निर्माण होऊ शकतो, वगैरे वगैरे.”



संघ बदलत आहे
, संघाची भूमिका व्यापक होत आहे, हे सर्व सेक्युलर पुरोगामी शोध असतात. १९२५ साली संघ सुरू झाला. तेव्हा जी संघाची भूमिका होती, तिच भूमिका आतादेखील आहे. त्यात कसलाही बदल झालेला नाही. संघ दोन रुपात समाजाला दिसतो. एक रूप शाखा, शाखेत जाणारा स्वयंसेवक, त्याचा गणवेश, त्याची सैनिकी शिस्त, दिसते. दुसरे रूप संघविचाराचे असते. ते अव्यक्त असते. हा विचार संघ स्वयंसेवक आपल्या जीवनात जगण्याचा प्रयत्न करतो. तसेच तो ज्या संस्था उभ्या करतो, त्या संस्थेच्या रुपानेदेखील संघविचार जगण्याचा प्रयत्न चाललेला असतो. संघाचे बाह्यरूप परिस्थितीनुसार बदलत जाते. विचारांचे शाश्वत रुप अपरिवर्तनीय असते. म्हणून संघ बदलतो आहे, संघाची भूमिका व्यापक होत आहे, असली विधाने केवळ अज्ञानाची नसून मूर्खपणाची समजली जातात.



डॉ
. मोहनजी भागवत म्हणाले की, “भारतातील १३० कोटी लोकांना आम्ही हिंदूच मानतो.” मोहनजींचे हे वाक्य संघाच्या स्थापनेपासून त्या-त्या काळाच्या परिस्थिती संदर्भात सरसंघचालकांनी व्यक्त केले आहे. आणीबाणीनंतर बाळासाहेब देवरस यांची देशभर जाहीर भाषणे झाली. मुसलमान समाजाला उद्देशून तेव्हा ते म्हणाले की, “भारतातून मुसलमान जेव्हा मक्का-मदिनेला जातो तेव्हा तेथील स्थानिक अरब ‘भारत से हिंदू आया हैं’ असे म्हणतात. बाळासाहेबांनी हे सांगून पुढे असे म्हटले की, “काही कारणांमुळे तुमची उपासना पद्धती बदलली. परंतु, उपासना पद्धती बदलल्यामुळे बापजादे बदलत नाहीत, संस्कृती बदलत नाही. बाळासाहेबांना हे सांगायचे होते की, मुसलमान होण्यापूर्वी तुम्ही सर्व हिंदूच होतात.”



आपल्या बोलण्याच्या स्पष्टीकरणासाठी बाळासाहेब इंडोनेशियाचे उदाहरण देत
. इंडोनेशियाच्या विमान कंपनीचे नाव ‘गरुड एअरवेज’ असे आहे. त्यांच्या राष्ट्राध्यक्षांचे नाव होते, ‘सुकार्णो.’ ‘सुकार्णो’ म्हणजे ‘सु-कर्ण.’ त्यांच्या मुलीचे नाव ‘मेघावती’ होते. उपासना पद्धतीने ते मुसलमान होते. इंडोनेशियात आणि मलेशियात ‘रामायण’ आणि ‘महाभारता’च्या नाटिका होतात. कलाकार सर्व मुसलमान असतात. त्यांना जर कुणी विचारले, तुम्ही मुसलमान असून ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ नाटिका का करता? त्याला ते उत्तर देतात की, “आम्ही आमचा धर्म बदलला, पण बापजादे बदलले नाहीत, संस्कृती बदलली नाही.” बाळासाहेब देवरसांनी हे सर्व विषय जवळजवळ ४० वर्षांपूर्वी सातत्याने मांडले आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या संघकार्यकर्त्याला मोहनजींचे भाषण म्हणजे संघाच्या भूमिकेत, विचारांत बदल, असे काही वाटत नाही.



भारतातील मुसलमानांना योग्य शब्द कोणता
? योग्य शब्द आहे, ‘हिंदू मुसलमान.’ काही विद्वानांना हा शब्द वैचारिक गोंधळाचा आणि विसंगतीपूर्ण वाटेल. थोडा विचार केला तर, तसे वाटण्याचे कारण नाही. तुर्कस्तानातील मुसलमानांना ‘तुर्की मुसलमान’ म्हणतात, इजिप्तमधील मुसलमानांना ‘इजिप्तिशियन मुसलमान’ म्हणतात, अरबस्तानातील मुसलमानांना ‘अरबी मुसलमान’ म्हणतात, सीरियातील मुसलमानांना ‘सीरियन मुसलमान’ म्हणतात. या न्यायाने हिंदुस्थानातील मुसलमानांना ‘हिंदू-मुसलमान’ म्हटले पाहिजे. येथे त्यांच्यावर ‘हिंदू’ नावाचा धर्म लादण्याचा प्रयत्न नाही. त्याचे एकमेव कारण असे की, एक ग्रंथ, एक प्रेषित, एक ईश्वर, या कसोट्या लावल्या तर ‘हिंदू’ नावाचा धर्म भारतात अस्तित्त्वात नाही. हिंदू धर्म ही सर्व उपासना पंथाची संसद आहे. त्यात वैदिक आणि अवैदिक, तसेच भारताबाहेरील धर्मही येतात. ‘हिंदू’ ही फार व्यापक संकल्पना आहे. ती शब्दाच्या व्याखेत पकडता येत नाही.



यासाठी डॉ
. मोहनजी भागवत म्हणतात की, भारतात राहणार्‍या १३० कोटी लोकांना आम्ही ‘हिंदू’ समजतो, तेव्हा त्यात कसली विसंगती नसते. विद्वानांच्या व्याख्येप्रमाणे आणि त्यांच्या विश्लेषणाप्रमाणे समाज चालत नसतो. हिंदू समाज तर अजिबात चालत नाही. हिंदू समाजाचे मुख्य वैशिष्ट्य विचारधारांचा समन्वय करण्याचे आहे, तसेच उपासनेच्या सर्व पंथाचा आदर आणि सन्मान करण्याचे आहे. परमेश्वराला जाणण्याचे अनेक मार्ग आहेत आणि प्रत्येक मार्ग सत्य आहे. ही ऋषीमुनी आणि संताची शिकवण त्याच्या हाडीमासी खिळलेली आहे आणि त्याप्रमाणे तो जगत असतो. ही कवीकल्पना नाही. विद्वानाने बुद्धीने काढलेला निष्कर्ष नाही. रामकृष्ण परमहंस यांनी सर्व पंथ सत्य आहेत, हे साधना करून सिद्ध केले आहे. विवेकानंदांनी हीच साधना सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात जोरदारपणे मांडली. या परंपरेत दीक्षित झालेले श्रीगुरुजी हेदेखील हाच विचार जगत राहिले.



प्रश्न असा आहे की
, या सत्याची जाणीव आणि अनुभूती मुस्लीम बांधवांना किती आहे? ती फार मोठ्या प्रमाणात आहे, असे विधान केले तर ते बावळटपणाचे ठरेल. मुसलमान बांधवांत ही जाणीव निर्माण होऊ नये, म्हणून इंग्रजांनी मुसलमानांना ‘धार्मिक अल्पसंख्याक’ मानून हिंदू समाजापासून तोडले. त्यांच्या डोक्यात देश तोडण्याची कल्पना भरली. तिचा विरोध करण्याऐवजी गांधी आणि नेहरुंच्या काँग्रेेसने या भावनेला खतपाणी घातले. त्याचा परिणाम म्हणून आपली मातृभूमी खंडित झाली.



तेव्हा शब्दप्रयोग वापरला गेला
,‘हिंदू-मुस्लीम ऐक्याचा’ हा शब्दप्रयोग प्रचंड वैचारिक गोंधळाची खाण आहे. हिंदू-मुसलमानांचे हिंदूंशी ऐक्य कसे काय होणार? जे मुळातच हिंदू आहेत. त्यांचे ऐक्य त्याच शब्दाशी कसे होणार? ‘हिंदू-मुस्लीम ऐक्य’ हा शब्दप्रयोग समाजाची दोन भागात विभागणी करणारा आहे. ‘आम्ही’ आणि ‘तुम्ही’ अशी भावना निर्माण करणारा आहे. ‘आम्हीही नाही’ आणि ‘तुम्हीही नाही’, सर्वजण ‘आपण’ आहोत, हा विचार मनात असेल तर भेद निर्माण होणार नाहीत. उपासना पद्धतीवरुन कलह निर्माण होणार नाहीत. आणि आपण सगळे गुण्यादोविंदाने एकत्र राहू. मला समजलेली संघाची ही भूमिका आहे.



डॉ
. मोहनजी जेव्हा म्हणतात की, १३० कोटी भारतीय लोक आपलेच आहेत, तेव्हा ते या लोकांचे विभाजन उपासना गटांत करीत नाहीत. भारतमातेला जो मानतो, इथल्या, जल, जमीन, जंगल, पशु-पक्षी, या सर्वांशी ज्याचे आत्मीय नाते आहे, तो आपला माणूस आहे. तो उपासना करीत असेल किंवा करीत नसेल. म्हणजे आस्तिक असेल की नास्तिक असेल हा प्रश्न नाही. एवढी ही व्यापक भूमिका आहे. ज्यांच्या डोक्यात प्रथम हिंदू, मुसलमान, पारशी, जैन, बौद्ध असे विविध शब्द घट्ट बसलेले आहेत. ते समाजाचा तुकड्यातुकड्यात विचार करणार. एकमेकांचे हितसंबंध एकमेकांना कसे मारक आहेत, याचा विचार करीत राहणार. ही एकतेतील विविधता आहे, असा विचार ते करीत नाहीत आणि त्यांच्या सवयीप्रमाणे जो आपल्यासारखा विचार करीत नाही, तो सांप्रदायिक, जातीयवादी ठरविला जातो. असे ठरविण्याचा परवाना त्यांना कुणी दिला आहे? असा प्रश्न आता प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक वेळी विचारण्याची वेळ आता आलेली आहे. आपण ज्या भूमिकेवर काल होतो, आज आहोत आणि उद्या राहणार आहोत, ही भूमिका अतिशय आग्रहाने मांडत राहिली पाहिजे. आपला विचार सात्त्विक आहे आणि त्याचा परिणाम हळुहळू का होईना, आपल्या मुस्लीम बांधवांवरदेखील झाल्याशिवाय राहणार नाही. कारण, अखेरशेवटी तेदेखील हिंदू-मुसलमान आहेत.

@@AUTHORINFO_V1@@