‘रिअ‍ॅलिटी’चा रिमोट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2019   
Total Views |


china_1  H x W:



चिनी नागरिकांची सगळी बायोमेट्रिक माहिती या टेलिकॉम कंपन्यांना एका क्लिकसरशी उपलब्ध असेल
. त्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर करण्याचे स्पष्ट निर्देश चीनच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाने सर्व टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे आता खोटे पुरावे आणि ओळखपत्राचा वापर करून किमान चीनमध्ये तरी यापुढे मोबाईल फोनधारकांना पळवाट शोधता येणार नाही.



वर्षाचा शेवटचा डिसेंबर महिना उजाडला
. दरवर्षीप्रमाणे यंदाचेही वर्ष माहिती आणि तंत्रज्ञान जगतासाठी नवनवीन शोध-संशोधनांच्या योगदानामुळे स्मरणातही राहील. आता चीनमध्येच बघा. तिथे जर नवीन मोबाईल कनेक्शन हवे असेल तर टेलिकॉम कंपन्यांना आता केवळ फोटो असलेले ओळखपत्र, हाताचे ठसे यावर भागणार नाही, तर वापरकर्त्यांच्या चेहर्‍याचे प्रत्यक्ष फोटो काढूनच तुम्हाला नवीन कनेक्शन घेता येईल. जशी प्रक्रिया आपण भारतात आधारकार्ड काढताना काढतो, अगदी तशीच. चिनी नागरिकांची सगळी बायोमेट्रिक माहिती या टेलिकॉम कंपन्यांना एका क्लिकसरशी उपलब्ध असेल. त्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर करण्याचे स्पष्ट निर्देश चीनच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाने सर्व टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे आता खोटे पुरावे आणि ओळखपत्राचा वापर करून किमान चीनमध्ये तरी यापुढे मोबाईल फोनधारकांना पळवाट शोधता येणार नाही. एकाअर्थी चिनी सरकारने उचललेले हे पाऊल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असले तरी दोन प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होतात.



एक तर
, टेलिकॉम कंपन्या ग्राहकांच्या या खाजगी बायोमेट्रिक माहितीचा गैरवापर करणार नाहीत, याची शाश्वती हवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे, चिनी सरकारनेही आपल्याच नागरिकांवर पाळत ठेवण्यासाठी या संवेदनशील माहितीचा वापर केला तर जाब कुणाकडे मागायचा? असाच एक प्रकार चीनमध्ये नुकताच उघडकीस आला. एका प्राध्यापक महाशयांना वन्यजीव उद्यानात प्रवेश करताना त्यांचा चेहरा स्कॅन करायला सांगण्यात आला. यावर त्यांनी स्पष्ट नकार देत सरळ त्या उद्यान प्रशासनाला न्यायालयातच खेचले. त्यामुळे इंटरनेट, सुरक्षा यंत्रणा हे सगळं ठीक, पण जर हे तंत्रज्ञान प्रत्येक वैयक्तिक बाबींमध्ये ढवळाढवळ करणार असेल, तर त्याच्या मर्यादा निश्चित करणे ही काळाची गरज म्हणावी लागेल. त्याचबरोबर तंत्रज्ञानाला आपलेसे करण्याबरोबरच याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माणसांचे रोबोटीकरण होणार नाही, याचीही कुठेतरी खबरदारी घ्यायलाच हवी. वेगाने बदलत्या तंत्रज्ञानाला, त्यातील आमूलाग्र बदलांना विरोध करण्याचे कारण नाहीच. फक्त, हे बदल व्यक्तीच्या आयुष्यात कुठवर प्रवेश करू शकतील, त्याचे बरेवाईट परिणाम काय असतील, याचा सांगोपांग विचार करायलाच हवा.



जी गत मनुष्याची तीच गत या मुक्या प्राण्यांचीही
. तंत्रज्ञानाच्या लाटेतून त्यांचीही सुटका नाहीच. अशीच एक बाब रशियाच्या एका डेअरी फार्ममध्ये निदर्शनास आली. तिथे चक्क गायींना ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ची झापडं लावण्यात आली. ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ म्हणजे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डोळ्यासमोर उभं राहणारं एक आभासी चित्र. बर्‍याच मॉलमध्येही तुम्हाला डोळ्यावर मोठा काळा फोनसारखा डिव्हाईस लावून मुलं हातपाय मारत व्हिडिओ गेम्स खेळताना दिसतील, तर रशियाच्या एका गोपालकाने चक्क हा प्रयोग आपल्या गायीवर केला. का, तर म्हणे गायीला डोळ्यासमोर चांगली दृश्य दिसली की आपसूकच तिचे मन आनंदी होईल आणि परिणामी तिच्या दुग्धोत्पादनात वाढ होईल. म्हणूनच, ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’च्या माध्यमातून गायीला हिरव्यागार कुरणांचं कृत्रिम दर्शन घडवलं. एवढंच नाही तर रशियाच्या कृषी विभागाचेही यावर संशोधन सुरू असून गायींची भावनिक स्थिती आणि त्यांच्याकडून मिळणारे दूध यांचा थेट संबंध असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर गायीच्या दुधाच्या प्रमाणाबरोबरच त्याच्या दर्जामध्येदेखील अशा प्रयोगांती वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या प्रयोगाच्या दीर्घकालीन परिणामांची संशोधक शास्त्रीय पद्धतीने नोंदही करणार आहेत.



त्यामुळे तुम्ही
-आम्ही काय किंवा वनस्पती-प्राणी काय, तंत्रज्ञानाच्या या जगतात ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’पासून कोणीही वंचित राहू शकत नाही, हेच खरं. मानवी आयुष्य अधिक सुकर, समृद्ध करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर अधिक वेगाने, कमीत कमी आकारात असाच वेगाने झेप घेत राहील. आजपेक्षा उद्या अजून काहीतरी नूतन, संकल्पांना, विचारशक्तीला भेदणार्‍या तंत्रज्ञानाची व्याप्ती वाढवेलही. तेव्हा, तंत्रज्ञानाच्या शर्यतीत कुणीही मागे न राहता, त्याचा उचित आणि सुरक्षित वापर याकडे कटाक्षाने लक्ष दिल्यास ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ सोबत खरी ‘रिअ‍ॅलिटी’ ही आनंदी आणि सुरक्षित होईल, यात शंका नाही.

@@AUTHORINFO_V1@@