असत्याचे प्रयोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2019
Total Views |

pawar_1  H x W:


आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर गांधींनी
‘सत्याचे प्रयोग’ करत स्वतःला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले. मात्र, महात्मा गांधींचे नाव घेऊन राजकारण करणार्‍या पवारांना हा गुण काही घेता आला नाही. गांधींच्या घोषणा देत पवारांनी ‘असत्याचे प्रयोग’ केले आणि मोदींच्या संदर्भाने केलेले विधान हा त्याचाच दाखला.


काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची त्यांनी कुठूनतरी शोधलेल्या ‘ढाई हजार पाचसो’ या आकड्यावरून यथेच्छ खिल्ली उडवली जात असतानाच, ज्येष्ठ नेते शरद पवारांचे गणितही भलतेच कच्चे असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, पवारांनी आपल्या तोंडानेच स्वतःला अंकगणितात गती नसल्याचे आणि त्यातली साधी बेरीज-वजाबाकीही येत नसल्याचे दाखवून दिले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते व यावेळी त्यांनी राज्यातील सत्तास्थापनेमागची आपली हुशारीही सांगितली. परंतु, याचवेळी पवारांनी मोठे मजेशीर विधान करत, “मीपणाच्या दर्पामुळे देवेंद्र फडणवीस यांना जनतेने नाकारले,” असे म्हणत खळबळ उडवून दिली. अर्थातच, ही खळबळ महाराष्ट्रात वा देशात वा पृथ्वीवर उडाली नाही, तर ती उडाली गणितज्ज्ञ-शास्त्रज्ञांच्या जगतात!



पवारांच्या वक्तव्याने न्यूटन
, गॅलिलिओ आणि आइनस्टाइनपासून ज्यांनी ज्यांनी गणित, भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्रासारख्या क्षेत्रात नावलौकिक मिळवला, त्यांना जबर धक्का बसला. आपले ज्ञान शरद पवारांपेक्षा कमी असल्याचे पाहून त्यांनी आपल्या गुरूला, अभ्यासाला नि कर्मालाही दोष दिला. इतकेच नव्हे तर ‘असे कसे झाले?’ म्हणत चक्रावलेले ते पुन्हा पुन्हा गणिताची पुस्तके चाळू लागले, आकडेमोड-गणितीय क्रिया करून बेरीज-वजाबाकी नि समीकरणे सोडवू लागले. तरीही अखेरीस योग्य उत्तर मिळत नसल्याचे पाहून त्यांनी पवारांचे गणितीय कौशल्य मान्य केले व त्यांचे शिष्यत्व पत्करले! काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि नुकत्याच काकांच्या छत्रछायेखाली गपगुमान गेलेल्या शिवसेनेला म्हणूनच शरद पवारांनी केलेल्या या जागतिक पातळीवरील चमत्काराचा अभिमान वाटला पाहिजे!



वस्तुतः स्वतःच्या उभ्या आयुष्यात आणि आताही आपल्या वयाएवढ्याही जागा पवारांना संपूर्ण महाराष्ट्रातून कधी निवडून आणता आल्या नाहीत
. काँग्रेसमध्ये असताना वा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरही शरद पवारांना कधी तीन आकडी किंवा क्रिकेटच्या भाषेत ज्याला ‘नर्व्हस नाइन्टी’ म्हणतात, तिथपर्यंतही पोहोचता आले नाही. अशी व्यक्ती ज्यावेळी एकदा नव्हे तर दोनदा ‘१०० पेक्षा अधिक आमदार निवडून आणणार्‍या नेत्याला-पक्षाला जनतेने नाकारले,’ असे म्हणते, तेव्हा ते कोणत्या विद्यापीठातून आकड्यांच्या करामती शिकले, असा प्रश्न विचारावासा वाटतो. कारण, भाजपने राज्य विधानसभा निवडणुकीत १६४ जागा लढवल्या आणि त्यातल्या १०५ जिंकल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसने १२१ जागांवर उमेदवार देत ५४ जणांना निवडून आणले. विशेष म्हणजे, पवारांनी हा आकडा मिळवला तो पावसात भिजून, तो भिजलेला फोटो फिरवून आणि भोळ्याभाबड्या जनतेची सहानुभूती मिळवून! जर पाऊसच पडला नसता तर? असो. दुसरीकडे फडणवीसांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर यंदाच्या निवडणुकीत भाजपचास्ट्राईक रेटहोता ७० टक्क्यांच्या आसपास आणि पवारांच्या पक्षाचा त्यापेक्षाही किमान २० टक्क्यांनी कमी.



देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी २५ हून अधिक होती
, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची टक्केवारी १६ टक्क्यांच्या जवळपास राहिली. म्हणजेच इथेही फडणवीसांचा भाजपच वरचढ असल्याचे स्पष्ट होते. तरीही शरद पवार देवेंद्र फडणवीस यांना जनतेने नाकारल्याचे म्हणत असतील, तर त्यांच्या गणितातील अद्भुत ज्ञानाला नोबेल पुरस्कारानेच सन्मानित करायला हवे! उल्लेखनीय म्हणजे, शरद पवार समोर बसलेल्यांना वेड्यात काढून आणि गणिताची वासलात लावून बोलत असताना मुलाखतकारांनाही उलट प्रश्न विचारण्याचे धाडस झाले नाही. जर ‘१०५ जागांवर विजयी होणार्‍यांना जनतेने नाकारले,’ असा अर्थ होत असेल तर ‘५४ जागा मिळवणार्‍यांना जनतेने डोक्यावर घेतले,’ असे समजायचे का? कारण, पवारांच्या उत्तरातून व्यक्त होणारा आविर्भाव तर तसाच होता. तसेच जनतेने ज्याला नाकारले, त्याचेच सर्वाधिक आमदार असतात, असा नवा नियम पवार राजकारणात रुढ करणार आहेत का? आणखी एक म्हणजे, दोन्ही काँग्रेसची एकत्रित आमदारसंख्या होते ९८, म्हणजेच भाजपपेक्षाही ७ अंकांनी कमी! आता इतक्या मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षांना नाकारण्यामागे आघाडीच्या नेत्यांना नेमका कसला गर्व झाला होता, याचे उत्तर शरद पवार देणार आहेत का? अर्थातच, या प्रश्नांची उत्तरे पवार अजिबात देणार नाहीत. कारण, तसे केल्याने समोरच्यांवर भूल पाडता येत नाही ना!



काहीतरी तिकडम करून पक्षाला सत्तेचे ताट मिळवून दिलेल्या पवारांनी मुलाखतीत मोदींच्या नावावरही खोटेपणा खपविण्याचा प्रयत्न केला
. “नरेंद्र मोदींनी आपल्याला भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली होती, पण आपण ती नाकारली,” असे पवार म्हणाले. इथे महात्मा गांधींच्या जीवनाबद्दलचा एक दाखला देणे उचित ठरेल. आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर गांधींनी ‘सत्याचे प्रयोग’ करत स्वतःला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले. गांधींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जे केले, ते आपल्याच लेखणीने प्रामाणिकपणे सांगितलेदेखील. मात्र, महात्मा गांधींचे नाव घेऊन राजकारण करणार्‍या पवारांना हा गुण काही घेता आला नाही. गांधींच्या घोषणा देत पवारांनी ‘असत्याचे प्रयोगकेले आणि मोदींच्या संदर्भाने केलेले विधान हा त्याचाच दाखला. जर मोदींनी खरेच तशी काही ‘ऑफर’ दिली असेल, तर ती शरद पवारांनी नाकारली कशी? कारण, शरद पवारांचा लौकीक तर न मिळालेली ‘ऑफर’ही हिसकावून घेण्याचा आहे, ते एवढी चांगली संधी कशी सोडतील?



पवारांना त्यातून स्वतःला व पक्षालाही राष्ट्रीय पातळीवर नेण्याची शक्यता होती
, तरीही त्यांनी ती ‘ऑफर’ नाकारली, हे अशक्यच! म्हणूनच शरद पवार केवळ स्वतःचे मोठेपण कार्यकर्त्यांच्या आणि इतरांच्या मनावर ठसविण्यासाठी असली विधाने करत असावेत, असे दिसते. परंतु, पवारांचे हे मोठेपण बारामती आणि परिसर व पश्चिम महाराष्ट्रातील चार-पाच जिल्ह्यातल्यांना सुखावणारे असेल, संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे. कारण, देवेंद्र फडणवीसांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मूक मोर्चे, शेतकरी संप, पेशवे-छत्रपती नेमणूक आणि पगडी-पागोट्याचा वाद लावूनही पवारांना चोपन्नच आमदार निवडून आणता आले (व फडणवीसांना १०५). विशेष म्हणजे, यामागे पवारांच्या सत्याच्या नव्हे, तर असत्याच्या प्रयोगाचीच तपश्चर्या आहे. पण, हे प्रयोग आणखी किती काळ जनतेच्या नशिबी असतील, हे मात्र येणारा काळच सांगेल.

@@AUTHORINFO_V1@@