शिवांगी : एक लढवय्यी ‘पायलट’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2019
Total Views |


shiwangi_1  H x



शिवांगी स्वरूप या महिलेच्या रूपाने भारतीय नौदलाला आपली पहिली महिला पायलट मिळाली आणि वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली. आपल्या कर्तृत्वाने इतिहासाला गवसणी घालणार्‍या शिवांगीच्या आयुष्याविषयी...



स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असून ती पुरुषांच्या तुलनेत अजिबात मागे नाही
. संशोधक, डॉक्टर, अभियंता, अंतराळ अशा कित्येक क्षेत्रांत स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला असून रणांगणातही तिने आपले धैर्य, शौर्य दाखवून दिले आहे. भारतीय सैन्यदलात पुरुषांप्रमाणेच काही स्त्रियांनीही मोलाची कामगिरी बजावली असून आत्तापर्यंत अनेक ‘शौर्य पुरस्कारां’वर आपले नाव कोरण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. विविध क्षेत्रांतील स्त्रियांचे हे कर्तृत्व समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले असून त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगावी तितकी कमीच. अशाच तमाम भारतीयांसाठी प्रेरणादायी राहिलेल्या भारतीय नौदलातील पहिल्या महिला पायलट शिवांगी स्वरूप यांचे कार्यही वाखाणण्याजोगेच आहे. त्यांच्या रूपाने भारतीय नौदलाला पहिली महिला पायलट मिळाली असून गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली. नौदलात पहिली महिला पायलट म्हणून रुजू होत इतिहासाला गवसणी घालणार्‍या या ‘लढवय्यी पायलट’चा आजवरचा प्रवास आव्हानात्मक राहिला आहे.



२४ वर्षीय शिवांगी ही मूळची बिहारची
. मुझफ्फराबाद जिल्ह्यातील पारू या गावी तिचा जन्म झाला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या या शिवांगीने भारतीय नौदलातील पहिली महिला पायलट होण्याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. मात्र, अभियांत्रिकीच्या महाविद्यालयात शिक्षण घेताना तिने एका नौदलातील अधिकार्‍याला पाहिले आणि भारतीय नौसेनेत नोकरी करण्याचा निर्धार केला. आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर तिने पायलट होण्याचे स्वप्न बाळगले आणि पूर्णही केले. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या या शिवांगीचे शालेय शिक्षण गावीच पूर्ण झाले. त्या शिक्षणात लहानपणापासूनच हुशार. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊन सरकारी कार्यालयांमध्ये बड्या पदांवर काम करण्याचे ध्येय तिने आधीच निश्चित केले होते. दहावीत चांगले गुण मिळवून तिने विज्ञान शाखेत आपला महाविद्यालयीन प्रवेश मिळवला. बारावी विज्ञानमधूनही उत्तम गुण मिळविल्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवण्याचा निर्णय घेतला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या शिवांगीच्या कुटुंबीयांसाठी ते डोईजड होते. मात्र, तरीही स्वरूप कुटुंबीयांनी आर्थिक पदरमोड करत तिला अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळवून देण्याचा निर्णय घेतला.




शिवांगीने मणिपाल विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी मिळवली
. लहानपणापासूनच शिक्षणात हुशार असणार्‍या शिवांगीने फक्त अभियांत्रिकीच्या पदवीपर्यंत न थांबता आणखी पुढे शिकण्याचा निर्णय घेतला. यावेळी कुटुंबानेही तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग’ अभियंता झाल्यानंतरही तिने पुढील पदव्युत्तर शिक्षणसाठी अर्ज केला. बीटेकपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिवांगीने नौदलाचा ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’चा (एसएससी) २७व्या एनओसी कोर्समध्ये प्रवेश मिळवला. यानंतर केरळमधील एझिमालामधील इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये तिची निवड झाली. येथे जवळपास दीड वर्ष पायलटचे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर शिवांगी नौदलाची पहिली महिला पायलट बनली आहे. भारतीय नौदलातल्या एव्हिएशन विभागात हवाई वाहतूक नियंत्रण (टीसी) विभागात अधिकार्‍यांमध्ये महिला अधिकार्‍यांचा समावेश असतो.



‘ऑब्जर्व्हर’ म्हणून रुजू असणार्‍या या महिला अधिकारी या काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी जबाबदार असतात. मात्र, नौदलात आता महिलांना ‘कॉम्बॅट रोल’ही जवळपास देण्यात आला आहे. कारण, शिवांगीला अ‍ॅण्टी सबमरिन एअरक्राफ्टवरही तैनात केले जाणार आहे. ही भारतीय नौदलासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे दक्षिण क्षेत्राचे कमांड इन चीफ, वाईस अ‍ॅडमिरल ए. के. चावला सांगतात. ‘फायटर पायलट’ म्हणून निवड झाल्यानंतरही पुढचा काळ आणखी कठीण जबाबदार्‍यांचा असल्याचे शिवांगी सांगते. ही जबाबदारी वाटते तेवढी सोपे नसल्याचे तिने अनेकवेळा मुलाखतींदरम्यान सांगितले. “या कामात मानसिक त्रासही सहन करावा लागतो. पुरुषांच्या तुलनेत आम्हीही काही कमी नाही, असे अनेकदा दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाजाची तशी मानसिकताच नव्हती. त्यामुळे काहीतरी वेगळे करून दाखविण्यासाठी आम्ही फायटर महिला पायलट संधीच्या शोधात होतो. ती संधी आम्हाला कारगिल भारतीय नौदलाने दिली.” भारतीय नौदलात इतिहास घडविणार्‍या या लढवय्यी पायलट गर्लचे कौतुक करावे तितके कमी असून दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!



-रामचंद्र नाईक 
@@AUTHORINFO_V1@@