सहकारातून वनीकरण.... देशात नवा प्रयोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Dec-2019   
Total Views |


afs_1  H x W: 0

 


सध्या जगासमोर उभी असलेली गंभीर समस्या म्हणजे पाणीटंचाई व प्रदूषण होय. 'वृक्ष लावा वृक्ष जगवा' या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरावे यासाठी 'दि कल्याण जनता सहकारी बँक कल्याण' आणि 'दि ठाणे भारत सहकारी बँक लि' या ठाणे जिल्ह्यातील दोन शेड्युल्ड सहकारी बँकांनी 'संचालक समाजसेवा पुरस्कार निधी' या अशासकीय संस्थेच्या सहकार्याने प्रकल्प राबविला.


१ जुलै, २००७ मध्ये 'सहकारातून वनीकरण' ही योजना प्रत्यक्ष वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करून कार्यान्वित करण्यात आली. सन २०११-१२ मध्ये बँकेने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष, अनेक विविध कार्यक्रम करून साजरे केले. त्याप्रमाणे या सहकार वर्षात १५०० वृक्षांची लागवड केली. सन २००७ ते २०१२ पर्यंतच्या या सहा वर्षांच्या कालावधीत या ठिकाणी १२० प्रकारच्या २४ हजार विविध प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. आजपर्यंत तेथे नक्षत्र वन उद्यान, अष्टदिशा वृक्ष उद्यान, नवग्रह उद्यान, गणेश पत्री उद्यान ही उद्याने तयार करण्यात आली आहेत. तसेच काही औषधी वनस्पतीचीसुद्धा लागवड करण्यात आलेली आहे. सुरुवातीपासून आजपर्यंत या वन प्रकल्पास प्रधान सचिव मा. श्रीमती नीला सत्यनारायण, जिल्हा परिषद अध्यक्षा (ठाणे) सौ. रेखा पष्टे, मुख्य वनसंरक्षक ठाणे श्री. श्री. भगवान, सामाजिक वनीकरण विभाग खात्याचे उपसंचालक श्री. के. डी. ठाकरे, महाराष्ट्र वनखात्याचे प्रधान मुख्यवनसंरक्षक मा. श्री. ओ. के. जोशी (नागपूर), आजी-माजी आमदार, पर्यावरण दक्षता मंचाचे प्रा. विद्याधर वालावलकर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकारी इ. मान्यवर व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. शिवाय, सहकारी वनीकरण योजनेंतर्गत समाजाच्या सर्व घटकांचा वनविकास कार्यक्रमात सक्रीय सहभाग होता. २००८ च्या पावसाळ्यात वटपौर्णिमेच्या दिवशी १०० महिलांनी वड व आवळ्याची २०० रोपे लावून वट पौर्णिमेचा सण एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने उत्साहाने साजरा केला होता. सहकारी बँकेने राबवलेले वनीकरण हे देशात एकमेव असे आहे. हा वनप्रकल्प राबविण्यात सुरुवातीपासून कल्याण जनता सहकारी बँकेचे संस्थापक संचालक व माजी अध्यक्ष मा. श्री. वामनराव साठे, संचालक समाजसेवा पुरस्कार न्यासाचे अध्यक्ष मा. डॉ. प. वि. कारखानीस व सर्व आजी-माजी अध्यक्ष व संचालक यांचा मोलाचा वाटा आहे.

 

नगरे रचावी जलाशय निर्मावी,

महावने लावावी नानाविध

- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज

 

समाजाची सातत्याने प्रगती होत असते, विकास होत असतो. परंतु, या विकासाबरोबर पर्यावरणाचा र्‍हाससुद्धा होत असतो. पर्यावरणाचा तोल सांभाळून विकास न केल्यास पृथ्वीचे तापमान वाढणे, नैसर्गिक ऊर्जास्रोत वेगाने नष्ट होणे, समुद्राची पातळी वाढून काही शहरे समुद्रांतर्गत बुडणे, अशी भीती निर्माण झाली आहे. विकास व पर्यावरण संतुलित राखण्याच्या दृष्टीने अनेकविध उपाय आहेत. वृक्षारोपण हा यातील महत्त्वपूर्ण असा उपाय आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर ३३ टक्के जमीन सन २०१० पर्यंत वनासाठी असायला हवी होती. परंतु, प्रत्यक्षात सुमारे २१ टक्के जमीन वनक्षेत्रात आहे. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात व वेगाने वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे. सन २००४ सालापासून आमचे ज्येष्ठ संचालक श्री. वामनराव साठे या विलक्षण विषयासंदर्भात झपाटल्यासारखे काम करीत होते व जिद्दीने केलेल्या पाठपुराव्याला मूर्त स्वरुप आले. दि. १७ मे २००७ या दिवशी 'सहकारी वनीकरण' या प्रकल्पाकरिता दोन त्रिपक्षीय करारावर ठाणे येथे सह्या करण्यात आल्या. मे २००७ ते मे २०१४ या सात वर्षांच्या कालावधीत 'पर्यावरण रक्षणा'च्या या अभिनव अभियानाचे फलित म्हणून आज टिटवाळ्याजवळील काळू नदीच्या काठावर मौजे म्हसकळ येथील ५० एकर पडील वन क्षेत्रात सुमारे २० हजार वृक्ष उभे आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्रातील पहिला 'सहकारी वनीकरण' प्रकल्प यशस्वीरित्या साकारला. लवकरच ते महाराष्ट्र राज्याच्या वनविभाग, ठाणे यांच्या वतीने पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे.

@@AUTHORINFO_V1@@