लोकमान्य टिळक आणि शिवजन्मोत्सव (भाग१)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2019
Total Views |


tilak_1  H x W:



टिळक म्हटलं की गणेशोत्सव आणि शिवजयंती या दोन्हीचा हमखास उल्लेख होतोच
. त्यातही गणेशोत्सवाबद्दल भरपूर लिहिलं-बोललं जातं. मात्र, शिवजयंतीबद्दल तसं होताना दिसत नाही. महाराष्ट्रात आज शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते. मात्र, शिवजयंतीच्या उत्सवाबद्दल आस्थेने लेखन करून या उत्सवाचे खरे स्वरूप, भूमिका मांडताना फार शिवप्रेमी दिसत नाहीत. शिवाजी महाराजांच्या नावे टिळकांनी सुरु केलेल्या या उत्सवाला खूप मोठा इतिहास आहे, राष्ट्रोद्धारणाचे प्रबळ अधिष्ठान आहे. तेव्हा जाणून घेऊया टिळकांनी सुरु केलेल्या शिवजन्मोत्सवाचा हा अनोखा आणि दुर्लक्षित प्रवास...



टिळक हे जसे राष्ट्रीय गणेशोत्सवाचे प्रणेते
, तसेच त्यांनी प्रयत्नपूर्वक देशभर पोहोचवलेला आणखी एक उत्सव म्हणजे शिवजयंती! गणेशोत्सवानंतर लगेचच टिळकांनी शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाकडे आपला मोर्चा कसा वळवला ते बघूया... झाले असे की, १८९४च्या २० एप्रिल रोजी मुमाबीचे लेखक आर. पी. करकेरिया यांनी ‘प्रतापगडचा किल्ला’ या विषयावर एशियाटिक सोसायटीपुढे, एक मुद्देसूद व माहितीने भरलेला निबंध वाचला. प्रतापगडचा इतिहास हा त्याचा मुख्य विषय! गंमत अशी आहे की, आपल्या देशात ब्रिटिश आल्यापासून त्यांनी त्यांच्या सोयीने हवा तसा इतिहास लिहून ठेवलेला आहे. त्यामुळे ‘महाराजांनी अफझलखानाला कपटाने मारले, त्याचा कट काढला, त्याला भूल दिली,’ अशी अतिरंजित आणि तथ्यहीन विधाने महाराजांची प्रतिमा मलीन करण्यासाठी अनेक ब्रिटिश आणि मुसलमान इतिहासकारांनी करून ठेवली आहेत. करकेरिया यांनी नेमके हेच मत खोडून काढले आणि अफझलखान हा शिवाजी महाराजांना मारायला आला होता. पहिला वार त्याने केला, म्हणून महाराजांनी त्यावर प्रतिवार करून त्याला मारले हे पुराव्यानिशी सिद्ध केले.



त्यांचा हा निबंध बराच गाजला
. राष्ट्रीय जागृती होऊ लागली की, ऐतिहासिक अभिमानाच्या विषयांकडे जास्तीत जास्त लोकांचे लक्ष जाते याचा अनुभव टिळकांना होता आणि पुढच्याच वर्षी लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’तून शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या सध्याच्या स्थितीवर लेख लिहिण्यास सुरुवात केली. त्या चर्चेचा सुपरिणाम होत आहे हे टिळक पाहत होते. “शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल सगळे लोक चर्चा खूप करतात, त्यांच्या समाधीची दूरवस्था पाहून इंग्रज अधिकार्‍यांना वाईट वाटते, पण आपण महाराष्ट्रीय लोक त्या समाधीच्या उद्धारासाठी काय करतो? आम्ही आमचे कर्तव्य पार पाडतो का?” असा सवाल टिळक ‘केसरी’तून विचारत होते. ब्रिटिश अधिकार्‍यांनी या प्रकरणाबद्दल काय काय लिहिले आहे, याचेही दाखले ते ‘केसरी’तून देत होते. रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार आणि शिवाजी महाराजांचा वार्षिक उत्सव या कल्पना अशा चर्चेतून पुढे आल्या.



समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी गोळा करावा या हेतूने १९८५च्या मे महिन्यात पुण्यात हिराबागेत सभा आयोजित करण्यात आली होती
. समर्थ रामदास स्वामींच्या परंपरेतले चाफळकर स्वामी हे या सभेचे अध्यक्ष होते. कोल्हापूरच्या महाराजांकडून यासाठी निधी मिळाला तर त्यासाठीही प्रयत्न करावे, असाही ठराव या सभेत मंजूर झाला होता. मे महिन्याच्या शेवटी टिळक हे या शिष्टमंडळाचे चिटणीस म्हणून कोल्हापूरच्या महाराजांना भेटायला गेले. २९ डिसेंबर, १८९५ रोजी रे मार्केटच्या पटांगणावर टिळकांनी जंगी सभा भरवली. या सभेला सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि पंडित मालवीयजी हेही उपस्थित होते. टिळकांनी १८९५ साली शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबद्दल सूचना असा शीर्षकाचा लेख ‘केसरी’त लिहिला. “करायचे म्हणून स्मारक होणार नाही, त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत,” असे टिळकांना सुचवायचे आहे, असे यातून दिसते.



टिळक लिहितात
, “राष्ट्रामध्ये आपलेपणाची जागरूकता राहण्यास त्या त्या राष्ट्रातील पूर्वी झालेल्या पराक्रमी पुरुषांचे आम्हास नेहमी स्मरण झाले पाहिजे किंवा दिले पाहिजे, हे तत्त्व सगळ्या जीवंत राष्ट्रास हल्ली पूर्णपणे मान्य झालेले आहे. आम्हीच जर ते विसरलो असलो, तर ते आमच्या निद्रावस्थेचे अगर दुर्दैवाचे लक्षण होय. परंतु, शिवाजी महाराजांचे स्मारक आम्ही मोठ्या कळकळीने व भक्तीने का करावे, याबद्दल याहीपेक्षा बलवत्तर कारण म्हणजे आमची, आमच्या राष्ट्राच्या अभ्युदयाचा पाया घालणार्‍या गृहस्थाबद्दलची कृतज्ञताबुद्धी ही होय. ज्याच्या अंगात माणुसकी वास करीत आहे, त्यास श्रीशिवाजीमहाराजांच्या समाधीबद्दल आस्था वाटेलच; पण ज्याचा महाराष्ट्र कुळात जन्म झाला आहे, त्यास तर असल्या कृत्याबद्दल विशेष अभिमान, आस्था कळकळ किंवा भक्ती असणे हे त्याचे कुलव्रतच होय.” (केसरी-२ जुलै १८९५)



शिवजयंती उत्सवाला टिळकांनी राष्ट्रीय अस्मितेशी जोडले त्याचे हेच कारण आहे
. शिवाजी महाराजांचे स्मारक करायचे म्हणजे नेमकं काय करावे याबद्दल महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक शहरातून लोकांची पत्रे येत आहेत. शहराशहरात याचे उत्सव व्हावेत, त्या निमित्ताने कथा, कीर्तने व्याख्याने करून महाराजांचे स्मरण करावे, शहराशहरात महाराजांचे पुतळे उभारावे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी तालमीचे अड्डे स्थापन करावेत आणि त्या निमित्ताने त्यांना शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, त्यांच्या नावे मोफत विद्यालये स्थापन करावीत अशा सूचना लोकांकडून येत होत्या. त्याचा संबंध टिळकांनी राष्ट्रीय अस्मितेशी जोडला, प्रत्येक माणूस त्यांना यात सामील करून घ्यायचा होता, टिळक लिहितात, “आमच्याकडे आजपर्यंत ज्या सूचना आल्या आहेत, त्यात शिवाजी महाराजांच्या स्मारकाकरिता जो फंड गोळा होत आहे, त्याचा राष्ट्रीय अभ्युदयाची जी अनेक साधने आहेत, त्यापैकी कोणत्याही साधनाची प्राप्ती करून घेण्याकडे विनियोग करावा असे सुचवले आहे.” (केसरी-२ जुलै १८९५)



यासाठी पैसा जमवणे किती गरजेचे आहे हे टिळक पटवून देतात
. पैसा जमवण्याच्या हेतूने देशातील प्रत्येक जण या कार्यात सहभागी होईल ही त्यामागील टिळकांची भूमिका आहे. लोकवर्गणीतून पैसा जमायला हवा. एक एक माणूस या कार्यात जोडला जावा, प्रत्येक आहे आपलेच कार्य आहे असे वाटावे या भूमिकेतून टिळकांनी ही योजना केली आहे. टिळक सांगतात, “श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकाकरिता महाराष्ट्रातल्या ज्या घराण्यातून पैशापासून तो काही कायमच्या वर्षासनापर्यंत मदत होणार नाही ते घर महाराष्ट्रीयाचे घर आहे, असे आम्ही समजणार नाही. शिवाजी महाराजांच्या स्मारकाकरिता लाख रुपये लागले तरी ते खर्च करण्याचे कोल्हापूरचे छत्रपती महाराज किंवा शिंदे, होळकर यांचे सामर्थ्य आहे. पण सर्वांशी अशा रीतीने स्मारक होणे हे आम्हास इष्ट नाही. श्रीशिवाजी महाराजांबद्दल आमची पूज्य बुद्धी, आमची कृतज्ञता बुद्धी व्यक्त करण्याची जर आम्ही ही संधी दवडली तर आमच्यासारखे देशाभिमानशून्य पशु आम्हीच असे म्हणावे लागेल! याकरिता पुनः एकवार महाराष्ट्रातील लहानथोर गृहस्थांस आम्ही आग्रहाने आणि कळकळीने असे कळवतो की, याकामी तुमच्या शक्तीप्रमाणे पै-पैसा पाठविण्यास तुम्ही आळस केल्यास तुम्हास व तुमच्या देशास तो मोठा लांच्छनास्पद आहे.” (केसरी-२ जुलै १८९५)



शिवजयंतीबद्दल आपण आणखीन सखोल अभ्यासपूर्वक माहिती आपण जाणून घेणार आहोतच
. सर्वसामान्य लोकांना शिवजयंती कशी सुरू झाली आणि टिळकांनी त्यासाठी कसे प्रयत्न केले, याबद्दल बहुतेक वेळा वरील माहिती ज्ञात असते. मात्र, शिवजयंतीच्या उत्सवाला आणखीही एक निराळी कथा आहे ती समजून घ्यायला इतिहासात डोकावून पाहावे लागेल. पेशवाईच्या काळात शिवाजी महाराजांच्या बहुतांशी किल्ल्यांवर देखरेख करण्यासाठी विशेष लोकांची नेमणूक केलेली असे. ते लोक आजूबाजूच्या परिसरात राहत आणि किल्ल्याची देखरेख करत. पेशवाई नंतर मात्र इंग्रजी राज्याच्या काळात या किल्ल्यांकडे सरकारचे फारसे लक्ष नव्हते, म्हणजे किल्ले सरकारच्या ताब्यात होतेच, पण त्याची देखभाल हवी तशी होत नव्हती. नंतरच्या काळात स्वराज्याची राजधानी पाहायला मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेम्पल गेले, किल्ला पाहून ते भारावले आणि किल्ल्याची दैन्यावस्था पाहून त्यांनी कुलाब्याच्या कलेक्टरला एक पत्र लिहिले. शिवाजी महाराजांची समाधी अतिशय वाईट अवस्थेत होती. त्यामुळे समाधीची आणि सोबतच किल्ल्याची डागडुजी करावी अशा सूचनाही टेम्पल यांनी दिल्या.



नंतरच्या काळात कुलाब्याच्या या अधिकार्‍याने टेम्पल साहेबांच्या आदेशाचा फायदा घेऊन मुंबई सरकारला पत्र लिहिले आणि समाधीच्या दुरुस्तीसाठी निधी पाठवावा यासाठी मागणी केली
. हा प्रश्न त्यावेळी वर्तमानपत्रातसुद्धा प्रसिद्ध झाला आणि शिवाजी महाराजांच्या समाधीच्या वाईट अवस्थेबद्दल चर्चा सुरू झाली. यावेळी गोविंद बाबाजी जोशी वसईकर यांच्या मनी प्रश्न आला की, आपणही रायगडास जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती पहावी, असे त्यांना वाटले आणि दि. ३ एप्रिल, १८८५ रोजी हे जोशी रायगडावर गेले. तिथली सगळी परिस्थिती त्यांनी बघितली आणि त्यावर एक सविस्तर ग्रंथच लिहिला, तो पुढे १८८७साली प्रकाशित झाला. दरम्यानच्या काळात डग्लस यांनीसुद्धा मुंबई इलाख्याच्या पुस्तकात शिवाजी महाराजांची समाधी कशी आणि किती वाईट अवस्थेत आहे, याचे वर्णन केले होते. जोशींना ही गोष्ट फार लागली आणि आपणच वर्गणी जमवून समाधीच्या डागडुजीसाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी ठरवले. त्यांनी के. जनार्दन नावाच्या एका इंजिनिअरकडून समाधीच्या जीर्णोद्धारासाठी लागणार्‍या खर्चाचे अंदाजपत्रक मागवले. त्यासाठी वर्तमानपत्रातून लेखही लिहिले. त्यांच्या या लेखांचा परिणाम झाला आणि सरकारकडून वार्षिक पाच रुपये समाधीच्या साफसफाईसाठी मिळू लागले! या सगळ्या कथेत जोतिबा फुले यांचा संदर्भ दिला जातो, तो कसा आणि का? तेही समजून घेऊया!

(क्रमशः)

- पार्थ बावस्कर

@@AUTHORINFO_V1@@