
मोहन आघारकर हे कल्याण जनता सहकारी बँकेत कार्यरत असल्यापासूनच ‘संचालक समाजसेवा पुरस्कार निधी’ या संस्थेच्या कार्यात आपल्यापरीने हातभार लावत आहेत. संस्थेचे अनेक समाजहित उपक्रम असो किंवा कुठलाही अन्य कार्यक्रम, संस्थेच्या मंचावरील त्यांचे स्थान हे त्यांच्या कार्यामुळे, संघटनकौशल्यामुळे लक्ष वेधून घेत असते. गेली सहा वर्षे ते या संस्थेच्या सचिवपदाची धुरा सांभाळत आहेत.
‘दि कल्याण जनता सहकारी बँके’चे संचालक आपल्या सभाशुल्कापोटीची रक्कम ही ‘संचालक समाजसेवा पुरस्कार निधी न्यासा’कडे वर्ग करतात. त्यातून पुरस्कार म्हणून ५० हजार रुपये रोख समाजकार्य करणार्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार स्वरूपात दिले जातात. संस्था दरवर्षी विविध वार्षिक उपक्रम राबवित असते. त्या दृष्टीने माझ्याकडे या संस्थेची ‘सचिव’ म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर आणखी विस्तृतपणे आपण समाजकार्य करू, योग्य त्या व्यक्तींपर्यंत मदत पोहोचवू आणि नवनवीन उपक्रम राबवू, असा संकल्प मी केला. त्यानुसार गेली सहा वर्षे मी ही जबाबदारी नेटाने पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. संचालक मंडळाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
गेल्या काही वर्षांत संस्थेने शैक्षणिक संस्थांना मोठ्या प्रमाणावर मदत केली. शालेय संस्थांची गरज पाहून त्यांना मदत करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ मदत म्हणून वस्तू किंवा वह्या-पुस्तके देण्यापेक्षा, एखाद्या मदतीचा लाभ वर्षानुवर्षे शाळेला कसा होईल, याची काळजी वेळोवेळी घेण्यात आली. वनीकरण प्रकल्प, वटवृक्ष लागवड मोहीम, वनराई बंधारे आदी महत्त्वाचे प्रकल्प माझ्या कार्यकाळात आम्ही संस्था म्हणून हाती घेतले होते.
चांगल्या कामांना विरोध होणे, हे तसे अगदी स्वाभाविकच आहे. मात्र, आम्हाला सुदैवाने अशा कुठल्याही प्रसंगाला आजवर सामोरे जावे लागले नाही, याउलट ज्या ज्या ठिकाणी आम्ही मदत पोहोचवली, त्यांचे आशीर्वाद आम्हाला, बँकेला, आमच्या ग्राहकांना ईश्वरकृपेने मिळत गेले आणि आमच्या कामांचा आलेख हा वाढतच गेला. बर्याचदा ग्रामीण भागांत मदतीसाठी गेल्यानंतर तिथून मिळणार्या प्रतिक्रिया फार बोलक्या असतात. त्यांच्याकडून मिळणारी कौतुकाची थाप ही या सर्व खटाटोपाला मिळणारे बक्षीस ठरते. शैक्षणिक संस्थांना मदत केल्यानंतर तेथील शिक्षकवृंद असो वा विद्यार्थी या दोन्हींकडून उपक्रम यशस्वी झाल्याची पोचपावती मिळते, तेव्हा आनंद होतो.
बँकेचे अनेक कर्मचारी स्वयंस्फूर्तीने आपले हे कर्तव्य म्हणून नेमून दिलेली ही सर्व जबाबदारी पार पाडत असतात. यातील कित्येकजण हे अधिकारीपदावर असतात. मात्र, काम करत असताना लहानशा गोष्टींसाठीही एखाद्या व्यक्तीची गरज भासते. त्यावेळी तिथे वरिष्ठता किंवा ज्येष्ठता विसरून हे काम पार पाडले जाते. संस्थेचे काम करताना तसा भेदभाव होत नाही. या कारणामुळे सहकर्मचार्यांशी आपुलकी वाढत जाते. प्रामुख्याने बँकेतील तरुण कर्मचारीवर्ग या कामात स्वतःला झोकून देत असतो. त्यांच्याकडून आम्हालाही प्रेरणा मिळत असते.
ठाणे जिल्ह्यातील शहरी भागांतील शाळा व महाविद्यालयांना प्रोजेक्टर्स देण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आला होता. याचा फायदा विद्यार्थ्यांना ‘ई-लर्निंग’ आणि डिजिटल तंत्रपद्धतीने शिक्षणासाठी झाला. विद्यार्थ्यांना पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन सादर करण्यासाठी असो किंवा शिकवण्यासाठी असो, याचा फायदा झाल्याच्या प्रतिक्रिया त्यावेळी शिक्षण संस्थांकडून मिळाल्या. ग्रामीण भागांतील शाळांना ज्या ठिकाणी ग्रीन बोर्ड वाटप करण्यात आले होते, याचा फायदा त्या त्या संस्थांना होतो, हे पाहून आनंद होतो. शैक्षणिक क्षेत्रातील मदत ही एक जर गुंतवणूक मानून चाललो, तर येत्या काळात आपल्याला विद्यार्थ्यांच्या रूपात चांगला परतावाही मिळेल.
संस्थेत कर्मचारी असल्यापासूनच या विश्वस्त किंवा अधिकार्यांनी नेमून दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडत आलो आहोत. त्यामुळे आता पदावर असताना वेगळी मेहनत घेण्याची किंवा त्यासाठी वेगळा वेळ राखून ठेवण्याची गरज भासत नाही. मात्र, जेव्हा गरज भासेल तेव्हा बँकेच्या कामाव्यतिरिक्त जास्त वेळही द्यावा लागतो. नेमून दिलेली कामे वेळच्यावेळी पूर्ण केल्यास दोन्ही कामांची सरमिसळ होत नाही. समाजाप्रति आणि संस्थेबद्दल असलेले दायित्व म्हणून हे काम निःस्वार्थी भावाने आम्ही सर्वजण एक टीम म्हणून करत असतो.
मी लहानपणापासूनच संघ स्वयंसेवक असल्याकारणाने विविध सामाजिक उपक्रम आणि समाजकार्य हे माझ्यासाठी अजिबात नवे नाही. लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या सोडवण्याचे शिक्षणरूपी संस्कार माझ्यावर त्या काळातच झाले होते. भगवानराव जोशी १९७५ साली नगराध्यक्ष झाले. त्यावेळी ते बँकेचे संस्थापक-अध्यक्षही होते. त्या काळात त्यांनी या दोन्ही पदांसाठी मिळणारे मानधन घेतले नाही. ही रक्कम त्यांनी समाजकार्यासाठी वापरली होती. माझी आई पद्मा आघारकर व माझे काका श्रीकृष्ण आघारकर यांनी केलेल्या समाजकार्याचाही माझ्यावर मोठा परिणाम झाला. घरातही समाजशील वातावरण असल्याने मला समाजकार्याची गोडी ही बालपणापासूनच लागत गेली. त्यामुळे समाजकार्यात सहभाग घेण्याची सुरुवात ही अगदी बालपणापासूनच झाली होती, असे मी म्हणेन.
मागे वळून पाहिले असता, गेली ३१ वर्षे बँक, संस्था आणि मी असा एक दुसरा परिवार असा काहीसा हा मेळ म्हणावा लागेल. संचालकांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरवत नेमलेली कामे व्यवस्थितपणे पार पाडत आपण हा रथ इतकी वर्षे यशस्वीपणे चालवला. त्यात याच परिवारातील संचालक, अधिकारी आणि सर्वात शेवटच्या स्तरावरील कर्मचारी यांच्याशिवाय हे सगळे शक्य नव्हते. या सार्यांनीच दाखवलेल्या विश्वासामुळे मला ऑगस्ट २०१९ मध्ये संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणखी तीन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. याला मी माझ्या कामाची पोचपावतीच म्हणेन.
खरंतर असे कुठलेही लक्ष्य निर्धारित केलेले नाही. कारण, एक संस्था म्हणून काही आर्थिक मर्यादा आम्ही स्वतःला घालून घेतल्या आहेत. कारण, संचालकांची सभाशुल्काची रक्कमच आपण मदत म्हणून वापरू शकतो. तसेच इतर कुठलीही खासगी मदत संस्था स्वीकारत नाही. त्यामुळे काही मर्यादा येतात, हे सत्य आहे. मात्र, येत्या काळात संस्थेची स्वतःची वास्तू असावी, असा आमचा मानस आहे.
संस्थेचा पुरस्कार निवडून देणारी एक सदस्य समिती असते. त्यांच्यामार्फत ही निवड केली जाते. यंदाच्या वर्षी निवडलेल्या तिन्ही उद्योजकांचे आपल्या क्षेत्रातील उंची आणि समाजकार्य खूप मोठे आहे. कृष्णलाल धवन यांनी शैक्षणिक क्षेत्रात, भास्कर शेट्टी यांनी वैद्यकीय क्षेत्रात, तर महेशभाई अगरवाल यांनी विविध संस्थांमार्फत केलेल्या समाजकार्यामुळे त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे. त्याबद्दल त्या सर्वांचे अभिनंदन!
- (मुलाखत
: तेजस परब)