पोलादी मनगटांचा कणखर उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2019   
Total Views |

asf_1  H x W: 0

 


वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून स्टील उद्योगक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कृष्णलाल धवन यांच्या व्यावसायिक कारकिर्दीलाही आता ६० वर्षं पूर्ण झाली. व्यवसायाला समाजसेवेची जोड देत सर्वार्थाने 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी'ही त्यांनी प्रत्यक्षात अमलात आणली. त्यांच्या या कार्याचा गौरव 'दि कल्याण जनता सहकारी बँक लि. संचालक समाजसेवा पुरस्कार निधी विश्वस्त संस्थे'तर्फे केला जाणार आहे. त्यानिमित्त धवन त्यांच्या कार्यक्षेत्राचा घेतलेला हा आढावा.


वर्ष १९४७... भारत-पाकिस्तान फाळणीचा काळ. पाकिस्तानातील लाखो हिंदू जीव मुठीत घेऊन हिंदुस्थानकडे वळले. त्यांपैकीच एक म्हणजे कृष्णलाल धवन. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात ११ मे, १९३७ रोजी त्यांचा जन्म झाला. पण, फाळणीवेळी ते दहा वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. वयाच्या दहाव्या वर्षापासून स्टील उद्योगात कार्यरत असणारे धवन भविष्यात शंभर कोटी उलाढाल असलेल्या कंपनीचे मालक होतील, याचा विचारही तेव्हा कुणी केला नव्हता. फाळणीनंतर त्यांना दिल्लीत स्थायिक व्हावे लागले होते. तिकडे त्यांच्या मामांनी स्टील व्यापार करणारी कंपनी सुरू केली होती. तिथे नोकरी करताना हळूहळू कृष्णलाल व्यवसायातील बारकावे आत्मसात करत होते. जसजशी वर्षे सरत गेली तसा धवन यांचा या क्षेत्रातील अनुभवही दांडगा होत गेला. ही पुंजी त्यांना आयुष्यभर साथ देणारी ठरली. १९६६ साली त्यांनी कल्याणमध्ये स्थायिक होण्याचे ठरवले. मामांसोबत व्यवसाय करण्याचा त्यांनी निश्चय केला आणि 'मे. मल्होत्रा स्टील प्रोडक्ट' ही भागीदारी तत्त्वावरील कंपनी सुरू केली. व्यवसाय सुरू करताना त्यांच्याकडे असलेल्या कंपनीतील यंत्रसामग्रीचाच भांडवल म्हणून वापर केला. हळूहळू व्यवसायाला गती मिळू लागल्यानंतर त्यांनी व्यवसायाच्या विस्तारावर लक्ष केंद्रीत केले. १९७२ साली त्यांनी 'मॅक स्टील इंडस्ट्रीज'ची स्थापना केली. पुढील १२ वर्षे त्यांनी व्यवसायात बरेच चढउतार पाहिले. पण, हार न मानता अनेक अडचणींवर मात करत आपल्या सर्व कंपन्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेतही तग धरून राहतील,याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली.

 

१९८४ साली 'मे. कोणार्क एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड' या स्टील उत्पादन कंपनीची त्यांनी स्थापन केली. स्टील बार आणि अन्य उत्पादनांची निर्मिती या कंपनीतर्फे केली जाऊ लागली. सलग दहा वर्षे या कंपनीचा व्यवहार धवन यांनी एकहाती सांभाळला. नव्या कंपनीत जम बसवताना आपल्या जुन्या कंपन्यांतील हिस्सा मात्र धवन यांना विकावा लागला. सरकारी धोरणे असोत किंवा बाजारातील स्पर्धा यांसारखी कारणे त्यांच्या व्यवसायातील धोरण बदलांसाठी कारणीभूत ठरत गेली. स्टील उद्योगातील प्रदीर्घ अनुभवामुळेच त्यांनी या क्षेत्रातील विविध उत्पादनांच्या निर्मिती व विपणनात कौशल्य प्राप्त केले होते. १९९४ साली त्यांनी 'मल्टिस्टील इंडस्ट्रीज' या कंपनीची स्थापना केली. तेव्हापासून ते आजतागायत त्यांच्या व्यवसाय विस्ताराचा वटवृक्ष कंपनीतील शेकडो कर्मचाऱ्यांना सावली देत आजही तग धरून उभा आहे. १९९४ साली सुरू झालेल्या 'मल्टिस्टील इंडस्ट्रीज'चे मुख्य कार्यालय सध्या कल्याणच्या मुरबाड रस्त्यावर आहे, तर मूळ कारखाना हा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात सापरोंडे या भागात आहे. आज शंभरहून अधिक कर्मचारी दिवसरात्र या साऱ्या कारभाराचा एक भाग म्हणून आपापली जबाबदारी पार पाडत असतात. त्यांचे मालक आणि सर्वेसर्वा धवन सर हे या सर्व कुटुंबाची अगदी आपुलकीने काळजी घेतात. कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी असो वा पैशांची कुठली नड, या साऱ्या अडचणींवर धवन सरांकडे उत्तर मिळेल, असा विश्वास त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो.

 

उद्योग स्थिरस्थावर होण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज असते. 'कल्याण जनता सहकारी बँके'च्या रुपाने ही कसर भरून निघाली. बँकेने वेळोवेळी केलेल्या कर्जरुपी मदतीमुळे 'मल्टिस्टील इंडस्ट्री' तग धरू शकली. सहकार क्षेत्रातील बँक म्हणून 'कल्याण जनता सहकारी बँके'ने अनेक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना आर्थिक पाठबळ दिले, त्यापैकीच एक उद्योजक म्हणजे कृष्णलाल धवन. उमेदीच्या काळात बँकेने केलेली मदत ते अजूनही विसरलेले नाहीत. आपल्या इथवरच्या प्रवासाबद्दल सांगताना बँकेचा उल्लेख ते ठळकपणे करतात. आज 'मल्टिस्टील'चा वाढलेला पसारा पाहता, त्यांना व्यावसायिक कर्ज घेण्याची गरजही उरलेली नाही. मात्र, इथवर पोहोचण्याचे श्रेय ते बँकेने त्यावेळी दाखवलेल्या विश्वासालाही आवर्जून देतात. 'मल्टिस्टील'च्या पसाऱ्यात धवन यांचे दोन्ही सुपुत्र आपली भूमिका चोख बजावतात. अनुराग धवन यांच्याकडे उत्पादन विभागाची, तर त्यांचे धाकटे बंधू मंजूल धवन यांच्याकडे विक्री व विपणनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पिढ्यान्पिढ्या सुरू असलेलाहा व्यवसाय आणखी जोमाने पुढे नेण्याचे काम धवन यांची पुढील पिढीही जोमाने करत आहे. अर्थात, यांतही त्यांचे वडील कृष्णलाल धवन यांच्याच संस्काररुपी शिकवणीचे प्रतिबिंब उठून दिसते. ग्राहकांशी कायम पारदर्शी व्यवहार, त्यांचे प्रश्न ऐकून घेणे व त्यावर योग्य तो तोडगा काढणे, त्यांना संतुष्ट ठेवणे ही शिकवण त्यांनी आपल्या पुढील पिढीलाही दिली आहे. यामुळे कमावलेल्या विश्वासावरच हा प्रवास इथवर पोहोचू शकला. 'मल्टिस्टील' ही कंपनी आपले सर्व व्यवहार हे स्थानिक पातळीवरच करते. औद्योगिक क्षेत्राला लागणाऱ्या यंत्रणांत आवश्यक ती सामग्री पुरवणे हे व्यवसायाचे मुख्य स्वरूप आहे. व्यवसायाव्यतिरिक्त सामाजिक क्षेत्रातही धवन यांचा वाटा मोलाचा आहे.

 

एका हाताने केलेले दान हे दुसऱ्या हाताला कळता कामा नये, हा संकल्प त्यांनी आयुष्यभर जपला. त्यामुळे आपण केलेल्या समाजकार्याची वाच्यता ते कुणाकडेही करत नाही. केलेल्या मदतीचा उल्लेखही संबंधित व्यक्ती किंवा संस्थेने कुठे करू नये, अशी अट मदतीपूर्वीच घालतात. त्यामुळे कल्याण आणि इतर परिसरात सामाजिक क्षेत्रातील हा एक आधारस्तंभ प्रकाशझोतात कधी आलाच नाही आणि तशी संधी आल्यास त्यालाही त्यांनी कायम नकारच दिला. त्यांच्या कार्यकाळातील लक्षात राहण्याजोग्या समाजकार्याची माहिती त्यांच्या परिचितांकडून दिली जाते. ते वर्ष होते १९७८चे. कल्याणमध्ये सुरू असलेली लॉर्ड्स इंग्लिश हायस्कूल ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती. अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार होते. कुठूनतरी ही बातमी धवन यांच्या कानावर आली. ऐन परीक्षेच्या काळात शाळा बंद होणार म्हटल्यावर पालकवर्गातही चिंतातूर होता. धवन यांनी पालकांची भेट घेत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. पालकांचे एक विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात आले. या संस्थेवर एकमताने धवन यांची निवड करण्यात आली. 'कल्याण एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना करण्यात आली. या अंतर्गत सर्व समस्या दूर करून बंद पडण्याच्या मार्गावर असलेली शाळा पुन्हा सुस्थितीत येऊन पोहोचली. पुढे ही शाळा 'श्रीमती कांताबेन चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूल' म्हणून ओळखली जाऊ लागली. एकेकाळी बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या या शाळेला धवन यांची महत्त्वाकांक्षा इथवर घेऊन आली. कल्याणच्या भानुनगर येथील शाळेची नवी इमारत या इतिहासाची साक्ष देत उभी आहे. इतकी वर्षे आपल्या पंखाखाली ज्ञानाची सावली घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना उज्ज्व्ल भविष्याचा मार्ग आत्तापर्यंत याच शाळेने दाखवला आणि भविष्यात कित्येक वर्षे हा वसा अविरत चालू राहील. शाळेच्या संस्थेचे संस्थापक सदस्य असल्यापासून त्यांनी वेळोवेळी लागणारी सर्वोतोपरी मदत केली. शाळेला नवीन इमारत उभी करण्यासाठी लागणारी जागा असो किंवा कुठलीही आर्थिक मदत, धवन यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून कायमच संस्थेला सर्वोतोपरी मदत केली.

 

आपल्या कार्यातून हजारो हातांना समाजसेवेची प्रेरणाही धवन यांनी दिली. 'रोटरी क्लब ऑफ कल्याण' या समाजसेवी संस्थेतर्फे ते वयाच्या ८३व्या वर्षीही समाजकार्यात सदैव अग्रेसर असतात. वाडा येथील कारखान्याजवळील वस्त्या, गावे आणि खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना आवश्यक ती मदत असो वा त्यांचा रोजगाराचा प्रश्न असो, वैयक्तिक खर्चातून यासाठीचे आवश्यक उपक्रम ते वर्षभर राबवितात. २०१७ साली डॉ. एम. एल. ढवळे स्मरणार्थ ट्रस्ट, पालघर या वाडा येथील वनवासी आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थेला अद्ययावत वैद्यकीय उपकरणे आणि मदत धवन यांनी केली होती. आपल्या व्यवसायाच्या पसाऱ्यातून वेळ काढत समाजकार्य करण्याचा हा वसा त्यांनी आजन्म जपला. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना 'दि कल्याण जनता सहकारी बँक लि. संचालक समाजसेवा पुरस्कारा'ने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. उद्योजक म्हणून भूमिका निभावतानाच आपल्या व्यवसायाच्या पसाऱ्यातून उर्वरित वेळ समाजकार्य करण्याचा हा वसा त्यांनी आजन्म जपला. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना 'दि कल्याण जनता सहकारी बँक लि. संचालक समाजसेवा पुरस्कार' जाहीर झाला आहे. उद्योजक म्हणून भूमिका निभावतानाच समाजसेवेचा अविरत वसा जपणाऱ्या या एका आधारस्तंभाला सलाम...!

@@AUTHORINFO_V1@@