काळ्या पाण्यातली गाळीव रत्ने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2019
Total Views |


anuradha khot_1 &nbs



अंदमानचे सेल्युलर जेल मराठी माणसांच्या ओळखीचे झाले ते सावरकरांच्या ‘माझी जन्मठेप’ या आत्मकथनातून. योगी अरविंदांचे धाकटे बंधू बारींद्र कुमार घोष (जन्म १८८०-मृत्यू १९५९) हे ही त्या तुरुंगात होते. ‘द टेल ऑफ माय एक्झाइल’ या त्यांच्या आत्मकथनातून त्यांच्या तेथील १२ वर्षांच्या वास्तव्यामधले अनुभव कळतात. यातील एका प्रकरणाचा हा अनुवाद...



अंदमानाच्या तुरूंगात पाठवलेले कैदी म्हणजे दुर्गणांचा नि दुर्गतीच्या खातेर्‍यात फेकले गेलेले जीव
! ती परिस्थिती भयंकरच आणि त्यात आशेचा किरणही नाही. यामुळे तिथे येणारी माणसं कित्येकदा बदलूनच जात. त्यांचा मूळ स्वभाव विकृत होई. वारंवार दिल्या जाणार्‍या शिक्षा आणि अतिटोकाची निराशा यांमुळे काही संतापाने उकळत असायचे. काही पूर्णपणे कडवट बनून जायचे. महावीर आणि सैय्यद ही आम्हाला भेटलेली पात्रं याची उदाहरणं होती.



महावीरची नि आमची भेट होण्यापूर्वी त्याने निदान सात
-आठवेळा तरी चाबकाचे फटकारे खाल्ले होते. बाकीच्या शिक्षाही कितीदा भोगल्या होत्या, ते मोजक्यापलीकडेच! तसा तो उंच होता. काहीसा रोगट पण हिंस्र दिसे. त्याच्या ओठावर रात्रंदिवस शिव्या असायच्या. प्रचलित शिव्या त्याला पुरायच्या नाहीत. त्याला स्वतःला नव्या शिव्या तयार करायला लागायच्या. मिस्टर मरे हा ब्रिटिश अधिकारी बुटका होता. त्याला महावीरने ठेवलेले नाव होते ‘बटेरिया.’ ‘बटेर’ हा पक्षी छोटा बुटका असतो. बॅरीना तर त्यानं शंभर एक नावं दिली असावीत अन् या सार्‍या सहस्रशिवीनामांचे पारायण सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा चाले. तेही नुसते नव्हे, तर साभिनय. त्याला कायम मलावरोधाची तक्रार होती नि त्यामुळे त्याला भूक लागत नसे. त्याची मात्र खात्री होती की, जेवणातली काचूची पालेभाजी जी तो तुरूंगातल्या रोजच्या जेवणात गेली ३० वर्षे खात आला होता, तिनेच त्याची भूक मारली. तंबाखूसाठी तो कुणाचेही पाय धरायला तयार असे. न मिळाल्यास शिव्यांची लाखोली वाहताना तो प्रत्यक्ष देवालाही सोडायचा नाही. कोणीही बाहेरचा अधिकारी तुरुंग तपासणीसाठी आला तर आपल्या गार्‍हाण्यांचं गुर्‍हाळ त्यांच्यापुढे लावण्यात हा पठ्ठ्या पहिला. सार्‍या तक्रारी सांगूनही जर काहीच परिणाम वा बदल झाला नाही तर त्या अधिकार्‍याला जे अगणित ‘शुभाशीर्वाद’ हा द्यायचा ते वर्णनातीतच!



सैय्यद हा वयाने वृद्धत्वाकडे झुकलेला
. हा उंच होता. पांढरी दाढी आणि लालबुंद डोळे. तशीच भयंकर वाईट, डंख करणारी जीभ. स्तुती करायची ठरवली तर तिच्यातही त्याचा हात धरणाराकुणी सापडणार नाही. तसंच शिव्या द्यायच्या तर त्यातही तेवढाच पोहोचलेला. महावीराच्या सगळ्या गुणांची वस्ती त्याच्यामध्ये होती. पण कधीकधी तो रंगात यायचा तेव्हा मजा वाटायची. विशेषत: थोडा तंबाखू मिळाला तर जो काय आनंदोत्सव असायचा... ते उड्या मारणं काय, नाचणं काय, अंगविक्षेप करीत ते ‘गडका’ चालवणं काय! ‘गडका’ म्हणजे लहान लाकडी दांडकं. त्याचे हात तो करून दाखवी. ते करताना मध्ये मध्ये आरोळी असे वीररसाची - ‘बोम् काली कलकजेवाली...’ तुरुंगात असल्याच्या डांबलं गेल्याच्या वेदना असह्य झाल्या तर कधीकधी तो शिव्या नि आरडाओरडीने तुरुंग दणाणून सोडायचा.



त्याला उत्तमोत्तम स्वादिष्ट अन्नाचा सोस होता
. कबाब, पुलाव, कोफ्ता, कोर्मा सारी नावं एक श्वासात घेऊन तो म्हणायचा, “सैय्यद फक्त असलं जेवण घेतो माहितेय? अन् त्याला इथे पाहा काय खावं लागतं- काचूची भाजी अन तूरडाळीची आमटी! देवा-देवा काय ही दुर्दशा! याला ज्या कोठडीत डांबले असेल त्या अख्ख्या विभागाला रात्री क्षणभरसुद्धा झोप मिळायची नाही. इतका आरडाओरडा त्याचा चालू असे. कोठडीच्या दाराशी बसून त्याची शिवीगाळ चालू राही. शेवटी कोणीतरी येऊन त्याला थोडी तंबाखू दिला म्हणजे कुठे तो शांत व्हायचा... बॅरीला कधी कधी अशा रात्री तो खच्चून शिव्या घाली. त्यात तो बॅरीला ‘भंगी’ म्हणून मोकळा व्हायचा! एखाद्याला जर जबर शिक्षा द्यायची असेल तर त्याला सैय्यदच्या शेजारच्या कोठडीत डांबायचं. सैय्यदचा स्वभावच होता. स्वत: त्रागा करणं नि दुसर्‍यांना वैताग आणणं. शेवटी कॅप्टन मरेंनी दयाळू होऊन सैय्यदला मनोरुग्णांच्या हॉस्पिटलचा रखवालदार म्हणून नेमलं. यानंतर त्यानं शिवीगाळ आणि आरडाओरडा यांना कायमची रजा दिली असं आम्हाला कळलं.



या तुरुंगातला आणखी एक
‘प्रसिद्ध’ नमुना म्हणजे ‘मुर्गा.’ हा मनुष्य अगदी उंचधिप्पाड, राक्षसी आकाराचा जवळ जवळ! काळा रोम, केसाळ, भुतासारखा दिसायचा. त्याच्या झुबकेदार मिशांचा झाडू करता आला असता! त्याला तेलाच्या घाण्याला जुंपण्यासाठी बॅरीसाहेब त्याला जास्तीचं दही देऊन किंवा केळी देऊन राजी करीत. हा ‘मुर्गा’ आणि त्याचा दोस्त ‘शेरा’ हे दोघेही दिवसाला ८० पौंड तेल प्रत्येकी काढीत. आधी प्रत्येक बंदीने २० पौंड तेल काढावे असा नियम होता. परंतु, बॅरीसाहेबांची मर्जी नि या दोघांचे हे ८० पौंड तेल काढणं यामुळे प्रत्येक बंद्यानं प्रतिदिवशी ३० पौंड तेल काढण्याचा हुकूम निघाला. त्या छळवादी बॅरीसाहेबाला ह्या बंद्यांना भरडून काढायला छानच मार्ग मिळाला. प्रत्येकाचं काम वाढत चाललं. या काळ्या पाण्यात माझी दोन-तीन ब्रह्मदेशी तरुणांशी ओळख झाली. ते केवळ १६-१७ वर्षांचे होते. हे ब्रह्मदेशी बंदी बव्हंशी अफीमबाज, जुगारी नि दुष्ट वृत्तीचे असत. परंतु, तो-आह् नावाचा एक फोनहान् नावाचा दुसरा नि तिसर्‍याचे नाव मी विसरले, पण हे तिघेजण खरोखरीच फार चांगले निघाले.



पण याचा अर्थ असा नव्हे की
, ते गुन्हेगार नव्हते. वर्षाकाठी एखाद्-दुसरा गुन्हा घडायचा त्यांच्याकडून! पठाण आणि पंजाबी मुसलमान हे अत्यंत परावृत्तीचे असत आणि या गोर्‍या वर्णाच्या नाजूक आणि सुरेख दिसणार्‍या ब्रह्मदेशी युवकांच्या मागे नुसते हात धुवून लागत. यांनी त्यांना पापात सहकार्य नाही दिलं की ते खोट्या तक्रारी करून तांडेल, जमादार, पेटी ऑफिसर्स यांच्याकडून त्यांना भयंकर त्रासात टाकत. बिचारे ते निरपराध असत, तरी त्यांना त्या शिक्षांना त्रासाला तोंड द्यावं लागे. इथे सार्‍या (राजकीय बंदी सोडून) बंद्यांकडे काही ना काही परवानगी नसलेली वस्तू लपवलेली असते. तंबाखूसारखी अन् कुणी ना कुणी चहाडी केल्याने ते सतत शिक्षा खात असतात. दुसर्‍याने केलेले काय आपले म्हणून दाखवायचे नि त्याला शिक्षा भोगायला लावायची. हा प्रकारही चालू असतो.



कार्तिक हा बंदी मुळात चांभार होता
. हा दरोडेखोरीत पकडला जाऊन इथे शिक्षा भोगत होता. मनाने मोठा मजबूत, शरीरानेही तसाच. उत्साही आणि लढाऊ वृत्तीचा होता. दरोडेखोरी त्याने एखाद्या खेळासारखी स्वीकारली होती. दरोडेखोरी म्हणजे त्याचा जणू छंद होता. एरवी तो मनाने सज्जन, दयाळू होता. एखाद्याला त्याने ‘आपले’ म्हटले तर त्याच्याकरिता तो जीव देईल. एकदा उपेनंदांनी (उपेंद्रनाथ बॅनर्जी) त्याला बसवून घेऊन हिंदू-मुस्लीम एकता कशी चांगली आहे, कशी झाली पाहिजे, यावर एक भाषण ठोकलं. त्यानेही ते शांतपणे ऐकून घेतले. त्यांनी सांगितलेले सारे काही त्यांना पूर्ण व्यवस्थित ऐकवलं नि मग शेवटी एक प्रश्न अगदी शांतपणेच विचारला.



“छोटे मालक म्हणत आहेत ते सारं बरोबरच आहे. पण, त्यांनी खर्‍या जन्मात एकदाही ते गोड हरिनाम उच्चारलं नाही. त्यांची गत अखेरीस काय बरं होईल?” हेमदांचा तर तो अतिशय आज्ञाधारक परमभक्तच नि मासे पकडण्यात त्याचा हात धरणारा कोणी नव्हता. अतिशय इमानदार, विश्वासू, प्रेमळ माणूस. अगदी साधुवृत्तीचीसुद्धा काही माणसं आहेत इथे. मथुरासिंग १० ते १२ वर्षांच्या नोकरीनंतर पेटीऑफिसरचा तांडेल झाला. बढती मिळाली. अतिशय स्वच्छ पवित्र विचारांचा, सभ्य, दयाळू मनुष्य. त्याच्या जिभेवर कधीही शिवी आली नाही. असल्या नरकात राहूनही त्याच्या व्यक्तिमत्त्वात एकाही वाईट विचाराचा, दुर्गुणाचा अंश शिरला नाही. कधीकधी तो रागावण्याचा आविर्भाव आणून हात उभारायचासुद्धा. परंतु, त्याचा तो भलामोठा पंजा कैद्याच्या पाठीवर पडताना कसा कोण जाणे, कुरवाळल्यासारखा पडायचा आणि जादू व्हावी तशी त्याने सांगितलेली कामे मुकाट पार पडत. तोंडाने तो धमक्याही द्यायचा. परंतु, त्या ‘गर्जेल तो पडेल काय?’ या म्हणीतल्या ढगांसारख्या पोकळ ठरत. कैद्यांविषयीच्या अफाट कणवेने त्याचे मन भरलेले असे. ‘तुलसी रामायणा’चे काही वाचन केल्यावाचून तो जेवीत नसे. लहान मुलासारखे साधे, सकळ, निष्पाप मन होते त्याचे. अशा माणसाला तुरुंगात डांबणे म्हणजे जवळजवळ बालहत्याच ती! पुढे त्याला काहीतरी काम करून स्वतःची उपजीविका करण्याची संधी मिळाली.



ताकतसिंग हा सेल्युलर जेलचा दरबान
‘सागर’चा राहणारा. तो काही इंग्रजी फार शिकलेला नव्हता. परंतु, त्याचे वागणे भारी सुसंस्कृतपणाचे असे. भारताचे, एकंदरीत जगाचेसुद्धा त्यावेळचे प्रश्न त्याला माहिती असत. तो मोठ्या जमीनदार घरातला मुलगा होता. त्या जमिनीबाबतच्या भांडणात त्याच्या कुळांपैकी किंवा नोकरांपैकी कुणी एकाने एक खून पाडला. त्या संदर्भात त्याला शिक्षा होऊन तो इथे आला. मुळात अतिशय चांगला होता. आता या नरकसमान जागेत, सतत कष्ट दुःख देणार्‍या वातावरणात राहून तो कोमेजत चालला होता. शिक्षा होऊन तुम्ही कोणाही कल्याण नाही करू शकत. एखाद्याने खून केला तरी त्याची शिक्षा म्हणून त्याला दुर्गुण आणि पापांनी भरलेल्या अशा विवरात ढकलून देणे, हा त्या खुनापेक्षाही मोठा गुन्हा आहे. जो भयंकर निर्ढावलेला गुन्हेगार नाही, अशा प्रत्येकाला भयावह शिक्षा जन्मभराची देणे हेच पाप आहे. अशा माणसाला एखाद्या उदात्त विचाराच्या, सभ्य, दयाळू मनुष्याच्या हाती सोपवले पाहिजे, तर तो सुधारेल. इथे तर उलटेच घडते. जे धूर्त, लबाड, दुष्ट ते कधीच पकडले जात नाहीत. उलट त्यांना अधिकाराची जागा देण्यात येते नि सज्जन, निरपराध, चांगला माणूस तर्‍हेतर्‍हेच्या छळाखाली भरडला जातो.



मिर्झाखान पठाण होता
. अंदमानात जाण्यापूर्वीच्या माझ्या आनंदाने भरलेल्या आयुष्यात मी देशविदेश फिरलो होतो. मनुष्य स्वभावाचे कित्येक नमुने पाहिले होते. परंतु, या मिर्झाखानइतका धूर्त, कारस्थानी मनुष्य कधी पाहिला नव्हता. सैतान होता तो. लाल दाढीच्या, लाल चेहर्‍याच्या नि हवी तशी जीभ चालवू शकणार्‍या या माणसापुढे दुर्गुण नि दुष्टपणा यात गुलाम रसूलसारखे इतर अनेक म्हणजे ‘किस झाडकी पत्ती!’ त्याचे वागणे ‘शिस्ती’चे आणि बॅरीपुढे लाळघोटेपणा करणारी जीभ चतुर. त्यामुळे बॅरीला ती त्याला हवे तेव्हा हवे तसे नाचवी, भडकवी आणि अत्यंत स्वच्छ वर्तनाच्या निष्पाप माणसालाही त्याच्याकडून भयंकर शिक्षा देववत असे. धैर्यवान माणसाशी तो जरा नमून असे, पण दुसर्‍यांचा तो असा छळ करी की विचारायला नको. विशेषतः एखाद्याला ‘बाबुजी’ वगैरे चांगल्या शब्दाने संबोधून तो गोड बोलू लागला तर खात्रीने समजायचे की, ‘बाबुजी’चे दिवस भरले!



हे असले दुष्ट छळवादी जे असतात
. त्यांचीही कुठेतरी एक जागा कमकुवत असते. तेसुद्धा स्तुतिप्रिय असतात. या माणसाला मोठ्या आदराने ‘जमादारजी’ म्हटले म्हणजे तो खूष! त्याच्या छळात सापडू नये म्हणून काहीजण त्याला तो दिसला की सलाम ठोकून मोकळे होत. बॅरीशी जो गप्पा मारू शकतो, त्यालाही तो त्रास देत नसे. देण्याची हिंमत करीत नसे. तांडेल, जमादार, पेटी ऑफिसर असे जुलूमशहा, छळवादी तिथे संख्येनं बरेच होते. कैद्यांना भल्याबुर्‍या कुठल्याही तर्हेने स्वतःचा बचाव करण्याची सिद्धता सदैव ठेवावी लागे. त्यांच्या मेंदूला कायम कुरतडणारी चिंता हीच असे की, स्वतःला जिवंत ठेवायचं कसं? सुपरिटेंडेंट किंवा कमिशनर यांच्यासारख्या उच्च अधिकाना हे सारे कशाला माहिती असते नि कसे माहिती होणार? ओव्हरसीअर पर्यवेक्षकाच्या दर्जाच्या अधिकार्‍याला बरेच काही कळत असेल तरी त्याला स्वतःलाही वाचवायचे असते! एखादा मि. डगन् यांच्यासारखा अधिकारी असतो जो स्वतःच्या अधिकारात बसेल तिथपर्यंत तरी निरपराध्याला अभय देतो. त्याला त्रास देऊ पाहणार्‍याला दरडावतो, धाक घालतो.नाहीतर इथे कुणी कुणाचा वाली नाही!

मूळ लेखक : बारीन्द्रकुमार घोष

(अनुवाद : अनुराधा वसंत खोत)

@@AUTHORINFO_V1@@