तो ‘हिंदू’ होता म्हणूनि...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2019
Total Views |


agra_1  H x W:



शोएब अख्तरने दानिश कनेरिया केवळ ‘हिंदू’ होता म्हणून, पाकी क्रिकेटसंघात त्याच्यावर गुदरलेल्या अन्यायाला वाचा फोडली. याचे गांभीर्य ओळखून तरी भारतात नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणार्‍यांच्या डोक्यात प्रकाश पडेल काय?



कब दुनिया को हिन्दू करने

घर-घर मे नरसंहार किया?

कब बतलाए काबुल में जा कर

कितनी मस्जिद तोड़ीं?

भूभाग नहीं, शत-शत मानव के

हृदय जीतने का निश्चय।

हिन्दू तन-मन, हिन्दू जीवन,

रग-रग हिन्दू मेरा परिचय!

अटलजींच्या या गाजलेल्या कवितेतील शब्द न् शब्द केवळ भारतीय हिंदूंसाठी समर्पित नाही, तर विश्वात वसलेल्या समस्त हिंदू बांधवांचाच तो जीवनपरिचय...हिंदू जगाच्या कानाकोपर्‍यात गेला, पण सुबत्ता, समृद्धी आणि संपन्नतेच्या निर्मितीसाठीच. त्याने मशिदींचा संहार केला नाही की कुठे चर्च जमिनीत गाडले नाहीत. फाळणीनंतरही हजारो हिंदू बांधव केवळ जमिनीशी इमान राखत कानपूरपेक्षा कराचीत स्थिरावले. अल्पसंख्याकांवर पाकिस्तानात कदापि अन्याय होणार नाही, सर्वांना समान वागणूक मिळेल वगैरे जिनामियांच्या वाद्यांवर कदाचित ते भाळलेही असावेत. पण, दुर्देवाने पाकिस्तानातील हिंदूंच्या वाट्याला आली ती केवळ उपेक्षा आणि अनन्वित अत्याचार.



हिंदूंच्या अस्तित्वावरच वारंवार पाकी राजसत्तेने
, जिहादी कट्टरतेने घाव घातले. या सत्तर वर्षांत काफिरांचे जिणेच हिंदूंच्या नशिबी आले. या ‘पाक’ देशात इतरही अल्पसंख्याकांची हीच दशा. पाकिस्तानातील हे काळेकुट्ट वास्तव जगाच्या पाठीवरही लपून नव्हतेच मुळी. म्हणूनच अमेरिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍या देशांच्या यादीत पाकिस्तानचा समावेश तसा स्वाभाविकच. पण, यावरून अमेरिका आणि भारतावरच उलट पाकिस्तानने आगपाखड केली. अमेरिकेचा हा निर्णय जर राजकीय हेतूने प्रेरित असता, तर त्यामध्ये ट्रम्प यांचे घनिष्ट संबंध असलेल्या सौदीचा साधा उल्लेखही नसता. त्यामुळे पाकिस्तानच्या कांगावखोरीला अमेरिकेने लाथाडलेच, पण आपल्याच देशाला आरसा दाखविण्याचे खरे धाडस केले ते पाकचा माजी जलदगती गोलंदाज, ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ शोएब अख्तरने!



एरवी भारतविरोधी गरळ ओकणार्‍या शोएबने नुकतीच एका पाकी वृत्तवाहिनीला सविस्तर मुलाखत दिली
. या मुलाखतीत त्याने केलेल्या गौप्यस्फोटामुळे खरं तर पाकिस्तानचा हिंदूविरोधी खरा खुनशी चेहरा पुन्हा एकदा समोर आला. दानिश कनेरिया हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील एक माजी फिरकी गोलंदाज. ‘तो देशासाठी खेळत होता,’ ही त्याची ओळख इथे तशी अपूर्णच ठरावी. कारण, दानिश हिंदू असूनही त्याने पाकिस्तानच्या क्रिकेट संघासाठी सर्वसमर्पणाने आपली कामगिरी बजावली. पण, त्याच्या क्रीडाकौशल्यापेक्षा त्याच्या हिंदूपणामुळे काही पाकी क्रिकेटपटूंनी दानिशला पदोपदी धुत्कारले. त्याच्याबरोबर एकत्र भोजनास्वाद तर दूरच, त्याच्याशी बोलणेही टाळले. खेळामध्येही धर्म आड आला. पण, दानिशने त्याचे मामा आणि पाकचे पहिले हिंदू क्रिकेटर ठरलेल्या अनिल दलपत यांचा आदर्शच डोळ्यासमोर ठेवला.



तो संघासाठी तन
-मन अर्पून उत्तम खेळला. याच हिंदू दानिशमुळे ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’ला इंग्लंडविरोधातला कसोटी सामना खिशात घालता आला. दानिशच्या योगदानाशिवाय कसे कित्येक सामने आम्ही जिंकलोच नसतो, हेही शोएब कबूल करतो. ६१ कसोटी सामन्यांत २६१ विकेट घेणारा, १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये देशासाठी अगदी जीव तोडून खेळणार्‍या दानिशच्या वाट्याला मात्र ‘फुलटॉस’च आले. संघातील क्रिकेटपटूच नाही, तर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्याही सापत्न वागणुकीचा दानिश बळी ठरला. ‘ड्रेसिंगरूम’मध्येच नाही, तर मैदानावरही दानिशला असेच दाबले जायचे. भारताविरोधातील एका सामन्यात सचिन तेंडुलकरची दानिशने विकेट घेतली. ही पाकिस्तानी संघासाठीही खरं तर अगदी निर्णायक विकेट. अशी महत्त्वाची विकेट गेल्यावर सगळेच खेळाडू घोळका करून जल्लोष करतात. एकमेकांचे अभिनंदन करतात. पण, दानिशच्या बाबतीत असे काहीच घडले नाही.



का
? तर, सचिन बाद होताच दानिशने देवाचे आभार मानण्यासाठी आकाशाकडे हात जोडून मनस्वी नमस्कार केला. ते बघताच, एकही पाकिस्तानी खेळाडू दानिशजवळ साधा फिरकलाही नाही. संघासाठी मैदानात एकाकी लढणारा तो जणू अस्पृश्य खेळाडूच. पण, दानिशने कधीही आपले हिंदूपण फुकाचे मिरवले नव्हते किंवा भारतावर स्तुतिसुमनेही उधळली नव्हती. तरीही दानिश पाकिस्तान क्रिकेट संघात कायम उपेक्षित आणि उपराच ठरला. त्याच्या कडव्या राष्ट्रनिष्ठेपेक्षाही हिंदू असण्याकारणाने दानिशचे दमन झाले. पुढे त्याच्यावर ‘स्पॉट फिक्सिंग’चे आरोप झाले आणि त्याचे होते-नव्हते करिअरही एकाएकी संपुष्टात आले. शोएब अख्तरने दानिशची दारुण कथा जगजाहीर केल्यानंतर दानिशनेही त्याला दुजोरा दिला. “हे सगळं सांगायचं धाडस माझ्यात नव्हतं.



पण
, शोएबमुळे मला हिंमत मिळाली. त्या खेळाडूंची नावेही मी लवकरच सांगीन,” म्हणत दानिशने या सांघिक, धार्मिक भेदभावाची इतक्या वर्षांनतर निंदा केली. जर देशासाठी खेळणार्‍या, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करणार्‍या खेळाडूसोबत असा घृणास्पद धार्मिक भेदाभेद होत असेल, तर पाकिस्तानातील तळागाळात राहणार्‍या हिंदूंची अवस्था किती बिकट असेल, याची कल्पना आपण करूच शकतो. संघातील खेळाडूंमध्ये मतभेद होणे स्वाभाविक, पण अशाप्रकारे धर्माच्या आधारे एखाद्या खेळाडूलाच संघांतर्गत वाळीत टाकणे कितपत योग्य? भारतीय संघातही बरेच मुस्लीम क्रिकेटपटू होऊन गेले. पण, त्यांचा धर्म कधीही त्यांच्या निवडीच्या, खेळाच्या आड दिला नाही. हाच मूलभूत फरक आहे, भारताच्या सर्वसमावेशक आत्म्यात आणि पाकच्या सर्वभक्षक राक्षसात... आता यामुळे अल्पसंख्याक पाकिस्तानमध्ये सुरक्षित असल्याची टिमकी वाजवणारे पंतप्रधान आणि पाकी क्रिकेट संघाचे कर्णधार राहिलेले इमरान खान मात्र तोंडावर चांगलेच आपटले आहेत. क्रिकेट संघ हा मैदानात देशाचे प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे आपसूकच त्या देशाचे संस्कार, वागणूक याची त्या-त्या देशांतील खेळाडूंच्या वर्तणुकीवरून प्रतिमा घडत असते. पण, हिंदू-मुस्लीम, कोण पेशावरचा, कोण कराचीचा, अशा धार्मिक, प्रादेशिक भेदांनीच पाकी क्रिकेट संघाला पुरते पोखरून ठेवले आणि त्याचेच दुष्परिणाम वेळोवेळी या संघाच्या कामगिरीतूनही प्रतिबिंबित झाले.



दानिश आणि त्यासारखे हजारो हिंदू पाकिस्तानात आज मूग गिळून हलाखीचे जीवन जगताहेत
. त्या सर्वांच्या नजरा भारताकडे आहेत. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणार्‍यांना पाकिस्तानातील हिंदूंची ही दयनीय अवस्था का दिसू नये? इथल्या मानवतावादाचे अवडंबर माजवणार्‍या पुरोगामींना आणि लिबरलांना भारतीय अल्पसंख्याकांची इतकी चिंता सतावते, पण पाकमधील हिंदू अल्पसंख्याकांचे नरकाश्रू पाहून त्यांच्या काळजाला पीळ का पडत नसावा? या प्रकारानंतरही एरवी वळवळणारे पुरोगामी बुद्धीजंत चिडीचूपच आहेत. यावरून त्यांची नियत स्पष्ट होतेच. पण, मोदी सरकारच्या नियतीत बिलकूल खोट नाही. त्यांना भारतातील हिंदूंइतकीच पाकिस्तानातील हिंदूंचीही पीडा समजते. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात असणार्‍या २३ टक्के अल्पसंख्याकांची संख्या आज ४ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. यामागील षड्यंत्र, वास्तवाची मोदी सरकारला पुरेपूर कल्पना आहे. म्हणूनच ‘सीएए’च्या माध्यमातून तेथील पीडित अल्पसंख्याक बांधवांचे मोठ्या मनाने हिंदुस्थानात स्वागत करणे, व्यापक हिंदूहिताचे ठरेल!

@@AUTHORINFO_V1@@