अंधेरीतील सीप्झचा बिबट्या जेरबंद ; नैसर्गिक अधिवासात सुटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2019
Total Views |

tiger_1  H x W:


मानव-बिबट्या संघर्ष टाळण्य़ासाठी वन विभागाचा प्रतिबंधात्मक उपाय


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गेल्या वीस दिवसांपासून सीप्झ औद्योगिक वसाहतीत वावरणाऱ्या नर बिबिट्याला वन विभागाने आज पहाटे जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात त्याची सुटका केली. काही दिवसांपासून हा बिबट्या अंधेरी येथील महाकाली गुंफेच्या हरितक्षेत्राजवळील कार्यालयीन परिसरात वावरत होता. कुत्र्याची शिकार करताना तो कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर या परिसरात त्याचा वावर वाढला होता. त्यानुसार मानव-बिबट्या संघर्षाची घटना टाळण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वन विभागाने त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. या बिबट्याला आजवर दोन वेळा मानवी वसाहतीमधून जेरबंद करण्यात आले आहे.

 
 
 
 

सीप्झ औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अडीज ते तीन वर्षांच्या नर बिबट्याचा वावर आढळत होता. ९ डिसेंबर रोजी या बिबट्याने येथील एका कार्यालयाच्या आवारात शिरून कुत्र्याची शिकार केल्याचे छायाचित्रण समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाले होते. या घटनेनंतर येथील कार्यालयीन क्षेत्रात हा बिबट्या सातत्याने वावरत होता.  त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. वन विभागाने वेळीच याची दखल घेऊन या परिसरात कॅमेरा ट्रॅप बसवून त्याच्या हालचालीकडे लक्ष ठेवले होते. कॅमेरा ट्रॅपमधून हा बिबट्या रात्रीच्या कालावधीत सातत्याने या परिसरात वावरत असल्याचे आमच्या निदर्शनास आल्याचे  मुंबई उपनगरचे मानद वन्यजीव रक्षक मुयर कामत यांनी दै. 'मुंबई तरुण भारता'ला सांगितले. तर सकाळच्या कालावधीत तो वेरावळी येथील महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील हरितक्षेत्रात आसरा घेत असल्याचे, ते म्हणाले.

 
 
 

कर्मचाऱ्यांमध्ये पसरलेले भितीचे वातावरण पाहून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वन विभागाने या परिसरात दोन पिंजरे लावेल. गेल्या पाच दिवसांपासून या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले होते. त्यामधील एका पिंजऱ्यात आज पहाटे ५.३० वाजता हा बिबट्या जेरबंद झाल्याचे कामत यांनी सांगितले. त्यानंतर दोन तासांमध्ये त्यांची सुटका पुन्हा नैसर्गिक अधिवासात करण्यात आल्याची माहिती ठाण्याचे उपवनसंरक्षक डाॅ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. दाट मानवी वसाहतीच्या क्षेत्रात हा बिबट्या वावरत असल्याने मानव-बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या बिबट्याला केवळ दुसऱ्या ठिकाणी हलविल्याचे, ते म्हणाले.  जून, २०१८ मध्ये या बिबट्याला मरोळ येथील रहिवाशी भागामधून पकडून पुन्हा नैसर्गिक अधिवास सोडण्यात आले होते. त्यानंतर हा बिबट्या सीप्झ परिसरात वावरत होता.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@