नवी दिल्ली : भारताचा अनुभवी आणि दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आगामी वर्षात निवृत्ती घेणार आहे. पेसने जागतिक टेनिसमध्ये भारताला मोठे यश मिळवून दिले. यंदाच्या वर्षात पेस दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्यांदा अव्वल-१०० खेळांडूंमधून बाहेर पडला होता. अखेर तो २९ वर्षाच्या कारकिर्दीला पूर्ण विराम लावणार आहे. ४६ वर्षीय पेसने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत टेनिसमधील निवृत्तीची घोषणा केली.
पेसने १९९१ साली टेनिस आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने आत्तापर्यंत १८ ग्रँड स्लॅम जिंकले असून त्यातील ८ पुरुष दुहेरी तर १० मिश्र दुहेरी प्रकारातील आहेत. पेसच्या एकूण ६६ स्पर्धा जिंकल्या असून १९९६ साली झालेल्या अटलंटा ऑलंपिकमध्ये त्याने कांस्य पदक पटकावले होते. नुकत्याच झालेल्या डेव्हिस कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळताना पेसने ४४ व्या दुहेरी प्रकारातील विजयाला गवसणी घातली. लिएंडर पेस हा ऑलिम्पिकमध्ये टेनिसचे पदक जिंकून देणारा एकमेव भारतीय आहे. त्याने १९९६ मध्ये अटलांटा ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकले होते. तो ७ ऑलिम्पिक खेळणारा जगातील एकमेव टेनिसपटू आहे. त्याने १९९२ ते २०१६ दरम्यान ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता.
पेसने ट्विट लिहिले आहे की, "मी ही घोषणा करतो आहे की, एक टेनिसपटूच्या रुपात २०२० हे माझे शेवटचे वर्ष असेल. सगळ्य़ात आधी मी माझे आई-वडील यांचे आभार मानतो की त्यांनी नेहमी मला मार्गदर्शन, शिस्त आणि ते वातावरण दिले ज्यामुळे मी आज येथे पोहोचलो आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य मला प्रेम दिले. तुमच्या प्रेमाशिवाय काहीच मिळवणे शक्य नव्हते. मी तुमच्यावर प्रेम करतो मी आपल्या कुटुंबाचे आभार मानतो, ज्याच्या जेनेटिक्स, मार्गदर्शन, शिस्तीमुळे येथपर्यंत पोहोचलो. मी दोन्ही मोठ्या बहिणींचे देखील आभार मानतो." पुढे त्याने #OneLastRoar असे ट्विट करत चाहत्यांना त्याच्या संबंधित आठवणी शेअर करा असे संबोधले आहे.