प्रतीक्षा संपली ! 'सुलतान' मुंबईकडे रवाना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2019
Total Views |

tiger_1  H x W:

 

गुरुवारी नॅशनल पार्कमध्ये नव्या वाघाची डरकाळी फुटणार


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बहुप्रतिक्षेनंतर बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त गुरुवारी 'सुलतान' या नर वाघाचे आगमन होणार आहे. राष्ट्रीय उद्यानाचे वन्यजीव बचाव पथक त्याला घेऊन नागपूरहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. गुरुवारी पहाटेपर्यत 'सुलतान' उद्यानात दाखल होईल. मात्र, पर्यटकांना त्याचे दर्शन होणार नाही. कारण, हा वाघ केवळ प्रजोत्पादनाच्या हेतूने आणण्यात येणार असल्याने त्याला व्याघ्र सफारीत प्रदर्शित करण्यात येणार नाही.

 
 

बोरिवली नॅशनल पार्कमध्ये गुरुवारी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. राष्ट्रीय उद्यान प्रशासनाचे वन्यजीव बचाव पथक गुरुवारी 'सुलतान' या वाघाला घेऊन दाखल होणार आहे. येथील व्याघ्र सफारीत गेल्या कित्येक वर्षांपासून पाळणा हललेला नाही. सध्या या सफारीत चार मादी आणि एक नर वाघ आहे. त्यामधील तीन माद्या या प्रजननाच्या दृष्टीने सक्षम आहेत. मात्र, याठिकाणी असलेल्या नर वाघाकडून प्रजननाचे प्रयत्न असफल झाले. त्यामुळे आता 'सुलतान' या नव्या वाघाला प्रजोत्पादनाच्या अनुषंगाने आणण्यात येणार आहे. नागपूर येथील 'गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रा'तून या वाघाची रवानगी मुंबईला करण्यात आली आहे. 

 
 

वन विभागाने चंद्रपूर जिल्हातून १२ जुलै, २०१८ रोजी 'सुलतान'ला जेरबंद केले होते. त्याने दोन गावकऱ्यांना ठार केल्याने त्याची रवानगी 'गोरेवाडा बचाव केंद्रा'त करण्यात आली होती. तेव्हापासून हा वाघ केंद्रात पिंजराबंद होता. 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' प्रशासनाने गोरेवाडा प्रशासनाला वाघ देण्यासंदर्भात विनंती केली होती. त्यावर राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी (वन्यजीव) १४ मार्च, २०१९ रोजी गोरेवाड्यामधीलच 'राजकुमार' या वाघाला देण्याबाबत परवानगी दिली. मात्र, हा वाघ गोरेवाडा येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय सफारीमध्ये प्रदर्शनाकरिता आवश्यक असल्याने 'सुलतान'च्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सद्यपरिस्थितीत राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. शैलेश पेठे आणि व्याघ्र-सिंह सफारीचे अधीक्षक विजय बारब्दे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत बचाव पथक 'सुलतान'ला घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. या प्रवासात वाघांची पूर्णपणे देखभाल केली जात असून दर तासाभराने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.

@@AUTHORINFO_V1@@