झारखंडचे निकाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2019
Total Views |

Jharkhand_1  H
 
झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपासाठी धक्कादायक म्हणावे लागतील. सध्या निवडणूक निकालाचा जो कल आहे, तो कायम राहिला तर झारखंडच्या रूपात भाजपाला आणखी एक राज्य गमावावे लागणार आहे. याआधी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता. या मालिकेत आता झारखंडमध्येही भाजपाचा पराभव झाल्याचे दिसते आहे. राज्यात झामुमो आघाडीला 49, तर भाजपाला 21 जागा मिळाल्या आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्येही भाजपाच्या पराभवाचे संकेत मिळाले होते. आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहिला, तर एक्झिट पोलचे आकडे खरे ठरताना दिसत आहेत.
विजयानंतर कधीच कोणत्या पक्षाला आत्मपरीक्षणाची गरज पडत नाही, मात्र पराभवानंतर आत्मपरीक्षण करावे लागते. विजयाचे शिल्पकार म्हणून अनेक जण दावे करत असतात. पराभवाचा मात्र कुणीही मायबाप नसतो. प्रत्येक जण पराभवासाठी स्वत:ला वगळून दुसर्‍याकडे बोट दाखवत असतो. विजय कुणा एकाच्या प्रयत्नाने मिळत नाही, सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची फलश्रुती विजयात होत असते.
तसेच पराभवही कुणा एकामुळे होत नसतो. पराभवासाठी एक नाही तर अनेक कारणे जबाबदार असतात. मात्र, झारखंडमधील भाजपाच्या पराभवाची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून रघुवरदास यांना घ्यावीच लागेल. जमशेदपूर पूर्व मतदारसंघात स्वत: रघुवरदास माघारले आहेत. राज्यात झारखंड मुक्ती मोर्चा आणि कॉंग्रेस आघाडीची बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. या आघाडीत राजदचाही समावेश आहे. यात झामुमोला 31, कॉंग्रेसला 14, तर राजदला 4 जागा मिळण्याचे संकेत आहेत.
भाजपा बहुमतापासून दूर असली, तरी राज्यात सर्वाधिक जागा िंजकणारा पक्ष ठरला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने राज्यात 37 जागा िंजकल्या होत्या. अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेच्या (आजसु) 5 जागांच्या मदतीने भाजपाने राज्यात बहुमताचा 42 चा आकडा गाठत सरकार स्थापन केले होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चाने 8 जागा िंजकल्या होत्या. 2014 ची विधानसभा निवडणूक भाजपाने आजसुसोबत आघाडी करून लढवली होती. यावेळी मात्र भाजपा आणि आजसु यांची आघाडी होऊ शकली नाही, दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. त्याचा फटकाही भाजपाला बसला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी आजसु चार जागा िंजकण्याची चिन्हे आहेत, तर बाबुलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चाला तीन जागा मिळतील, असा अंदाज आहे.
भाजपाला अद्याप स्पष्ट बहुमत नसले तरी भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. निकालातील आकडे मागेपुढे झाले, तर आजसु आणि बाबुलाल मरांडी यांच्या झारखंड विकास आघाडीला आपल्या बाजूला ओढत राज्यात सरकार स्थापन करण्याचा भाजपाचा प्रयत्न राहू शकतो. आजसु भाजपासोबत सहज येऊ शकतो, मात्र बाबुलाल मरांडी भाजपासोबत येतील का, याबाबत साशंकता आहे.
2014 मध्ये भाजपाने बाबुलाल मरांडी यांच्या पक्षातील आठपैकी सहा आमदार फोडत आपल्या पक्षात आणले होते. मरांडी यांच्या मनात त्याबाबत मोठे शल्य आहे. मात्र, बाबुलाल मरांडी यांनी भाजपा सोडली असली तरी रा. स्व.संघापासून स्वत:ला कधी दूर केले नाही. त्यामुळे एखाद्वेळ भाजपाने बाबुलाल मरांडी यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्यासमोर महत्त्वाचा प्रस्ताव ठेवत त्यांना आपल्या बाजूला आणले, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
राजकारणात काहीच अशक्य नसते. राजकारणातील मैत्री जशी नेहमीसाठी नसते, तशी दुष्मनीही स्थायी नसते. मुळात आता एकही राज्य गमावणे भाजपाला परवडण्यासारखे नाही. याआधी झालेल्या महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला होता. हरयाणात भाजपाने कसेबसे सरकार स्थापन केले आहे. मात्र, महाराष्ट्रात भाजपाला सरकारपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे झामुमो आणि कॉंग्रेस आघाडी तसेच भाजपाच्या संख्याबळात खूप अंतर नसेल. भाजपा राज्यात सरकार स्थापन करण्याचा आपला प्रयत्न सोडणार नाही.
2017 मध्ये देशातील 19 राज्यांत भाजपा आणि मित्रपक्षांची सरकारे होती, देशातील 72 टक्के भूभागावर भाजपाची सत्ता होती. 2019 मध्ये मात्र भाजपाची 19 वरून 16 राज्यांपर्यंत घसरण झाली आहे. 42 टक्के भूभागावर सध्या भाजपाची सत्ता उरली आहे. त्यामुळे झारखंडमधील पराभव हा भाजपासाठी धक्कादायक म्हणावा लागेल. झारखंडमधील निवडणूक निकालाचा थेट परिणाम पुढील वर्षी होणार्‍या दिल्ली आणि बिहारमधील विधानसभा निवडणुकीवर होऊ शकतो.
झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवाच्या कारणांचा आढावा घेणे गरजेचे आहे. यातील प्रमुख कारण म्हणजे आपल्या मित्रपक्षाला तसेच आपल्या पक्षातील नेत्यांना सोबत ठेवण्यात भाजपाला आलेले अपयश. महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडीनंतर, भाजपाने अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेला (आजसु) आपल्यासोबत ठेवायला हवे होते. त्यात भाजपा अपयशी ठरली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते सरयू राय यांचीही नाराजी भाजपाला दूर करता आली नाही. सरयू राय हे रघुवरदास यांच्या मंत्रिमंडळात होते, पण भाजपाने सरयू राय यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे सरयू राय यांनी आपला जुना मतदारसंघ सोडत जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून मुख्यमंत्री रघुवरदास यांच्याविरुद्ध दंड थोपटले. या मतदारसंघात सरयू राय यांनी रघुवरदास यांचा पराभव केला आहे. रघुवरदास सरकारची पाच वर्षांतील कामगिरीही समाधानकारक म्हणता येईल अशी नव्हती. जनमानसात सरकारबद्दल नाराजी होती, मात्र याचा अंदाज भाजपाला आला नाही. त्यामुळे भाजपाला डॅमेज कंट्रोल करण्याची संधी मिळाली नाही. झारखंड हे आदिवासीबहुल राज्य मानले जाते. आतापर्यंत राज्यात आदिवासी नेता मुख्यमंत्री झाला. पण, भाजपाने गैरआदिवासी असलेल्या रघुवरदास यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. हा मुद्दाही भाजपाच्या विरोधात गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपा ही विखुरलेली होती, तर भाजपाविरोधातील आघाडी एकजूट होती. भाजपाविरोधात हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात झामुमो, कॉंग्रेस आणि राजदने आघाडी बनवली. त्यामुळे भाजपाविरोधी मतांचे विभाजन टळले, तर भाजपासमर्थक मते विखुरली गेली. कारणं काहीही असली तरी भाजपाचा पराभव झाला, ही वस्तुस्थिती कुणाला नाकारता येणार नाही.
भाजपाने झारखंडमधील प्रचारात राममंदिर, 370 तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासारखे राष्ट्रीय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले, दुसरीकडे महाआघाडीने स्थानिक मुद्यांवर भर दिला. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय महत्त्वाचे मुद्दे चालतात, विधानसभा निवडणुकीत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवणार्‍या जनतेने विधानसभा निवडणुकीत स्थानिक मुद्यांना प्राधान्य दिले. निवडणुकीच्या निकालात त्याचे प्रतििंबब पडल्याचे दिसते आहे.
भाजपाविरोधातील आघाडीला झारखंडमध्ये बहुमत मिळाले असले, तरी या विजयाने कॉंग्रेस पक्षाने हुरळून जाण्याचे कारण नाही. कारण या विजयात कॉंग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे काहीच योगदान आणि कर्तृत्व नाही. कॉंग्रेसच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात कॉंग्रेसला सत्तेत सहभाग मिळणार आहे. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचा हा अन्वयार्थ आहे.
@@AUTHORINFO_V1@@