सहृदयता वसता मनी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2019
Total Views |

aarogya_1  H x



आपण सर्वच मनुष्यप्राणी एक आक्रमक प्रवृत्ती घेऊन जन्माला येतो. या आक्रमक प्रवृत्तीचे ध्येय मुळात एकच आहे, ते म्हणजे आत्मबचाव. पण, जेव्हा तिरस्काराची भावना आक्रमकतेवर प्रभाव टाकायला लागते, तेव्हा आत्मबचावापेक्षा तिचा कल दुसर्‍यांचा विनाश करण्याकडे जास्त असतो. आपण महाभारत किंवा रामायणाकडे पाहिले तर दुर्योधन काय किंवा रावण काय, ते दोघेही तिरस्काराने मदमस्त झाले असल्याने सर्वांच्या विनाशाच्या टोकाला पोहोचलेले दिसतात.


आपण तिरस्कार का करतो
, याची अनेक कारणे आहेत. पण एक महत्त्वाचे कारण म्हणजे, आपल्यापेक्षा वेगळ्या असलेल्या अनेक गोष्टींची आपल्या मनात भीती असते. आपल्या अंतरंगातल्या अनेक अशा गोष्टी आहेत, मग त्या भावना असतील व विचार असतील, पण त्याबद्दल आपल्याला अस्वस्थ वाटत असतं. एक अनामिक भीती वाटत असते. अशावेळी मनातून नकोशा असणार्‍या त्या भावना आपण दुसर्‍यांवर जसे की, एखाद्या व्यक्तीवर वा एखाद्या समूहावर प्रक्षेपित करतो, ही एक डिफेन्स प्रक्रिया आहे. त्याला ‘फ्रॉईड प्रोजेक्शन’ म्हणतात. या प्रक्रियेतून आपण स्वतःला त्रस्त न करता वा स्वतःकडे वाईटपणा न घेता, ते भाव दुसर्‍यांवर प्रक्षेपित करतो. ‘मी भयंकर नाही, पण तू आहेस,’ असा तो आविर्भाव असतो. हे आपल्या मनातील वाईट-दुष्ट विचारांचे प्रक्षेपण दुसर्‍यावर करणे, ही आपण स्वतः किती चांगले आहोत, हे सिद्ध करण्याची आपली धडपड आहे; किंबहुना ती आपली भावनिक गरज आहे. अगदी बारकाईने पाहता दुसर्‍यांवर वाईट प्रवृत्तींचे प्रक्षेपण केल्यानंतर आपण त्यांच्यावर आक्रमण करण्यास सज्ज होतो. ‘तेच वाईट आहेत, त्यामुळे मला त्यांच्याशी वाईट वागण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही,’ असे स्वतःस पटणारे स्पष्टीकरण वेळोवेळी आपण देत असतो. तिरस्कारातून अशाप्रकारे आक्रमकतेचा वेळोवेळी उद्रेक होताना आपण पाहतो, तो यामुळेच!


शिवाय सहृदयता किंवा परानुभूती ही एक खूप महत्त्वाची अशी भावना आहे
. जे खरे तर तिरस्कारावरचे नामी औषध आहे. पण, परानुभूती ही अशीच येत नाही. त्यासाठी माणसाच्या मनात स्वतःबद्दल कनवाळूपणा असायला हवा. या स्वतःबद्दलच्या कनवाळूपणामुळे आपण स्वतःला पूर्णपणे स्वीकारतो. स्वतःमध्ये पटणारे गुण म्हणा किंवा न पटणारे दुर्गुण म्हणा, आपण या सार्‍या गुणांना व दुर्गुणांना स्वीकारतो. आपण आपल्यातले वाईट अस्तित्व जेव्हा स्वीकारतो, तेव्हा आपल्या मनात तिरस्काराच्या भावनेचे अस्तित्वच उरत नाही. साहजिकच आपण अंतर्मनातून अस्वस्थ राहात नाही. आपल्याला स्वतःची घृणा वाटत नाही. याचा खूप मोठा मार्मिक फायदा आहे. जेव्हा आपण स्वतःशी स्वतःबद्दल समाधानी असतो, तेव्हा तिरस्कार वा द्वेषासारख्या विखारी भावनांच्या आहारी जात नाही. स्वतःवर प्रगल्भ प्रेम करायची कला आपण तेव्हा आपसूक शिकतो. आपल्या हृदयातच तिरस्काराची भावना नसते, तेव्हा ना आपण स्वतःचा तिरस्कार करतो ना दुसर्‍याचा. तिरस्काराच्या कृती आणि विचारांमध्ये आपल्याला आपली असहायता, दुर्बलपणा, अन्याय इ. भावनांतून मुक्ती मिळवायची असते. आपल्यावर कुणी अन्याय केला आहे म्हणून आपण त्यांचा, त्या व्यक्तीचा वा त्या समाजाचा तिरस्कार करतो. हे आपल्या मनावर बिंबलेले असते. आपल्या मनातील असुरक्षिततेच्या भीतीने मुळात तिरस्काराच्या भावनेला जन्माला घातलेले असते. तिरस्काराचे वा द्वेषाचे प्रत्येक क्षण हे त्या मनातील त्या व्यथेतून क्षणिक सुटकारा मिळवण्यासाठी असले तरी कायमस्वरूपी विद्ध करणारे असतात.


एकंदरीत पाहता आजच्या वर्तमान स्थितीत आपण सगळेच युद्धजन्य परिस्थितीत राहात आहोत
. या परिस्थितीत युद्ध जिंकण्यासाठी स्पर्धा करत जगणे, एवढेच आपल्याला समजते आहे. त्यामुळेच आपण एकमेकांशी जोडले जायला घाबरतो आहोत का? हा प्रश्न मनात उभा ठाकतो. आपल्यापेक्षा कोणी वेगळा असेल तर वा आपला कोणी शत्रू असेल तर आपण त्याचा तिरस्कार करायचा, हेच आपल्याला शिकवले जात आहे का? आजच्या परिस्थितीत संपूर्ण जगात प्रत्येक जण माणुसकी जतन करण्यापेक्षा जणू एकमेकांशी लढण्यास तयार ठाकला आहे, असेच चित्र आज विश्वासमोर दिसत आहे. शांतीचा अर्थ आणि अस्तित्व आज आपण जणू विसरलो आहोत.


अशात काय करू शकतो आपण
? आपण माणूस म्हणून जगू शकतो. आपण एकमेकांमधली तिरस्काराची भिंत सहृदयतेने आणि प्रेमाने तोडू शकतो. पूर्ण जग बदलता नाही आले, तरी शेजार्‍यांना साद घालू शकतो. मित्रांना हाक मारू शकतो. रस्त्यावर चालता चालता अनोखळी वाटसरूशी हसू शकतो. तहानलेल्याला पाणी देऊ शकतो. भुकेलेल्याला आपल्या जेवणातला एक घास देऊ शकतो. पडणार्‍याला सावरू शकतो आणि रस्ता चुकलेल्याला रस्ता दाखवू शकतो. माणसामाणसांशी जुळणे तसे कठीण नाही. फक्त सहृदयता हवी.

                                                               - डॉ. शुभांगी पारकर

 

@@AUTHORINFO_V1@@