अभिव्यक्तिवाले कुठे झोपले आहेत?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2019
Total Views |


agralekh_1  H x



शिवसैनिकांनी हिरामण तिवारी यांना मारहाण व मुंडन करण्याची गुंडगिरी नुकतीच केली. जबाबदारीची जाणीव नसलेल्यांच्या हाती पैसा किंवा सत्ता असू नये, असे म्हणतात. राज्याची सत्ता हाती येऊनही मस्तवालपणा करणार्‍या शिवसैनिकांसाठीच ही उक्ती लिहिलेली असावी. परंतु, तिवारी यांना हाणामारी केल्यानंतरही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रखवाल्यांनी झोपून राहणेच इष्ट समजले.असे का? कारण शिवसेना काँग्रेसवासी झाल्याने तिच्याविरोधात बोलणे म्हणजे काँग्रेसविरोधात बोलण्यासारखेच आणि ते ही लोकं कसे करतील?



शिवसेना कार्यकर्त्यांनी नुकतीच हिरामण तिवारी या हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्याला उद्धव ठाकरेंविरोधात फेसबुकवर कमेंट करण्यावरून मारहाणीची व मुंडन केल्याची संतापजनक घटना मुंबईत घडली
. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतेवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या समृद्धीची आणि वैभवाची भाषा केली होती. परंतु, ती समृद्धी आणि ते वैभव शिवसेनेच्या गुंडशाही व झुंडशाहीचे असेल, हे सांगितले नव्हते. आताच्या हाणामारीतून त्याची पहिली झलक राज्यातील जनतेला आणि हिंदुत्ववाद्यांनाही पाहायला मिळाली तसेच सरकार जोपर्यंत टिकेल तोपर्यंत असेच चालेल, याचे संकेतही मिळाले. सोनिया गांधींसमोर पाठमोडे कुर्निसात करून वा शरद पवारांसमोर गर्विष्ठ माना झुकवून सत्ता मिळवल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांतला मस्तवालपणा आणखी वाढल्याचेही हे निदर्शक आहे.



आयतेपणाचा माज हा असाच असतो आणि त्याचे पुरेपूर दर्शन इथून पुढेही शिवसेना व शिवसैनिक घडवतच राहतील
. तथापि, याच शिवसेनेने राज्य व केंद्र सरकारमध्ये सामील असतानाही आपल्या मुखपत्रातून नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस व भाजपविरोधात अश्लाघ्य शब्दांत बरळण्याची मोहीम राबवली होती आणि ते बरळणेच होते, त्यात कसलाही मेंदूचा वा डोक्याचा वापर केलेला नव्हता. कारण, कोणाला शिव्या घालण्यासाठी त्याची गरजच नसते. पण त्यानंतरही भाजपकडून शिवसेनेच्या गुंडांनी आता जे काही कृत्य केले तशी प्रतिक्रिया दिली गेली नव्हती. ज्यांचा आपल्या विवेकावर विश्वास असतो, त्यांचे असेच असते, ते विरोध आणि आरोपांनाही विचारानेच उत्तर देत असतात. पण, विवेक आणि बुद्धी कलानगरच्या वेशीवर टांगून मंत्रालयातल्या खुर्च्या उबवणार्‍यांना ते कसे समजणार? कारण, उद्धव ठाकरे ज्या मुंबईत राहतात, तिथे ही घटना घडली, तरी त्यावर साधा एक शब्द उच्चारणेही त्यांना शक्य झाले नाही. यावरूनच उद्धव ठाकरेंचादेखील अशा दहशतीच्या आणि दादागिरीच्या कृत्यांना पाठिंबा आहे, हे स्पष्ट होते.



दरम्यान
, शिवसैनिकांचे आणखी एक श्रद्धास्थान म्हणजे आदित्य ठाकरे. त्यांनी या प्रकरणानंतर ट्विटरवर ट्रोल्सविरोधात काही मते मांडली, पण ती इंग्रजीमधून. त्यात त्यांनी हिरामण तिवारी यांना झालेल्या मारहाणीचा शब्दानेही उल्लेख न करता टीकाकारांना टीका करू द्या, आपण वाकडे पाऊल उचलायला नको, असे म्हटले. परंतु, ते इंग्रजीत असल्याने मराठी बाण्याच्या शिवसैनिकांच्या डोक्यात कितपत घुसेल, ही शंकाच आणि समजा यदाकदाचित घुसलेच तरी साहेब म्हणतात त्याप्रमाणे मारामारी करायची नाही तर मग नेमके काय करायचे, हाही एक मोठा प्रश्न शिवसैनिकांसमोर उभा राहिल. कारण, कोणी कितीही म्हणत असले तरी हात उचलण्याव्यतिरिक्त शिवसैनिकांना अन्य काही करायला पक्षप्रमुखांनीही कधी शिकवलेच नाही आणि शिवसैनिकांनाही त्याशिवाय वेगळे काही येतच नाही ना! दरम्यान, शिवसैनिकांनी हिंदत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्याला मारझोड केल्यानंतर शबाना आझमी, जावेद अख्तर, नसिरुद्दीन शाह, अनुराग कश्यप, स्वरा भास्कर किंवा काँग्रेसच्या हुसेन दलवाई आदी अभिव्यक्तिच्या रखवाल्यांनी मात्र, आपापल्या बिळात शांत झोपून राहणेच इष्ट समजल्याचे दिसते.



बजरंग दल
, विश्व हिंदू परिषद वा भाजपच्या कार्यकर्त्यांना असहिष्णू, मानवाधिकाराचे हननकर्ते म्हणून आरडाओरडा करणार्‍या कोणालाही शिवसैनिकांची दहशती कृती निषेधार्ह वाटली नाही. म्हणजेच या लोकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि त्याला पाठिंबा हा निवडकांसाठीच असतो, हे स्पष्ट होते. हिंदूंवर कोणी, कितीही अत्याचार केला तरी त्यांच्या झोपेत व्यत्यय येत नाही. पण इथेच जर एखादा मुसलमान असता तर त्याच्यासाठी सगळ्याच मानवाधिकारवाल्यांना आणि लोकशाहीवाद्यांना कंठ फुटला असता, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांनी रुदाल्या गावून दाखवल्या असत्या. उल्लेखनीय म्हणजे अशा लोकांच्या लेखी संघ परिवारातील संघटना व त्यांचे कार्यकर्ते असहिष्णू असतात, पण आताच्या प्रसंगावरून कोण असहिष्णू हे उघडउघड दिसत असूनही त्यांची दातखीळ बसली, त्यांनी तोंडाला कुलूप लावून घेतले. असे का? कारण, आता शिवसेना काँग्रेसवासी झाली आहे आणि काँग्रेस म्हणजे सगळ्या अभिव्यक्तिवाल्यांची मायबाप, मालकीण. तिथे या सर्वांचीच वाचा बसते, तोंड उघडले तर अभिव्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही कार्यकर्ते, संविधानवादी, मानवाधिकार वगैरेंच्या नावाखाली मिळणारा मानमरातब नष्ट होणार ना! म्हणूनच एखाद्या हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्यासाठी एवढी विशेषणे लावणारी मंडळी असे नुकसान कसे सोसू शकतील?



दुसरीकडे शिवसेनेची वाढदेखील वैचारिकतेऐवजी मनगटाच्या जोरावरच झालेली आहे आणि तीच तिची खरी ओळख व प्रतिमा आहे
. कारण प्रतिवादासाठी बुद्धीचा वापर करायची पात्रता अंगी नसली की, हातापायाचीच भाषा सुचत, स्फुरत असते. परंतु, सत्ता नसताना केलेला मवालीपणा तितकासा ठसठशीतपणे समोर येत नसतो, जितका सत्तेवर असतानाचा येतो. उल्लेखनीय म्हणजे आता राज्याचे गृहखातेही शिवसेनेच्याच नेत्याकडे आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी गृहविभाग व गृहमंत्र्यांची असते. पण याची जाणीव शिवसेना आणि शिवसैनिकांनाही झालेली दिसत नाही. म्हणूनच जबाबदारीची जाणीव नसलेल्यांच्या हाती पैसा किंवा सत्ता असू नये, असे म्हणतात. तसेच संबंधित कार्यकर्त्याने खरेच काही बेकायदेशीर कृत्य केलेले असेल तर शिवसेनेने आणि शिवसैनिकांनीही त्याविरोधात रीतसर तक्रार दाखल करायला हवी होती. त्यानंतरचा पुढचा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनुसार जो काय लागायचा तो लागला असता, पण आपल्या नेत्यावरील निष्ठा दाखविण्याची खुमखुमी शिवसैनिकांना आली व त्यांनी आपले संस्कार दाखवले. परंतु, असल्याच सहकारी कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर प्रचारसभेतशिवसेनेचे कुत्रे आले का?,’ असे म्हणत उद्धार केला होता. तेव्हा मात्र शिवसेना वा शिवसैनिकांना तो अपमान न वाटता कोणा महामहोपाध्यायाच्या मुखातील सुभाषिते वाटली होती.



सोबतच औरंगाबादच्या हर्षवर्धन जाधव आणि अमोल मिटकरी या दोघांनीही शिवसेना व पक्षप्रमुखांवर नको ती टीका केली होती
. पण त्यानंतरही शिवसैनिकांचा स्वाभिमान की आणखी काय पेटून उठले नव्हते. म्हणजेच ज्याच्याकडे ताकद त्याने धिंडवडे काढले, अब्रूची लक्तरे टांगली तरी चालेल, पण सर्वसामान्य व्यक्तीने आपल्या लोकशाहीप्रदत्त, संविधानिक अधिकाराचा वापर करून टीका केली तर शिवसैनिकांचे पित्त खवळणार! आता याचा अर्थ इतकाच की, राज्यातील सामान्य जनतेचे जिणे शिवसैनिक बेहाल करणार, मुख्यमंत्र्यांनी काहीही चुकीचा निर्णय घेतला वा वदले तरी ते जनतेने मुकाट्याने सहन करायचे, असला हा प्रकार. भारतावर मोगलांचे राज्य असताना तमाम हिंदू जनतेला असाच अत्याचार सोसावा लागत असे. परंतु, आज मात्र, शिवाजी महाराजांना स्वतःचा आदर्श म्हणविणार्‍यांनीच आपणही मोगलाईच्याच वाटेवर असल्याचे दाखवून दिले. हा जसा पुरोगामी महाराष्ट्राचा तसाच शिवाजी महाराजांचाही अपमान आहे आणि तो करण्यात शिवसैनिकांनीच पुढाकार घेतला. अर्थात सत्तेच्या मुजोरपणात ज्यांच्या नावावरून संघटनेचे नाव ठेवले, त्यांचेच नाव धुळीस मिळवण्याचा चंग शिवसैनिकांनी बांधला असेल तर ते तसे करतीलच आणि निलाजरेपणाने ‘करून दाखवले’चा घोषही करतील! पण शेवटी ते किती दिवस सहन करायचे, हे जनतेच्याच हातात असते आणि तो टप्पा एकदा ओलांडला की, कोणाचे सिंहासन कसे उलथवायचे हेही ती दाखवून देत असते.

@@AUTHORINFO_V1@@