टॅक्सीचालकाचा मुलगा ते यशस्वी क्रिकेटर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2019
Total Views |


mansa_1  H x W:



१९ वर्षांखालील क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्यानंतर प्रियमवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, इथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास संघर्षपूर्ण राहिला आहे. त्याच्या आयुष्याविषयी...



क्रिकेट हा भारतीयांच्या रक्तातील खेळ
. भारतात क्रिकेटला जे वलय प्राप्त झाले आहे, ते अन्य कोणत्याही खेळाला नाही. संपूर्ण देशभरात या खेळाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी असून प्रत्येक गल्लीबोळात हा खेळ खेळला जातो. बालवयापासून ते तारुण्यापर्यंत जवळपास सर्वच वयोगटातील मुले क्रिकेटचा खेळ भारतात आवर्जून खेळतात. या खेळामध्ये पारंगत असलेला प्रत्येक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर एक यशस्वी क्रिकेटपटू म्हणून नावलौकिक कमावण्याचे स्वप्न पाहतो. अनेकांचे ते पूर्ण होतेच असे नाही. काही जणांचे आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याचे स्वप्न साकार होते, तर काही जणांचे ते स्वप्न अपूर्ण राहते. अनेकांचे संपूर्ण आयुष्यच आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळविण्यात जाते, तर काही खेळाडू असेही आहेत, जे आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू होण्याचे स्वप्न पाहतात आणि ते आपल्या मेहनतीने पूर्णही करतात. २०२० च्या युवा विश्वचषक स्पर्धेसाठी १९ वर्षांखालील क्रिकेट टीमच्या कर्णधारपदी निवड झालेला १९ वर्षीय प्रियम गर्ग हा त्यांपैकीच एक म्हटले तर वावगे ठरणार नाही.



१९ वर्षांखालील क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्यानंतर आजच्या घडीला प्रियमवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे
. मात्र, इथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास संघर्षपूर्ण राहिला आहे. “इथवर पोहोचण्यासाठी आपण केलेली मेहनतच नाही तर कुटुंबीयांनी आपल्यासाठी केलेला त्यागही तितकाच महत्त्वाचा आहे,” असे प्रियम आवर्जून सांगतो. “आज जर आपली आई हयात असती तर आपला आनंद द्विगुणित झाला असता,” असे भावनिक उद्गार प्रियमने १९ वर्षांखालील क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्यानंतर काढले. १९ वर्षांखालील क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतरही कुटुंबीयांनी आपल्यासाठी केलेल्या त्यागाची आठवण ठेवणार्‍या प्रियमने वयाच्या सहाव्या वर्षापासूनच क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरुवात केली.



प्रियम गर्ग हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी
. ३० नोव्हेंबर, २००० साली उत्तर प्रदेशातील मेरठ येथे त्याचा जन्म झाला. मेरठपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या परिक्षितगड गावात तो वयाच्या सहाव्या वर्षी क्रिकेटच्या सरावासाठी जात असे. बालवयातच क्रिकेटमध्ये रूची ठेवणार्‍या प्रियमचे अभ्यासापेक्षा खेळाकडेच अधिक लक्ष. त्यामुळे वयाच्या सहाव्या वर्षी म्हणजे शाळेत पहिलीत असताना क्रिकेट खेळण्यासाठी तो २५ किलोमीटरची पायपीट करत असे. बालपणाची हीच रूची त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा क्रिकेटपटू बनविण्यास कारणीभूत ठरली.



प्रियमचे वडील नरेश गर्ग हे एकेकाळी टॅक्सीचालक होते
. प्रियमला दोन मोठ्या बहिणीही आहेत. या तिघांच्या शिक्षणाचा खर्च आणि प्रियमची क्रिकेटची आवड जोपासणे, हे नरेश गर्ग यांना शक्य होत नव्हते. त्यामुळे प्रियमने शिक्षणावरच अधिकाधिक लक्ष केंद्रित करून एखाद्या सरकारी नोकरीत जाऊन कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा, असे मत गर्ग कुटुंबीयांचे होते. मात्र, मुळातच क्रिकेटमध्ये रूची ठेवणार्‍या प्रियमला कधीही शिक्षणाची ओढ लागलीच नाही आणि क्रिकेटमध्येच करिअर करण्याचे त्याने ठरवले. त्यामुळे शालेय शिक्षणासोबतच वडिलांनी त्याचे क्रिकेटचे प्रशिक्षण सुरूच ठेवले.



क्लबमधील प्रियमचे प्रशिक्षण सुरू ठेवण्यासाठी कुटुंबात आर्थिक चणचण जाणवत होती
. केवळ टॅक्सी चालवून हा खर्च भागत नसल्याने नरेश यांनी इतर फावल्या वेळेत मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. अगदी दूधविक्रीपासून सामानाची ने-आण यापासूनची सर्व कामे त्यांनी करत प्रियमचे क्रिकेट प्रशिक्षण सुरू ठेवले. वयाच्या अकराव्या वर्षी प्रियमला मात्र मोठा झटका बसला. आजारपणामुळे त्याच्या आईचे निधन झाले. मात्र, या दुःखातूनही सावरत त्याने पुन्हा जोमाने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. कसून आणि चिकाटीने क्रिकेटचा सराव करणार्‍या प्रियमवर उत्तर प्रदेशच्या रणजी संघाच्या प्रशिक्षकांची नजर पडली. सलामीलाच तुफान फटकेबाजी करण्याची क्षमता ठेवणार्‍या प्रियमला त्यांनी संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला. येथून त्याचे नशीबच पालटले.



रणजी संघात स्थान मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशसाठी उत्कृष्ट फलंदाजी करत प्रियमने मैदान गाजविण्यास सुरुवात केली
. कमी वयात दिग्गज खेळाडूंप्रमाणे फलंदाजी करणार्‍या प्रियमची सर्वत्र चर्चा होऊ लागली. कालांतराने त्याला १९ वर्षांखालील संघातही स्थान मिळाले. १९ वर्षांखालील संघाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या कामगिरीचा आलेख उंचावलेला असल्याने अखेर आगामी युवा विश्वचषक स्पर्धेसाठी त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत मोलाची कामगिरी बजावत त्याने स्वतःला सिद्ध केले. आता प्रियमला प्रतीक्षा आहे, ती मुख्य भारतीय संघात प्रवेश करण्याची. यासाठी तो पुन्हा प्रयत्नशील आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ कडून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!



- रामचंद्र नाईक 
@@AUTHORINFO_V1@@