निंदा ईशनिंदेची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2019   
Total Views |


pakistan_1  H x


पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांच्या विरोधात अतिशय सहजसोपे असलेले हत्यार म्हणजे ईशनिंदा कायदा. या कायद्याने ११ वर्षांच्या मुलीवरसुद्धा कारवाई करण्यात आली होती.


पाकिस्तानमध्ये ख्रिश्चन धर्माच्या १४ वर्षांच्या हुमाचे अपहरण करून जबरदस्तीने तिचे धर्मपरिवर्तन करून
, तसेच मुस्लीम व्यक्तीशी विवाह लावला गेला. तिच्या आईवडिलांनी तिची शोधाशोध केली. बेपत्ता असलेल्या हुमाबाबत पाकिस्तानी न्यायालयामध्ये न्याय मागितला. तिची केस तबस्सुत युसूफ नावाचे ख्रिश्चन वकील लढवत आहेत. ही केस दाखल केल्यानंतर त्यांना आणि हुमाच्या आई-बाबांनाही सतत धमक्या येत आहेत की, “हुमाला शोधणे बंद करा. कोर्टकचेरी करण्याच्या फंदात पडलात तर याद राखा. पवित्र कुराणाची पानं फाडू आणि तुमच्या घराच्या अंगणात टाकून देऊ. तुमच्यावर ईशनिंदेची केस करू. बर्‍या बोलाने शांत राहा.” १४ वर्षीय हुमावर अत्याचार करणार्‍या गुन्हेगारांना वाटते की ख्रिश्चनधर्मीय हुमाच्या आईबाबांना नमवायचे तर ईशनिंदेचा कायदाच उपयोगी येईल. इतकेच काय हुमाचा वकीलदेखील गप्प बसेल. पण तसे झाले नाही, उलट याविरोधात युसूफ यांनी आवाज उठवला आहे.



पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांच्या विरोधात अतिशय सहजसोपे असलेले हत्यार म्हणजे ईशनिंदा कायदा
. या कायद्याने ११ वर्षांच्या मुलीवरसुद्धा कारवाई करण्यात आली होती. अन्न शिजवण्यासाठी चुलीत ती काही कागद टाकत होती. त्या कागदामध्ये कुराणातील एक पानही होते. या मुलीला ते काही कळले नाही. इतर कागदाप्रमाणे तिने तो कागदही चुलीत टाकला. कुणीतरी ते पाहिले आणि तिच्यावरही खटला भरला. नुकतीच एक घटनाही जगभर गाजते आहे. बहाउद्दीन जकारिया विद्यापीठातील एक माजी प्राध्यापक जुनैद हाफिज यांनाही ईशनिंदा केली म्हणून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याचाच अर्थ पाकिस्तानमध्ये आता वैयक्तिक हेव्यादाव्यातून मुस्लीम नागरीक आपआपसातही ईशनिंदेचे खटले भरु लागलेत.



असो
, पाकिस्तानमध्ये हे असे असावे, यात काही नवल नाही. कारण, धर्माच्या नावावर वेगळ्या झालेल्या या राष्ट्रात धर्माच्या नावावरच अधर्म उफाळून आलेला आहे. हे या ना त्या घटनेने दिसून येतच असते. मुळात ईशनिंदेचा कायदा ब्रिटनचा आणि तोच कायदा पाकिस्तान आणि थायलंडनेही आत्मसात केला. पुढे आपण अल्लाचे केवढे मोठे भक्त आहोत, हे ठसवण्यासाठी पाकिस्तानने त्यात अनेक बदल केले. अर्थात अल्लाच्या कुराणाबद्दल नकारात्मक बोलल्यावर कायद्याने शिक्षा होणे, हे केवळ पाकिस्तानमध्येच आहे का? तसे नाही. तर जगातल्या २६ टक्के देशांमध्ये ईशनिंदेविरोधातला कायदा आहे. या २६ टक्के देशांमधील ७० टक्के देश मुस्लीम आहेत. अर्थात उर्वरित देश ख्रिश्चन राष्ट्रे आहेत. संयुक्त राष्ट्राने मागे एकदा जगभरातल्या ईशनिंदा कायद्यावर चिंता व्यक्त केली होती.



कारण
, ईशनिंदा कायद्याचा गैरफायदा घेत मुस्लीम तसेच ख्रिश्चन देशांमध्येही अनेकांना उगीचच गुन्हेगार ठरवले गेले. याउलट वर्ल्ड सूफी फोरमचे अध्यक्ष आणि ऑल इंडिया उलेमा व मशाईख बोर्डाचे संस्थापक, अध्यक्ष हजरत सय्यद मोहम्मद अशरफ किछौछवी यांनी पत्रकार परिषद घेत मागे एकदा जाहीरपणे म्हटले की, “ईशनिंदा कायदा हा आंतरराष्ट्रीय बनावा. यासाठी दबावगट निर्माण व्हावा. जगातील प्रत्येक देशाशी याबद्दल संपर्क साधायला हवा.” अर्थात याचेही कारण होतेच. बांगलादेश तसा मुस्लीमबहुल देश. नव्हे मुस्लीमच देश. इथल्या कट्टरपंथियांनी एकजूट केली. त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे मागणी केली की, पाकिस्तान किंवा इतर मुस्लीम देशाप्रमाणे बांगलादेशमध्येही ईशनिंदेचा कडक कायदा करावा. यावर शेख हसीना यांनी उत्तर दिले की, “बांगलादेशमध्ये इतर कायदे आहेत, जे धर्माचे रक्षण करतात. कोणत्याही धर्माचा अपमान होणार नाही, याची खात्री दिली जाऊ शकते.”



थोडक्यात काही मुस्लीम राष्ट्रेही ईशनिंदेबाबत मवाळ भूमिका घेताना दिसतात
. जगाच्या पाठीवर अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला जातो. मात्र, प्रश्न जेव्हा त्या त्या धर्माची किंवा धर्माने अधोरेखित केलेल्या इश्वराची अनवधानानेही निंदा झाली, की घटना गंभीर होते. मात्र भारतामध्ये याही बाबतीत खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य आहे. भारतामध्ये एकदुसर्‍याच्या धर्माचा, श्रद्धेचा आदर करा, असे कायद्यानेही सांगितले जाते.

@@AUTHORINFO_V1@@