स्वत:वरचा विश्वास कायम हवा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2019   
Total Views |

mansa_1  H x W:



नागूपरच्या खेड्यातली अंत्यज जगणे जगणारी शशी घवघवे आज एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी म्हणून शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात दीपस्तंभ ठरल्या आहेत. त्यांच्या जगण्याचा वेध...


तिच्या जगण्याच्या मर्यादा

तिने बदलल्या अमर्याद शक्तीमध्ये

तिच्यासमोर उभ्या ठाकलेल्या

प्रत्येक संकटाला

तिने बदलले अमर्याद संधीमध्ये

तिने निर्मिले विश्व स्वयंप्रेरणेचे...


एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारींसाठीच या काव्यपंक्ती समर्पित असाव्यात, असे वाटावे इतके त्यांचे जगणे संघर्षमय आणि तितकेच समन्वयपूर्ण.


शशिकला वंजारी यांनी स्वत:चा ठसा शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उमटवला आहे. सामाजिक, शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांनी शिक्षण विषयावर डॉक्टरेटही मिळवली आहे. हे सगळे यश डॉ. शशिकला वंजारी यांना वंशपरंपरागत मिळाले असेल?


नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील डेगमा गावचे वडगुसाव घवघवे हे अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती. त्यांची शंभर एकर जमीन. घरात लक्ष्मी पाणी भरत होती. त्यांची कन्या शशिकला. शशिकला यांच्या आईचे नाव बायनाबाई. वडगुसाव यांनी बायनाबाई पत्नी असतानाही दुसरा विवाह केला. बायनाबाई यांचे जगणे कसे असेल, हे जावे त्यांच्या वंशा तेव्हाच कळे. अशातच शशिकला यांचा जन्म झाला. त्या एक वर्षाच्या असतानाच वडगुसाव यांचे निधन झाले. बायनाबाईंचे राहते घर सुटले. एक मुलगा भाऊराव आणि एक वर्षाच्या शशिकलाला घेऊन त्या नागपूरला आल्या. तिथे बायनाबाईंच्या भावांनी त्यांना झोपडे बांधायला मदत केली. अपार कष्टात बायनाबाईंचे आणि त्यांच्या मुलांचेही जगणे सुरू झाले. कधीकाळी कर्ज वगैरे काढून घेतलेले शाळेचे कपडे अगदी विरून विरून फाटून जाईपर्यंत घालायचे. दिवसभरात एकदा अन्न मिळाले तर कोण आनंद, अशी परिस्थिती.


नागपुरात भुलाबाईचा सण मोठा असतो. एकदा लहानग्या शशीनेही भुलाबाई पूजण्याचा हट्ट केला. पण बाजारातून भुलाबाईच्या प्रतिमा आणायला पैसे नव्हतेच. बायनाबाई यांनी मातीच्या भुलाबाई पूजनाच्या प्रतिमा बनवल्या, ज्वारीच्या दाण्यांनी सजवल्या. नागपुरात घराघरात शेवया, कुरडया असतात. प्रसाद म्हणून शेवयाची पाणीदार खीर बनवली. भुलाबाईचा सण मोठ्या थाटामाटात साजरा झाला. बायनाबाईच्या डोळ्यात आसवं होतीच, कारण घवघवे या गर्भश्रीमंताच्या लेकीच्या नशिबी हा वनवास होता. पण बायनाबाईंनी शशिकला यांना शिकवले, “हे बघ, हे नाय ते नाय म्हणून रडायचे नाही, जे आहे त्यात समाधान मानून प्रसंग निभवायचा,” असे निक्षून सांगितले. शशीनेही ते ध्यानात ठेवले.


नागपूरची थंडी प्रसिद्ध. या थंडीत एक हंडा पाण्यासाठी पहाटे उठून मैल न् मैल चालावे लागायचे. शाळा आणि पुढे महाविद्यालयात शिकत असतानाही अनवाणीच जावे लागायचे. पण, शशी यांनी आईचा मंत्र जपला. पुढे शशीचे भाऊ भाऊराव हे शिक्षक झाले. त्यांनी शशीला शिकवायचेच, हा निश्चय केला. शशी यांनी एमएस्सीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांचा विवाह गुलाब वंजारी या रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकाशी झाला आणि शशी यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली. शशी सांगतात, “चांगला समाज काय असतो, ते मला तेव्हापासून कळत गेले.” त्याच काळात त्यांनी एम.ए. व पुढे बी.एड.ही केले. एकाच्या पैशावर घर चालणे अवघडच होते. त्यामुळे शशींनी खाजगी शिकवणी घ्यायचे काम सुरू केले. शहरातील सगळ्याच शाळांमध्ये नोकरीसाठी अर्ज केले. मुलाखती दिल्या, पण शिक्षकाची नोकरी मिळाली नाही. कारण, नोकरी मिळण्यासाठीची ओळख त्यांच्याकडे नव्हती. पुढे एम.एड्. केल्यानंतर प्राध्यापकाची नोकरी मिळाली. त्यानंतर सरकारी नोकरीही मिळाली.


पण
, आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक ध्येयांना आकाश मिळावे म्हणून त्यांनी ती नोकरीही सोडली आणि २००० साली त्या नागपूर विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षण विभागामध्ये प्रपाठक म्हणून रूजू झाल्या. पुढे त्यांचा ‘प्रोफेसर’ म्हणून हक्क होता. पण तिथे रितसर प्रक्रिया होण्याकरीता सात वर्षे वाट बघावी लागली. कधीतरी एकदा मुलाखत झाली. त्यांना वाटले की आपला हक्क मिळेल. परंतु निवड समितीमध्ये मारलेल्या शेर्‍यामुळे त्यांना तेथूनही डावलण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी त्यांनी एकच ठरवले, सत्य परेशान हो सकता है पराजित नही. त्यानंतर एकदाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यांना ‘प्रोफेसर’ पद मिळाले. या अशाच काळात पुन्हा मग एक नवीन वादळ उभे राहिले. त्यांच्या एका सहकार्‍याने परिक्षेमध्ये अडथळा निर्माण केला, असा शशिकला यांच्यावर बिनबुडाचा आरोप करून त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण केला. यामुळे डॉ. शशींसोबत त्यांच्या विद्यार्थ्यांनाही भरपूर त्रास सहन करावा लागला. ती केस कोर्टात गेली. शशिकला यांच्यासाठी तो एक आघातच होता. कारण सामाजिक तर सोडाच कौटुंबिक वंचितता काय असते, याची धग त्यांनी सोसलेली. हे सगळे का? कशासाठी? स्त्री म्हणून अधिकारी पदावर राहणे हे दिव्यच असते. काय करायचे? २०१३ चे ते साल होते.


यावेळी त्यांचे पती गुलाब म्हणाले
, ‘’सीता आणि द्रौपदीचा संघर्ष आपण फक्त सांगतच राहायचा का? तुझा लढा तुला दिलाच पाहिजे. तू अन्याय का सहन करायचा?” शशिकला यांनी हा खटलाही लढवला. काही काळाने या खटल्याचा निकाल लागला. शशिकला जिंकल्या आणि त्यांना न्याय मिळाला. हा काळ सांगण्यापलीकडचा. पण, हे सगळे करत असताना शशी आपले सामाजिक दायित्वही निभावत होत्या. विश्व संवाद केंद्र, सहकार क्षेत्र, प्राध्यापक संघटना, महिला संघटना यामध्ये त्यांनी कार्य सुरू केले. शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय अनुभव या निकषावर एसएनडीटी महिला विद्यापीठामध्ये त्यांची नियुक्ती ‘कुलगुरू’ म्हणून झाली. एक मोठी लढाई त्या जिंकल्या होत्या. डॉ. शशिकला म्हणतात, “कोणत्याही प्रसंगी आपला स्वत:वरचा विश्वास कायम ठेवायला हवा. परिस्थिती येते-जाते, आपण आत्मविश्वासाने ठाम उभे राहायला हवे. महिला स्वत:च शक्तीचे केंद्र आहेत.” खरेच आहे, काही चूक नसताना बायनाबाईंचे आयुष्य अखंड कष्टाच्या वणव्यात गेले. पण त्या मातेने मुलांचे विश्व बनवले. त्यांचीच सुकन्या आज लाखो मुलींचे प्रेरणास्थान आहे.

@@AUTHORINFO_V1@@