...आता दबदबा भारताचा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2019
Total Views |

rohit_1  H x W:



भारताचा सलामीवर फलंदाज रोहित शर्मा याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसर्‍या सामन्यात ६३ धावांची खेळी करत आणखी एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि जगप्रसिद्ध सलामीवीर फलंदाज सनथ जयसूर्याचा २२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढत रोहितने आणखी एक इतिहास रचला आहे. यासाठी रोहितचे कौतुक करावे तितके कमीच, म्हटले तर वावगे ठरणार नाही. सलामीवीरांतर्फे एका वर्षात तिन्ही प्रकारच्या सामन्यांत मिळून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहितने केला. रोहितने या वर्षात सर्वाधिक २,४४२ धावा केल्या. जयसूर्याने याआधी १९९७ साली २,३८७ धावा केल्या होत्या. जयसूर्याचा हा विक्रम रोहितने अखेर मोडीत काढला. या विक्रमासह रोहितने सलामीच्या फलंदाजांमध्ये भारताचा वेगळा दबदबा निर्माण केला आहे. ९० च्या दशकात श्रीलंकेविरुद्ध खेळताना अनेक संघांपुढे सनथ जयसूर्याला बाद करणे, हे मोठे आव्हान असायचे. सलामीलाच आक्रमक फलंदाजी करणारा फलंदाज म्हणून जयसूर्या जगप्रसिद्ध होता. असा आक्रमक सलामीवीर फलंदाज आपल्या संघात ठेवण्यासाठी क्रिकेटमधील सर्व संघांनी प्रयत्न केले. ऑस्ट्रेलियाने विकेटकीपर अ‍ॅडम गिलख्रिस्ट, पाकिस्तानने शाहिद आफ्रिदी, दक्षिण आफ्रिकेने हर्षेल गिब्ज, न्यूझीलंडने नॅथन अ‍ॅस्टल अशा आपल्या खेळाडूंना संधी दिली. मात्र, दीर्घकाळापर्यंत वेगाने फलंदाजी करून सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम करणे यापैकी कोण्या खेळाडूला जमले नाही. सावधपणे खेळून शतकी खेळी साकारण्यात अनेक खेळाडूंना यश आले. मात्र, जयसूर्यासारखी वेगवान खेळी सलामीच्या फलंदाजांना काही जमली नव्हती. भारतानेही वीरेंद्र सेहवागला काही काळासाठी सलामीला फलंदाजीसाठी पाठवले. वेगवान खेळी करत मोठी धावसंख्या उभारण्यात सेहवाग यशस्वी झाला. पण जयसूर्याचा विक्रम काही तो मोडू शकला नव्हता. रोहित शर्माने मात्र अखेरीस हे करून दाखवले असून जगप्रसिद्ध सलामीवीर फलंदाजांमध्ये आपला दबदबा निर्माण करण्यात मोठे यश निर्माण केले आहे. भारताविरुद्ध खेळताना अनेक संघांपुढे सलामीवीर रोहित शर्मा मोठ्या आणि विक्रमी खेळी तर साकारणार नाही ना, याचेच सर्वाधिक दडपण असते. सचिन तेंडुलकरनंतर प्रतिस्पर्ध्यांपुढे भारत हा दबदबा निर्माण करू शकला, याचे मोठे श्रेय जाते ते रोहितलाच.


गरज आत्मचिंतनाची
...

सन १९७५ सालापासून क्रिकेटविश्वात विश्वचषक स्पर्धा खेळविण्यास सुरुवात झाली. क्रिकेट विश्वातील पहिलावहिला विश्वचषक जिंकण्याचा मान मिळविला, तो वेस्ट इंडिजच्या संघाने. केवळ पहिलाच नाही तर दोन वर्षांनी पुन्हा झालेल्या १९७९ सालच्या विश्वचषकाच्या जेतेपदावरही वेस्ट इंडिजनेच आपले नाव कोरले. सलग दोन वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरणार्‍या या बलाढ्य वेस्ट इंडिजच्या संघाला नमविणे फार कठीण मानले जायचे. १९८३ साली झालेल्या विश्वचषकातही हा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. भारताने अंतिम फेरीत वेस्ट इंडिजला नमवल्याने त्यांना विश्वचषक जिंकण्याची हॅट्ट्रिक साधता आली नाही. १९८३ साली क्रिकेटला भारताच्या रूपाने नवा विश्वविजेता मिळाला. या पराभवानंतर विंडीजचा संघ ढासळण्यास सुरुवात झाली म्हटले, तर वावगे ठरणार नाही. याचे मुख्य कारण पाहिल्यास पहिले तीन विश्वचषक स्पर्धा वगळल्यास त्यानंतर झालेल्या नऊ विश्वचषकांमध्ये वेस्ट इंडिज संघाला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. या नऊ विश्वचषकांत वेस्ट इंडिज संघाला बाद फेरींचे आव्हानही मोडून काढता आलेले नाही. त्यांच्या खेळाडूंमध्ये क्षमता नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण सध्याच्या टी-२० क्रिकेटच्या युगात वेस्ट इंडिज संघातील बहुतांश खेळाडू वेगवान खेळी करण्यात आणि उंच षटकार ठोकण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आयपीएलसह इतर सर्व लीग सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना आपल्या संघात स्थान देण्यासाठी नेहमी चढाओढ पाहायला मिळते. २०१२ आणि २०१६ साली झालेल्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावण्यात वेस्ट इंडिज संघाने यश मिळवले आहे. मात्र, एकेकाळी बलाढ्य मानल्या जाणार्‍या वेस्ट इंडिज संघाला अलीकडच्या काळात अनेकदा पराभवाचा सामना करावा लागत आहे. नुकत्याच भारताविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेतही वेस्ट इंडिज संघाने चांगली लढत दिली. हा संघ जवळपास मालिका विजयाच्या उंबरठ्यावर उभा होता. भारताचा कर्णधार विराट कोहली अंतिम क्षणी बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजच्या विजयाच्या आशा बळावल्या होत्या. मात्र, तसे काही झाले नाही. याऊलट गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या शार्दुल ठाकूरने फलंदाजी करताना चांगली फटकेबाजी केली आणि वेस्ट इंडिजवर मालिका पराभवाची नामुष्की ओढवली. त्यामुळे संघाला आत्मचिंतनाची गरज आहे, हे मात्र नक्की!
 

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@