आता दर्यावरी भारत...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2019   
Total Views |


poart_1  H x W:



आजच्या आधुनिक युगात महत्त्वाची सामुग्री जसे
, खनिज तेल याची आयात समुद्रमार्गेच होत असते. त्यामुळे स्वदेशाचे किनारे सुरक्षित राखण्याबरोबरच परदेशस्थ किनारेदेखील सुरक्षित राखणे, हे संरक्षण शास्त्राच्या दृष्टिकोनातून देशाची गरज झाली आहे.



देशाच्या संरक्षणात जमीन आणि हवा जितकी महत्त्वाची आहे
, तितकाच देशाचा सागरी किनारादेखील महत्त्वाचा आहे. आजच्या आधुनिक युगात महत्त्वाची सामुग्री जसे, खनिज तेल याची आयात समुद्रमार्गेच होत असते. त्यामुळे स्वदेशाचे किनारे सुरक्षित राखण्याबरोबरच परदेशस्थ किनारेदेखील सुरक्षित राखणे, हे संरक्षण शास्त्राच्या दृष्टिकोनातून देशाची गरज झाली आहे. परदेशस्थ सागरी किनार्‍यांचा केवळ संरक्षण म्हणून उपयोग करण्याऐवजी संबंधित देशाच्या प्रगतीत त्याचे महत्त्व वाढविणेदेखील आवश्यक आहे. एवढा प्रगल्भ विचार हा केवळ ‘वसुधैव कुटुंबकम’ अशी धारणा बाळगणारा भारतच करू शकतो, याची जाणीव आता महासत्तेलादेखील झाली आहे. त्यामुळे महासत्तेमार्फत लादल्या गेलेल्या युद्धात होरपळून बाहेर आलेल्या आणि सध्या स्वप्रयत्नाने विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करू इच्छित असलेल्या अफगाणिस्तानमधील चाबहार बंदराचा विकास करण्याकरिता भारतावरील निर्बंध नुकतेच हटविण्यात आले आहेत. इराणच्या जवळ असणारे हे बंदर भारत विकसित करू इच्छित आहे. या बंदराच्या विकासामुळे अफगाणिस्तानमधील विकासकामांना गती मिळण्याबरोबरच अफगाणिस्तानची स्थिती सुधारण्यासदेखील मदत होणार आहे.



भारत
, इराण आणि अफगाणिस्तान यांच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारला जात आहे. मात्र, इराणवर महासत्तेची वक्रदृष्टी असल्याने अमेरिकेने यावर काही निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हा प्रकल्प भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांबाबतदेखील प्रश्नचिन्ह म्हणून समोर येत होता. अशा स्थितीत भारत याबाबतची आवश्यकता आणि भारताची यामागील भूमिका या प्रकल्पाबाबत महासत्तेला समजावून सांगण्यात यशस्वी झाल्याचे दिसून येते. या घटनेवरून भारताचे जागतिक पटलावर वाढलेले महत्त्व अधोरेखित होण्याबरोबरच भारताचा मानवतावादी दृष्टिकोनदेखील अभिप्रेत होत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे आता स्वदेशाव्यतिरिक्त परदेशी दर्यावरदेखील भारताने आगेकूच केली आहे, असे म्हणावेसे वाटते. चाबहार बंदराच्या विकासासाठी आम्ही निर्बंधात सवलत देत आहोत. त्यामुळे बंदराचे बांधकाम, रेल्वेमार्ग, तेल शुद्धीकरण प्रकल्प इत्यादीसाठी मार्ग प्रशस्त होणार असल्याचे ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने नुकतेच स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओे व संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांच्या उपस्थितीत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राजनाथ सिंह यांच्यात त्याबाबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत चाबहारचे अफगाणिस्तानसारख्या देशाला सावरण्याकामी महत्त्व असल्याचे त्यांनी आमच्या निदर्शनास आणून दिले असल्याचेदेखील आणि त्यामुळे या प्रकल्पाला आमचा पाठिंबा असणार असल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेतून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय पटलावरील डंका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.



भारताने अफगाणिस्तानप्रती कायमच सौहार्दतेचे धोरण अवलंबिले आहे
. त्यामुळे उद्ध्वस्त अफगाण केवळ पूर्वपदावर न येता तो विकासाच्या दिशेने पुढे जावा, हेच भारताचे कायम प्रयत्न होते व आहेत. याची जाणीव आता जागतिक नेतृत्वाला झाली असल्याचेच द्योतक म्हणजे हा निर्णय आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मध्य आशियातील देशांना आपला व्यापार करणे निश्चितच सोयीचे होणार आहे. तसेच, हिंदी महासागरातील सिस्तन व इराणच्या बलुचिस्तान प्रांताजवळ साकारण्यात येणारा हा प्रकल्प भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून संपर्कासाठीदेखील सुलभ असा आहे. त्यामुळे या मार्गाने भारताच्या व्यापारी क्षेत्रातदेखील आगेकूच करण्याची संधी भारताला प्राप्त झाली आहे. भारताने या प्रकल्पाबाबत जेव्हा आपली कार्यवाही सुरू केली, तेव्हा केवळ पाकिस्तानने चीनच्या बळावर किंबहुना चीनला गळ घालत आपल्या ग्वादार बंदराचा विकास करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्यामुळे भारत सागरीदृष्ट्या घेरला जाण्याची आणि इराणमधून भारतात येणारे तेल याच ग्वादर बंदरमार्गे येणार असल्याने त्यात भविष्यात समस्या निर्माण होण्याचीदेखील शक्यता होती. भारताने वेळीच काळाची पावले ओळखत, केवळ द्वेष आणि मत्सर यांचा भाव मनी न ठेवता विकासात्मक धोरण आखत चाबहार बंदर विकास हाती घेतला. हाच भारताचा व्यापक आणि प्रगल्भ दृष्टिकोन जगाच्या नजरेत आता आला आहे. केवळसंरक्षणाच्या नावाखाली कुरघोडी करण्यास प्राधान्य देणार्‍या देशांसाठी भारताचा हा दृष्टिकोन नक्कीच पथदर्शक आहे, असे वाटते.

@@AUTHORINFO_V1@@