'सीएए' समर्थनाचे पाऊल पडते पुढे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


मुंबई, ठाणे, पनवेलसह देशभरात नागरिकांचे मोर्चे

 

ठाणे : 'नागरिकत्व सुधारणा कायद्या'चे (सीएए) समर्थन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या कायद्याविरोधात देशभरात हिंसक आंदोलन सुरू असताना शनिवारी ठाणेकरांनी याला सडेतोड उत्तर दिले. हजारोंच्या संख्यने रॅली काढत शनिवारी ठाणेकरांनी या कायद्याचे समर्थन केले. 'सीएए तो झांकी है एनआरसी बाकी है' अशा घोषाणा देत लांबपल्याच्या लढाईसाठी आम्ही सज्ज असल्याचा निर्धार शनिवारी हजारो ठाणेकरांनी केला. ठाण्यासह मुंबई, नवी मुंबई, पनवेल आणि वसई -विरारमध्येही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मोर्चे काढत या कायद्याचे समर्थन केले. या कायद्याच्या समर्थनासाठी सर्वसमावेशक विविध जाती, धर्म, पंथाचे देशभक्त नागरिक जास्त रस्त्यावर येत असल्याचा प्रत्यय 'राष्ट्रीय मतदाता मंचा'च्यावतीने ठाण्यात रॅली व जनसभेच्या निमित्ताने पाहायला मिळाला. ठाण्यातील रंगो बापुजी चौक ते घंटाळी मैदान अशी ही रॅली काढण्यात आली. घटनाकार बाबासाहेब आंबेरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तर गडकरी रंगायतन येथील सावरकर स्मृती स्मारकाला वंदन करून हजारोच्या संख्येने ठाणेकर नागरिक या रॅलीत सहभागी झाले. 'माओवाद से आझादी', 'घुसखोरोंसे आझादी', 'देशद्रोहींसे आझादी', 'सीएए तो झांकी है एनआरसी बाकी हैं' अशा घोषणांनी रॅली परिसर दणाणून गेला. महिला, ज्येष्ठ नागरिक व तरुण या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

 

रॅलीनंतर आयोजित जनसभेत बोलतांना अ‍ॅड. सरस्वती कदम यांनी 'सीएए' कायदा काय आहे ते समजून सांगितले. 'सीएए' हा कायदा अचानक आलेला नाही. २०१६ मध्येदेखील हा लोकसभेत मांडला गेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा कायदा संविधान विरोधी आहे, असा जो अप्रचार केला जातो तो खोटा असून वंचित, दुर्बल, अत्याचारित नागरिकांच्या रक्षणासाठी असलेल्या विशेषिधारातंर्गत घटनेच्या चौकटीत राहून हा कायदा करण्यात आला असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. कदम यांनी केले. याचाच पुढचा टप्पा हा 'एनआरसी' असणार असून आता जो विरोध सुरू आहे तो 'सीएए'ला नसून 'सीएए'च्या मागून येत असलेल्या 'एनआरसी'ला असल्याचेही त्यांनी सांगीतले.

 

अभाविपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मिंलिंद मराठे यांनी आपल्या घणाघाती भाषणात 'सीएए'च्या विरोधातील आंदोलकांच्या उद्देशांची पोलखोल केली. कम्युनिस्ट, काँग्रेस, जिहादी आणि बेकायदेशीर स्थलांतरित यांच्या पायाखालची जमीन सरकली असून आपले अस्तित्व टिकविण्यासाठीची ही शेवटची धडपड ते करत असल्याचे मराठे यांनी सांगितले. हे आंदोलन नसून ठरवून केलेला हिंसाचार आहे. हा एक देशाविरोधातील गुन्हेगारी कट असल्याचा आरोपदेखील मराठे यांनी आपल्या भाषणात केला. "शाही इमाम 'सीएए'च्या समर्थनार्थ फतवा काढतात. 'कलम ३७०' लागू झाले तरी देश शांत आहे. राम मंदिराचा निर्णयदेखील देशाने संयमाने स्वीकारला. 'तिहेरी तलाक' कायदा पारित झाला, असे असताना देश पेटत कसा नाही. त्यामुळे आता मतपेटीचे राजकारण बंद होईल की काय, अशी भीती वाटत असल्याने आंदोलनातून आदळआपट सुरू आहे," असे मराठे यांनी सांगितले. ''यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी समर्थनार्थ लाखो पोस्ट सोशल मीडियावर टाका. हजारोंच्या संख्येने समर्थनासाठी रस्त्यावर या आणि हे केवळ 'सीएए'साठी नाही तर आपली लढाई 'एनआरसी'पर्यंत सुरू ठेवा," असे आवाहनदेखील मराठे यांनी यावेळी केले. माजी खासदार किरीट सोमय्या, ठाणे शहर संघचालक अरविंद जोशी, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, मुकेश मोकाशी, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी, सय्यद अन्सारी, युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मयुरेश जोशी, अ‍ॅड. गोपालन यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर उपस्थित होते. जनसभेचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार मकरंद मुळ्ये यांनी केले.

@@AUTHORINFO_V1@@