आई-वडिलांचे संस्कार आणि सासू-सासऱ्यांच्या पाठिंब्याने घडत गेले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2019
Total Views |

asf_1  H x W: 0

 


मुंबई : लहानपणीचे आई-वडिलांचे संस्कार, लग्नानंतर सासू-सासऱ्यांकडून मिळालेली आपुलकीची वागणूक आणि प्रत्येक कार्यात मिळालेला पाठिंबा, राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला विश्वास यामुळे सामान्य कार्यकर्त्यांपासून लोकसभा अध्यक्षापर्यंत प्रवास केला, अशी प्रामाणिक आणि प्रांजळ कबुली देतानाच लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांनी त्यांच्याविषयी कृतज्ञाही व्यक्त केली.

 

विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघातर्फे लोकमान्य शताब्दी सोहळ्यानिमित्त शनिवार, दि. २१ डिसेंबर रोजी सुमित्रा महाजन यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. डॉ. विद्या देवधर आणि 'साप्ताहिक विवेक'च्या संपादिका अश्विनी मयेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांचे मन नकळतपणे उलगडत गेले. दै. 'मुंबई तरुण भारत' या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. हा मुलाखतीचा कार्यक्रम होता, पण तो एक गप्पांचा कार्यक्रम झाला आणि त्याचा आपलेपणा अधिकच वाढत गेला.

 

चिपळूण, मुंबई अशा मराठी वातावरणातून इंदौरसारख्या हिंदी वातावरणात गेल्यानंतर फारच तारांबळ उडाली, पण सासू-सासऱ्यांनी समजून घेतले, प्रेमळपणाने वागविले आणि शिक्षण असो की, राष्ट्रसेविका समितीचे काम असो, त्यांनी पाठिंबा दिल्यामुळेच मी यशस्वी होत गेले, असे सांगतानाच सासूबाईबरोबर आपुलकीचे नाते ठेवा, असा प्रेमाचा सल्लाही त्यांनी दिला. संस्कारांनी स्त्रीचे व्यक्तिमत्त्व बनल्यावर तिची सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट होते. याचे दाखले देताना त्या म्हणाल्या की, "सेविकांना आणि महिला मंडळात रामायण सांगताना वक्तृत्वाला सुरुवात झाली. झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्या होळकर, जिजामाता यांच्या शौर्यगाथा सांगताना सभाधीटपणा आला. साहित्यसभेत जायला लागले. बालसंस्कार वर्गही घेतले. त्यामुळे मन सुसंस्कारित झाले आणि त्याचा पुढे राजकारणात उपयोग झाला," असे त्या म्हणाल्या.

 

महाजन पुढे म्हणाल्या की, त्यांच्या घराचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. सासरच्या मंडळींचा होजिरीचा मोठा कारखाना, यजमानांचा वकिली पेशा आणि मी स्वतः राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्ती, पण इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीमुळे मी राजकारणात नकळतपणे ओढले गेले. १९७५ च्या आणीबाणीमुळे राजकारणात नसणाऱ्यांनाही तुरुंगवास घडला. निरपराध तरुणांनाही तुरुंगात डांबले जायचे. ते सगळे सामान्य कुटुंबातले होते. त्यांचा अपराध काय, हा प्रश्न सतत भेडसावायचा. त्यांच्यासाठी धन गोळा करायचे ठरले. तुरुंगात गेलेल्यांच्या कुटुंबीयांना वाटण्यासाठी सायकलवरून त्यांच्या घरी जायचे. हळूहळू सगळी कामे करायला लागले. त्याला सासू-सासऱ्यांचा पाठिंबा मिळत गेला. १९७७ मध्ये निवडणूक जाहीर झाल्या. पण उमेदवारच तुरुंगात असल्याने चौकाचौकात भाषणे करण्याची जबाबदारी येऊन पडली. त्यानंतरचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे," असे सांगून त्या विषयाला तेथेच पूर्णविराम दिला.

 

राजकारणातील जाण आणि धडाडी पाहून इंदौर महापालिकेची निवडणूक लढविण्याची जबाबदरी आली. स्वतः राजमाता दोन दिवस प्रचाराला आल्या. आणि ती निवडणूक जिंकून इंदौरची महापौर झाले, हे राजकारणातले पहिले पदार्पण असल्याचे त्या म्हणाल्या. "इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशभारत शीख समाजाचे जे हत्याकांड झाले, त्यावेळी घाबरून स्थलांतर केलेल्यांना जेवण शिजवायला भांड्यांचा संच पुरवायला सुरुवात केली. त्यातून समाजाशी जोडले जाण्याची शिकवण मिळाली. १९८५ मध्ये विधानसभा निवडणूक लढविण्याची जबाबदारी आली आणि त्या निवडणुकीत हरले असले तरी सर्व गुणांच्या विरोधी उमेदवाराचे मताधिक्क्य घटवले, ही माझ्या पराजयातही विजयाची सुरुवात होती, याची कार्यकर्त्यांना खात्री पटली. त्यानंतर लोकसभेचे तिकीट मिळाले आणि सलग आठ वेळा निवडून आले," असे सांगतानाच त्या म्हणाल्या की, "तुम्ही कार्यकर्त्यांच्या जीवावर जिंकता. कार्यकर्त्यांना सांभाळायला शिका, म्हणजे पुढचे काम सहज सोपे होते," त्यांनी हा हल्लीच्या राजकारण्यांना मंत्र दिला.

 

लोकसभेतील अनेक आठवणी संगतांना महाजन महान म्हणाल्या की, "अटलजींच्या मंत्रिमंडळात स्त्रीपुरुष समानतेचा अनुभव आला. काम करत गेले पक्षात किंमत वाढत गेली. अटलजी-अडवाणी यांनी आपलेपणाने वागविले. लोकसभा अध्यक्ष झाल्यानंतर तर सगळ्यांनाच कौतुक वाटले. भाजप हा सामूहिक नेतृत्व मानणारा पक्ष आहे. पक्षाची जबाबदारी पूर्वी अटलजी अडवणींवर होती. आता मोदीजी-अमितजी यांच्यावर आहे. संघटना आणि सत्ता बरोबर चालते तेव्हाच मोठमोठे निर्णय घेतले जातात." हे ३७० कलम आणि नागरिकत्वाचे उदाहरण देत त्यांनी पटवून दिले.

 
@@AUTHORINFO_V1@@