विश्व हिंदू परिषद सेवा कुंभ २०१९ : अनाथांना माया देणारी मातृछाया

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0



आज कांदिवलीत 'सेवाकुंभ'

विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांताच्या सेवा विभागातर्फे रविवार, दि. २२ डिसेंबर रोजी कांदिवली येथे 'सेवाकुंभ' आयोजित करण्यात आला आहे. कांदिवली पश्चिम येथील हरियाणा भवन येथे सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत हा कार्यक्रम होईलमुंबई मराठी पत्रकार संघ येथे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत 'सेवाकुंभा'विषयी माहिती देण्यात आली. सेवा केंद्रांची संख्या वाढावी आणि प्रकल्पांना गती मिळावी यासाठी दर पाच वर्षांनी 'सेवाकुंभ' आयोजित केला जातो. ठाणे येथे २०१५ मध्ये 'सेवाकुंभ' आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व सेवा प्रकल्पांचे सेवक एकत्र येतात आणि अतिशय दुर्गम भागात सुरू असलेल्या सेवा प्रकल्पांची माहिती उपस्थितांना मिळते.

 

दि. १४ नोव्हेंबर, १९७६ साली एक बाळ जन्माला आलं. हे बाळ इतकं मोठं होईल, असं भविष्य कोणी सांगितलं होतं का? पण, हे बाळ अनेक अनाथ बाळांना बरोबर घेऊन त्यांचे अश्रू पुसत, त्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलवत आहे. या बाळाचा चेहरा म्हणजेच 'मातृछाया.' एक काळ असा होता की, पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा होता. सर्वत्र चंगळवाद बोकाळला होता. भोगवादी संस्कृतीला बळी पडलेल्या मुलांना कोणीतरी आधार देण्याची गरज होती. या अनाथ मुलांना आधार देताना, धर्मांतर केले जाते होते. हे सगळं थांबवून या अनाथ मुलांचे संगोपन-संवर्धन आणि पुनर्वसन करणं ही काळाची गरज होती. 'हे विश्वची माझे घर' या संकल्पनेवर विश्व हिंदू परिषदेच्या पाठिंब्यावर अशा अनाथ मुलांसाठीं 'मातृछाया' नावाची संस्था सुरू झाली आणि 'मातृछाये'ने या मुलांच्या संगोपन-संवर्धन आणि पुनर्वसनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि हे कार्य आज ४३ वर्षं अविरतपणे सुरु आहे. दि. १४ नोव्हेंबर, १९७६ या दिवशी सावर्डे (गोवा) या रेल्वे स्थानकावर एक मुलगा विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळाला. या अनाथ मुलाचे संगोपन करण्याचे त्यांनी ठरवले. पण, या मुलाला सांभाळणार कोण? त्याला ठेवणार कुठे? त्याच्या संगोपनाची जबाबदारी कोण घेणार? असे अनेक प्रश्न त्यांच्या पुढे उभे राहिले. त्यावेळी बांदिवडे गावातील सविता रामनाथकर यांनी त्याच्या संगोपनाची जबाबदारी उचलली. सविताताईंच्या मातृत्वाने हा अनाथ मुलगा एकदम सनाथ झाला. त्याच वेळी बांदिवड्याचे तुकाराम नाईक हे मुंबई येथे स्थायिक झाल्यामुळे त्यांनी आपले बांदिवडे येथील घर 'मातृछाये'ला दिले. हळूहळू अशा मुलांची संख्या वाढत गेली, तसतशी त्यांच्या राहण्याचीही सोय झाली. बांदिवड्याच्या एका छोट्याशा घरात सुरु झालेली ही संस्था ३१ जानेवारी, १९८२ साली ढवळी येथील स्वत:च्या जागेत स्थलांतरित झाली. येथील कामाचा पहिला टप्पा अर्भकालय. आई-वडिलांनी कुठेतरी सोडून दिलेली बाळं किंवा कधी तरी नकळत 'मातृछाये'च्या दारात आणून ठेवलेली बाळं, या बाळांच्या सर्व तपासण्या करून त्यांना 'मातृछाये'त घेऊन थाटामाटात त्यांचे बारसे केले जाते. 'मातृछाये'त त्यांना मातेचे छत्र मिळते आणि त्यांना एक घर मिळते. काही त्यांना दत्तक घेतात आणि त्यांना हक्काचे घर आणि आणि हक्काचे आई-वडील मिळतात. आतापर्यंत 'मातृछाये'ने ४००च्या वर अशी बाळं दत्तक दिलेली आहेत. सध्याही दत्तक देण्याची प्रक्रिया सरकारच्या'कारा' या संस्थेमार्फत चालते.

 

काही वर्षांपूर्वी मुलगी दत्तक घेणं ही समाजमनाला भावणारी गोष्ट नव्हती. त्यामुळे १५ ते २० वयोगटातील मुलींची संख्या जास्त आहे. या मुलींना त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली जाते. अनेक मुलींची लग्ने करून त्यांचे संसार उभारून, त्यांना हक्काचे घर, हक्काची माणसंही संस्थेने मिळवून दिली आहेत. अशा २८ मुलींची लग्न 'मातृछाये'ने केली आहेत. हा दुसरा टप्पा यालाच 'पुनर्वसन' म्हणता येईल. तिसरा टप्पा म्हणजे 'निराधार योजना.' जे पालक आर्थिकदृष्ट्या किंवा आणखी काही समस्यांमुळे आपल्या मुलींचे संगोपन करू शकत नाहीत, अशा मुलींच्या पालकत्वाची जबाबदारी 'मातृछाया'ने घेतली आहे. अशा मुली फक्त सुट्टीमध्येच घरी जाऊन येतात. लहान बाळापासून ते मोठ्या मुलींपर्यंत अशा मुली 'मातृछाये'त आहेत. या मुलींच्या संगोपनाबरोबर त्यांच्यावर चांगले संस्कारही संस्थेचे संचालक व कार्यकर्त्यांकडून केले जातात. 'मातृछाया'ला २००१ साली २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने समस्त गोमंतकात २५ ठिकाणी 'मातृछाया'ने सेवा केंद्रे सुरू केली. त्यातलेच सर्वात उपयोगी ठरलेले आणि यशस्वी झालेले 'गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल'मध्ये सुरु केलेले 'रुग्ण साहाय्यता केंद्र.' सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत 'मातृछाया'चे कार्यकर्ते रुग्णांना गरज असेल, त्याप्रमाणे सर्व प्रकारची मदत करतात. त्यानंतर २०१३ साली असेच एक रुग्णसेवा केंद्र म्हापसा येथील जिल्हा हॉस्पिटल, फोंडा येथील आय. डी. हॉस्पिटलमध्ये २०१५ साली आणि २०१७ साली मडगावच्या 'हॉस्पिसिओ' या सरकारी हॉस्पिटलमध्ये अशी आणखी रुग्णसेवा केंद्र 'मातृछाया'ने सुरू केली. सरकारी हॉस्पिटलमध्ये, बिगर सरकारी सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते रुग्णांना मदत करतात. हे फक्त गोवा या एकमेव राज्यात दिसते हे विशेष आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

 

'गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल'मध्ये काम करत असताना लक्षात आलेल्या रुग्णांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने 'मातृछाये'ने टाकलेले आणखी एक पुढचे पाऊल म्हणजे बांबोळी येथे सुरू केलेले 'रुग्णाश्रय' रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची (विशेषत: दूर अंतरावरून येणार्‍या रुग्णांची तात्पुरत्या निवासाची मोठी समस्या होती. २००५ साली 'रुग्णाश्रय' सुरू करून ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वीही झाला. २००७ साली 'रुग्णाश्रय' स्वत:च्या भव्य वास्तूत स्थलांतरित झाले. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी ३, ४, ६ व १२ कॉट्स असलेल्या सर्व सोयींनी युक्त अशा वेगवेगळ्या खोल्या आहेत. माफक दरात राहण्याची सोय केली जाते. उपाहारगृहाची सोय असल्यामुळे माफक दरात वास्तव्यास असलेल्यांची नाश्ता व जेवणाची सोय होते. 'रुग्णाश्रया'त फिजिओथेरपी केंद्रे आहेत. कायम स्वरूपी 'जयपूर फूट' बसवण्याचे (कृत्रिम पाय) केंद्रसुद्धा आहे. गरजू रुग्णांना 'वापरा व परत करा' या तत्त्वावर आर्थोवेड,वॉकर, व्हीलचेअर यासारखी वैद्यकीय उपकरणे दिली जातात. गरज असेल त्याप्रमाणे गरीब रुग्णांना औषध साहाय्यता फंडातून औषधेही आणून दिली जातात. 'रुग्णाश्रया'ची स्वत:ची रुग्णवाहिका आहे. सवलतीच्या दरात रुग्णांना नेण्या-आणण्याची व्यवस्था केली जाते. याशिवाय 'रुग्णाश्रया'त योग आणि कराटेचे वर्ग चालतात. २०१५ पासून 'रुग्णाश्रया'त 'होम नर्सिंग कोर्स'ची सुरुवात झाली. रुग्णांच्या घरी जाऊन रुग्णांची सेवा करण्याचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण या कोर्समध्ये दिले जाते. हा सहा महिन्यांचा कोर्स विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणाचा, राहाण्याचा व शिक्षणाचा खर्च 'मातृछाया' संस्थेकडून केला जातो.

 

२०१० पासून 'मातृछाये'ने मुलांसाठी तळावली येथे नवीन शाखा सुरू केली. तळावलीच्या डॉ. तळावलीकर यांनी आपली जागा व घर 'मातृछाये'ला अर्पण केले. 'बाल कल्याण आश्रम' या नावाने 'मातृछाया'ने टाकलेले पुढचे पाऊल. आज ६० निराधार मुलं तिथं राहातात. शालेय शिक्षण तर त्यांना मिळतंच. शिवाय तीन इतर शिक्षक त्यांचा अभ्यास घेण्यासाठी येतात. या व्यतिरिक्त मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा. यासाठी मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणे त्यांना अनेक गोष्टी शिकवल्या जातात. बुद्धिबळ, टेबलटेनिस, मल्लखांब यांसारख्या खेळ शिकवण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक येतात. शिवाय कार्पेट कब्बड्डीचा सराव करतात. या सर्व खेळांमध्ये 'बाल कल्याण आश्रमा'ची मुलं राज्यस्तरीय स्पर्धा पोहोचली आहेत आणि त्या मुलांना बक्षिसेही मिळाली आहेत. शिवाय दिवाळी-रक्षाबंधनसारखे सणही साजरे केले जातात. त्याशिवाय दहीहंडी सण साजरा केला जातो. हे सण साजरे केल्यामुळे मुलांना लहानपणापासून आपल्या संस्कृतीची आपोआपच ओळख होते. २०१७ मध्ये मुलीसाठी 'मातृछाये'ने आणखी एक 'बालिका कल्याण आश्रम' सुरू केला. या 'बालिका कल्याण आश्रमा'त १९ मुली, ६ वर्षे ते १८ वर्षे या वयोगटातील निवासी आहेत. विश्वस्त मंडळ देगणीदार आणि स्वतःला झोकून देऊन काम करणारे कार्येकर्ते, यांच्या अथक परिश्रमामुळे 'मातृछाया संगोपन-संवर्धन आणि पुनर्वसन' या बाबतीत एक अग्रगण्य संस्था म्हणून नावाजलेली आहे.

 

अधिक माहितीसाठी संपर्क:

शिरीष आमशेकर - ९४२११५७९२२

दिलीप देसाई - ९४२२२३९८७७

मातृछाया, गोवा : ८३२२३१२१५२

 
 

काणकोणातील आदर्श कन्या वसतिगृह

 
 

'विद्या धनं सर्व धनं प्रधानम्' या संस्कृत सुभाषिताप्रमाणे सगळ्या धनांमध्ये श्रेष्ठ असलेल्या या विद्याधनापासून समाजातील कोणताही दुर्बल घटक वंचित राहू नये म्हणून लोलये-काणकोण येथे कै. यशोदाबाई क्षीरसागर कन्या वसतिगृहाची भव्य इमारत दिमाखात उभी आहे. विश्व हिंदू परिषदेशी संलग्न असलेली 'सेवा संकल्प' ही सेवाभावी संस्था समाजातील गरीब, गरजू, निराधार मुलींसाठी हे वसतिगृह चालवित आहे. संपूर्ण लोकाश्रयावर चालणारे हे वसतिगृह आहे. २००४ साली अवघ्या चार-पाच मुलींना घेऊन सुरू केलेले वसतिगृह आता यावर्षी ५५ मुलींचे आधारस्थान झाले आहे. सुरूवातीला अगदी लहान जागेत सुरू केलेल्या या कामाने आता आपले पंख पसरले आहेत. गोपाळ आचार्य यांच्या घरात सुरू असलेल्या या वसतिगृहाला विस्तारासाठी स्वत:च्या वास्तूची गरज होती. अशावेळी मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक आणि दानशूर व्यक्ती मधुसूदन क्षीरसागर हे मदतीला धावून आले आणि १७-१८ लाख खर्च करून वसतिगृहासाठी जागा खरेदी करून दिली. विहिंपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अशोकजी सिंघल यांच्या उपस्थितीत इमारतीचा पायाभरणी समारंभ झाला आणि पुढे अनेक दात्यांच्या दानशूरपणामुळे (देश-विदेशातील) सध्याची १०० मुलींची व्यवस्था असलेली इमारत उभी राहिली. स्वतंत्र प्रशस्त हवेशीर खोल्या, खोल्यांना लागूनच प्रसाधनगृहे, स्वतंत्र वाचनालय, संगणक कक्ष, स्वयंपाकघर, भोजन कक्ष, बैठकीचे सभागृह, पाहुण्यांच्या निवासाचे कक्ष, नातेवाईकांच्या भेटीसाठी असलेले कक्ष, कार्यालय, मुलींसाठी खेळायला मैदान, अभ्यासिका, छंद/कला कक्ष इ.चा समावेश असलेल्या वसतिगृहात गेल्या गेल्या लक्ष वेधून घेणार्‍या दोन गोष्टी आहेत. यापैकी एक म्हणजे कोरीव काम केलेली अत्यंत सुबक अशी श्रीकृष्णाची मूर्ती, त्याच्या बरोबरच असणार्‍या गणपती आणि सरस्वतीच्या मूर्ती आणि दुसरी म्हणजे मुलींनी विविध स्पर्धांमध्ये विविध ठिकाणी मिळवलेली पारितोषिके. दैनंदिन शिक्षणाबरोबरच मुलींचे व्यक्तिमत्त्व सगळ्या बाजूंनी कसे विकसित होईल, याची योग्य ती काळजी समितीच्या सदस्यांकडून घेतली जाते. नाशिकच्या गीतांजली तारे (व्यवस्थापिका) या गेली तीन वर्षे अतिशय सेवाभावी वृत्तीने, तळमळीने हे वसतिगृह आपले मानून मुलींवर मायेची पाखर घालत आहेत. समाजातील अनेक मान्यवरांनी वसतिगृहाला भेटी दिल्या आहेत. तसेच अनेक संस्थांशी हातमिळवणी करून सेवा संकल्प मुलींसाठी निरनिराळे उपक्रम राबवित असते. आपली संस्कृती समजावी, यासाठी महत्त्वाचे सण साजरे केले जातात. त्याशिवाय नवरात्रातील कन्यापूजन, कोजागिरी पौर्णिमा, गोकुळाष्टमी विशेष उत्साहात साजरी केली जाते. चला तर मग, दक्षिण गोव्यातील या आदर्श वसतिगृहाला लवकरच भेट देऊया..

 
 

संपर्कासाठी नाव : डॉ. अनिता तिळवे.

अध्यक्ष, 'सेवा संकल्प' ९८२२१४२०६५

@@AUTHORINFO_V1@@