अंगाशी येणारा खेळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0

 


मुस्लिमांमध्ये गैरसमज निर्माण करून त्यांना रस्त्यावर उतरविण्याचे जे उद्योग सध्या सुरू आहेत, त्याची परिणती सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यात होणार, यात शंका नाही. रझा अकादमीच्या मोर्चाच्या निमित्ताने आपण शांततापूर्ण मोर्चा पाहिलाच होता.


 

कह दो चिंगारी का खेल बुरा होता है,

औरों के घर आग लगाने का सपना,

वह अपने ही घर मे सदा खरा होता है।

 

अटलबिहारी वाजपेयींनी ही कविता पाकिस्तानला इशारा देण्यासाठी लिहिली असली, तरी आजच्या देशातील स्थितीलाही ही कविता लागू झाल्यासारखीच वाटते. सध्या देशात जे काही सुरू आहे, सर्वात आधी त्यामागचा डाव लक्षात घेतला पाहिजे. काँग्रेस, डावे आणि समाजवादी यांनी अभूतपूर्व अशी युती केली आहे. यांच्यापैकी कुणाकडेही हातात कार्यकर्ता अथवा जनाधार नसल्याने त्यांनी मुसलमानांना हाताशी धरले आहे. रस्त्यावर उतरलेल्या मुसलमानांना "सुधारित नागरिकत्व कायद्यात असे काय आहे की, ज्यामुळे तुम्हाला रस्त्यावर उतरावे लागले?" असे विचारले असता, त्यावर ते म्हणतात की, "मुसलमानांना या देशातून बाहेर काढण्यासाठी हे सारे उद्योग केले जात आहेत." काल ऑगस्ट क्रांती मैदानावर ज्यावेळी ‘सेलिब्रिटी’ म्हणून फरहान अख्तर आला होता, त्याला एका इंग्रजी वाहिनीच्या पत्रकाराने या कायद्याबाबत विचारले, त्यावर त्याने सरळ उत्तर दिले की, "तुम्ही हा कायदा नीट अभ्यासला तर वाटते काहीतरी होणार आहे." रस्त्यावर उतरलेल्या अन्य अशिक्षित मुसलमानांचे ठीकआहे, त्यांची दिशाभूल करणे तुलनेने सोपे आहे. मात्र, स्वत:च्या घरात कला आणि विवेकाचा वारसा सांगणार्या कुटुंबातून आलेल्या कलाकाराने देशात चाललेल्या आगडोंबात तेल ओतावे, हा चमत्कार नसून एका निश्चित विचारप्रक्रियेचे ते फलित आहे. मुसलमानांना काँग्रेस, समाजवादी आणि डावे यांनी नेहमीच पद्धतशीरपणे वापरले आहे. पूर्वी ते मतांच्या पेट्यांसाठी वापरले जायचे, आता सरकारच्या विरोधात रस्त्यावर आंदोलने भडकाविण्यासाठी वापरले जात आहेत. या सगळ्या प्रकरणातला कळसाध्याय म्हणजे जामा मशिदीचा शाही इमाम यावेळी ओरडून सांगत आहे की, "या कायद्यामुळे मुस्लिमांना कोणताही धोका नाही," तरीसुद्धा रामचंद्र गुहांसारख्या मंडळींना यात अल्पसंख्याकांना देशाबाहेर काढले जाण्याचा धोका पुन्हा पुन्हा सांगण्याचा मार्ग का अवलंबित आहेत? या आंदोलनाच्या सुरुवातीलाच प्रियांका गांधी रस्त्यावर जाऊन का बसल्या होत्या? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. यातून जे सत्य बाहेर येईल, ते अत्यंत गंभीर असेल. मोदींनी मिळविलेली सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी जे काही प्रयत्न सुरू आहेत, त्यातलाच हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि यात सर्व प्रकारचे मोदीद्वेष्टे एकत्र झाले आहेत.

 

आज मुस्लीमबहुल भागातून ज्या प्रकारचे मोर्चे निघाले आणि ज्या प्रकारच्या मागण्या यातून पुढे रेटल्या गेल्या, त्या पाहाता या सगळ्या प्रकाराला हिंसक वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाप्रकारचे मुस्लिमांचे मोर्चे जेव्हा जेव्हा निघाले, तेव्हा त्यांचा काय अंत झाला ते रझा अकादमीच्या मोर्चाच्या निमित्ताने आपण पाहिले होतेच. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या सुधारणा ज्यांनी काळजीपूर्वक वाचल्या आहेत, त्यांना खरोखच प्रश्न पडला असावा की, हे नक्की काय चालले आहे आणि का चालले आहे? मुस्लिमांना पद्धतशीरपणे वापरले जात आहे आणि यासाठी वाट्टेल तो मार्ग वापरला जात आहे. दिल्लीत झालेल्या निदर्शनात निदर्शनकर्त्यांनी महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हातात घेतले होते. या दोन्ही नेत्यांचा हिंसेशी संदर्भ कसा जोडणार? ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या पुस्तकात बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांध मुसलमानांचा धोका ओळखत जे सांगितले आहे, त्याचा या आंदोलनकर्त्यांना मागमूसही नाही. ही धु्रवीकरणे देशाला घातक आहेत. महाराष्ट्रात यापूर्वीच त्याची सुरुवात झाली आहे. दोन अविचारी पक्षांच्या आधारावर सरकार चालविणार्‍या उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी सरड्यालाही लाज वाटावी, असा रंग बदलला आहे. विधानसभेत भाषण करताना ते म्हणाले की, "धर्म आणि राजकारण या दोन गोष्टींची मिसळ केल्यानेच आम्ही मागे पडलो." हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने स्वत:चा विस्तार केला. भाजपशी युती केली आणि केंद्रातील मंत्रिपदे पदरात पाडून घेतली. आता शिवसेनेला हा सगळा प्रकार चूक केल्यासारखा वाटत आहे. अशी भावना शिवसेनेला लखलाभ असो. यातून जे समोर येईल, ते उद्या सगळ्यांना पाहायला मिळणारच आहे. ‘राष्ट्रीय एकात्मते’च्या नावाखाली मुस्लिमांचे लाड करण्याचे जे प्रकार या देशात झाले, त्याचीच पुनरावृत्ती आता केली जात आहे. यातून जे निर्माण झाले, ते देशाने पन्नास वर्षांहून अधिक काळ भोगले. शिवसेना जेवढी वाकणार तेवढेच तिच्या मानगुटावर हे दोन पक्ष मजबुतीने बसणार आहे. सध्या सत्तेची नवी नवरी असलेल्या सेनेने आपल्या नव्या घरोब्याचे वाटेल तितके लाड करावे आणि कोडकौतुकही करीत राहावे. तसे न केल्यास घटस्फोटाची भीती आहेेच. मात्र, हे सारे खेळ करीत असताना या देशाचे राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व, याचा विसर पडू नये. मोदी आणि शाह यांचा द्वेष करणे सोपे आहे, मात्र हिंदुत्वासाठी जी किंमत मोजून ते इथपर्यंत आले आहेत, त्याच्या टिचभर यातनाही तुम्ही सहन करू शकत नाही. सभागृहात झालेली साधी टीकाही नव्या मुख्यमंत्र्यांना सोसत नाही. मग ते जुन्या आठवणी काढून अस्वस्थ होतात. त्यांना व त्यांच्या युवराजांना सगळे आठवते. एनडीएत प्रणव मुखर्जींना पाठिंबा, प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा व त्यांचे मराठी असण्याचे लंगडे समर्थन हे सारे त्यांना आठवत नाही. आता बाजू बदलल्याने व नवे मालक सांभाळायचे असल्याने या सगळ्या करामती होतीलच. पण, या देशाचा हिंदुत्वाचा पोत बिघडविण्याचा जो उद्योग सध्या देशभर सुरू आहे, त्याचाही विचार करा. ज्यांना रोहिंग्ये चालतात, मात्र शेजारच्या तीन देशांतून आलेले हिंदू चालत नाहीत, त्यांच्याबरोबर पाट लावल्यावर अजून काय होणार?

@@AUTHORINFO_V1@@