काहीच दिवसांपूर्वीच अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या बहुचर्चित ‘छपाक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट २००५ साली अॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित असून आता ट्रेलरनंतर या चित्रपटातील पहिले वहिले गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. अव्यक्त प्रेमाची झलक या गाण्यातून उलगडली आहे.
या चित्रपटात दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेस्सीने भूमिका साकारली आहे. दोघांचीही रोमँटिक केमेस्ट्री ‘नोक झोक’ या गाण्यात पाहायला मिळते. बिगडी हुई बात को बनाता है और रूठे हुये प्यार को मनाता है प्यार’, असे कॅप्शन देत दीपिकाने या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
‘नोक-झोक’ हे गाणे शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केले असून सिद्धार्थ महादेवनने गायले आहे. या गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू मेघना गुलजार यांनी संभाली आहे. यापूर्वी त्यांच्या ‘राजी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता ‘छपाक’ मधून लक्ष्मी अग्रवालची कथा पडद्यावर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट येत्या १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.