विश्व हिंदू परिषद सेवा कुंभ २०१९ : अहर्निशं सेवामहे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2019
Total Views |


vvh_1  H x W: 0

 


'अहर्निशं सेवामहे' या उक्तीप्रमाणे हजारो सेवाभावी बंधुभगिनी विश्व हिंदू परिषदेच्या विविध सेवा प्रकल्पांमध्ये प्रत्यक्षपणे कार्यकर्ता म्हणून योगदान देत आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आज भारतभरात विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून ९२, ८४७ प्रकल्प चालतात. त्यापैकी ६६,५२० शिक्षण, २०१४ आरोग्य, ४८२ स्वयंरोजगार आणि १,८३१ प्रकल्प सामाजिक सेवेशी जोडलेले आहेत. कोकण प्रांतात ४२७ शैक्षणिक, २१ आरोग्याचे, ८ स्वयंरोजगार आणि १४ सामाजिक सेवेचे असे एकूण ४८२ प्रकल्प आहेत. तेव्हा विश्व हिंदू परिषदेच्या होऊ घातलेल्या सेवाकुंभानिमित्ताने आज काही पथदर्शी प्रकल्पांची माहिती आपण करुन घेऊया.


वनवासी बांधवांच्या शिक्षण आणि संस्कारांची 'सावली'

 

विश्व हिंदू परिषदेद्वारा अनेक सेवा प्रकल्प विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 'सावली' ही संस्था. दि. २३ ऑक्टोबर, १९९० रोजी या संस्थेची स्थापना झाली. १९९५ पर्यंत महिलाश्रम व नंतर अनाथाश्रम म्हणून या संस्थेची नोंदणी करण्यात आली. हे आश्रम गाव सोनावळे, बदलापूर बारवी डॅम रोड, जि. ठाणे येथे १८ एकर जागेमध्ये आश्रम पसरलेले आहे. आगामी काळात या ठिकाणी इतरही नवीन प्रकल्प संकल्पित आहेत. त्यामध्ये वनौषधी, वानप्रस्थाश्रम, महिला कौशल्य विकास केंद्र, गोशाळा आदी प्रकल्पांचा विचार ही संस्था करीत आहे. हा प्रकल्प बदलापूर स्टेशनपासून ९ किमी अंतरावर असून या निसर्गरम्य ठिकाणी बालक आश्रमाचेही कार्य चालते. आत्तापर्यंत या केंद्रातून २०० मुले व मुली संस्कारित व शैक्षणिक पात्रता घेऊन आपापल्या आयुष्यात स्थिरस्थावर झाले आहेत. या आश्रमातील बरेच मुले-मुली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन नोकरी-व्यवसाय करून स्वत:च्या पायावर उभे आहेत. आश्रमातून शिक्षण घेतलेली भाग्यश्री चटके ही विद्यार्थिनी आज अमेरिकेत नोकरी करत आहे. या आश्रमातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थी इंजिनिअर, आयटीआय., एमएबीएड अशा पदव्या घेऊन आज यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत. आजूबाजूच्या गावातील दुर्बल घटकांतील, तसेच वनवासी मुलांसाठी हा आश्रम संस्कारक्षम पिढी घडवण्याचे सेवाकार्य निर्धाराने करत आहे. सध्या या आश्रमात १५ मुलगे आहेत व श्री व सौ.नारागुडे पती-पत्नी गेल्या नऊ वर्षांपासून 'व्यवस्थापक' म्हणून तेथे काम पाहत आहेत. या संस्थेला देण्यात येणाऱ्या देणग्या या 'कलम ८० जी' अन्वये करमुक्त आहेत. तेव्हा, आपणही या सेवाकार्याला हातभार लावूया.

 

अधिक माहितीसाठी संपर्क- दिनेश तहलियानी अध्यक्षः९८२०७०९३१८/९७६९४२२५७२

- रसिलाबेन शहा उपाध्यक्षा : ९८७०८३१२१३/ ७४००३७१५२९

- सावली केंद्र : नामदेव नारगुडे, व्यवस्थापक ०९०४९७४८५१४

 

शिक्षणासोबत संस्कार देणारे श्रीहरि सत्संग समिती (एकल विद्यालय)

 

'श्रीहरि सत्संग समिती' हे वनवासी क्षेत्रात कार्यरत असणारे समाजसेवी संघटन. भारतवर्षातील दुर्गम अशा डोंगराळ क्षेत्रातील वनवासी बंधूंचा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच शैक्षणिक उत्कर्ष व्हावा, हा या संघटनेचा प्रमुख उद्दिष्ट आहे. शिक्षणासोबतच या समाजाला देशाच्या विकासाच्या मुख्य धारेशी जोडणं आणि भौगोलिकदृष्ट्या दुर्गमस्थानी असलेल्या आपल्या समाजबंधूंना शहरात राहणाऱ्या संपन्न समाजघटकांशी जोडणं आणि त्याच्या माध्यमातून त्यांचे जीवन समृद्ध करण्याचा हा एक अभिनव प्रयोग आहे. आज सुमारे ८० हजार गावांमध्ये बालशिक्षा तसेच संस्कार केंद्रे चालतात, ज्या माध्यमातून संस्कार, आरोग्य, ग्रामविकास तसेच स्वाभिमान जागरण असे बहुआयामी कार्य चालते. राम मंदिर रथ योजनेच्या माध्यमातून हजारो गावांमध्ये रामायण-महाभारतातील प्रेरणादायी चलचित्रफिती दाखवून धार्मिक संस्कारांचे जागरण केले जाते. कथाकार योजनेअंतर्गत जनजातीय समाजातील बंधुभगिनींना प्रशिक्षण देऊन त्या माध्यमातून वनवासी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर धार्मिक सप्ताहांचे आयोजन केले जाते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून नगरीय क्षेत्रापासून दर असणारा दुर्लक्षित राहिलेला हा समाजघटक मूळ राष्ट्रीय विचाराच्या प्रवाहात आला आहे आणि या क्षेत्रात चालणाऱ्या अराष्ट्रीय कारस्थानांना आळा बसल्याचे अनुभवास येत आहे.

 

अधिक माहितीसाठी संपर्क: ०२२ ३२५२६२३२/२२०१३६४१

एकल विद्यालय, वनबंधु परिषद - ०२२-२४३२७९५२

मसुंदर खेतान, ग़ुड्डु सिंघ - ९३२२२७४०९३

 
 

शाश्वत जीवनमूल्यांच्या पुनर्प्रतिष्ठापनेसाठी संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान

 

नैतिक शिक्षणाच्या क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्याच्या हेतूने २००३ सालीसंस्कृति संवर्धन प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. शालेय जीवनातल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांना आपल्या महापुरुषांची ओळख व्हावी आणि त्यांच्या जीवनकार्याची प्रेरणा घेऊन ते उत्तम देशभक्त नागरिक व्हावेत, या हेतूने या प्रतिष्ठानच्या माध्यमातून नैतिक शिक्षा योजना सुरू आहे. मुंबई, नागपूर, ठाणे, जळगाव, पुणे, अकोला, बुलढाणा, सिंधुदुर्ग तसेच संभाजीनगर जिल्ह्यात खाजगी शाळांसोबतच महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही योजना सुरू आहे. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रमशः कथारूप रामायण, चरित्र रामायण, कथारूप महाभारत आणि क्रांतिगाथा अशा पुस्तकांची स्वतंत्र पुस्तके मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती अशा चार भाषांमधून तयार केली आहेत. या पुस्तकांच्या आधारे आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना कथा सांगितल्या जातात. वर्षअखेरीस परीक्षा घेतली जाते. गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार व प्रशस्तिपत्रके दिली जातात. उत्कृष्ट कार्य करणार्‍या शिक्षक, मुख्याध्यापक, शाळांचासुद्धा गौरव करण्यात येतो. सध्या या योजनेत एकूण ५५२ शाळांतून सुमारे १ लाख, २७ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी आहेत आणि या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सुमारे ३५० कार्यकर्ते, २०० शिक्षक आणि १६०० परीक्षक मंडळी आपले योगदान देत आहेत. सहभागी शिक्षकांना या योजनेचा उद्देश-माहिती नीट व्हावी, यासाठी वर्षाच्या प्रारंभी शिक्षक-मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळांचे आयोजन केले जाते. त्यानंतर वर्षभर विविध स्पर्धांचे निरनिराळ्या जिल्हा केंद्रात आयोजन होते व गुणवंत विद्यार्थांना गौरविण्यात येते. समाजजीवनात सकारात्मक जीवनविषयक दृष्टिकोन घेऊन शाश्वत जीवनमूल्यांच्या पुनर्प्रतिष्ठापनेचा एक वैशिष्ट्यपूर्ण असा हा उपक्रम दिवसेंदिवस अधिकाधिक व्यापक होत आहे.

 

अधिक माहितीसाठी संपर्क :

मोहन सालेकर - ८४२२९४६५४२

 
@@AUTHORINFO_V1@@