अविस्मरणीय सोलेगांवकर

    20-Dec-2019
Total Views |

saf_1  H x W: 0

 


नोंद असलेल्या या काही सन्मानप्राप्त कलाकृतींसह १९३० ते १९७६ अशा सुमारे पाच तपांच्या कलासाधनेत सोलेगांवकरांची कला दीर्घायु वटवृक्षाप्रमाणे बहरली. इतका मोठा धार्मिक आणि आध्यात्मिक कलासाधक, त्यांच्या समकालीन कलाकारांच्या तुलनेत प्रसिद्धीच्या झोतात आला नाही.


मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. हा मुलगा मोठा झाल्यावर उत्तम चित्रकार बनेल, हे माधवराव सोलेगांवकरांनी अचूक हेरलं. चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य ते छोट्या गोंविदला पुरवत होते. तीर्थरूप जेव्हा चित्रांचं कौतुक करताहेत, तेव्हा या चित्रकलेत निश्चित काहीतरी दडलेलं असणार, या विचारांतूनच जाणत्या वयापासून गोविंद चित्र रंगविणे करू लागला. इंदोरच्या 'ऑल इंडिया प्रवासी वंग साहित्य संमेलन व आर्ट एक्झिबिशन' मध्ये, स्थानिक चित्रकारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्राचे रौप्यपदक गोविंद सोलेगांवकरला मिळाले. त्यावेळी त्याचे वय होते अवघे १७ वर्ष. त्यांच्या या यशामुळे त्याला मुंबईच्या सर जे जे स्कूलमध्ये कलाशिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले. भोपाळजवळील सिहोर येथे १९१२ साली जन्मलेला छोटा गोविंद फक्त १८व्या वर्षी म्हणजे १९३० साली जगप्रसिद्ध अशा सर जे जे स्कूल, मुंबई येथील कला अध्ययनात प्रि. ग्लॅडस्टोन सॉलोमन यांचा आवडता विद्यार्थी बनला. अशा या बहुविध-बहुआयामी आणि बहुश्रुत अशा ज्येष्ठ-श्रेष्ठ जगप्रसिद्ध चित्रकार गोविंद माधव सोलेगांवकर (१९१२ ते १९८६) यांच्या मूळ-अस्सल आणि दुर्मीळ कलाकृतींचं प्रदर्शन दि. २० डिसेंबर, २०१९ ते ५ जानेवारी, २०२० या पंधरवड्यात नेहरू सेंटर, वरळी येथे आयोजित करण्यात आलेे आहे. नेहरू सेंटरच्या नीना रेगे यांच्या सकारात्मक प्रयत्नांचा उपक्रम म्हणजे महाराष्ट्रातील आणि भारतातील मास्टर्स चित्र व शिल्पकारांच्या मूळ कलाकृतींची प्रदर्शने भरविणे हा असतो. याच शृंखलेत, जन्मशताब्दी वर्षानंतर आठव्या वर्षात पदार्पण होत असलेल्या जी. एम. सोलेगांवकर यांच्या कलाकृती पाहण्याची पर्वणी या प्रदर्शनाच्या निमित्ताने मिळणार आहे. २०२० हे त्यांच्या जन्माचं १०८ वं वर्ष! आध्यात्मिक बैठक आणि धार्मिक वातावरणात राहिलेल्या जीएमनी त्यांच्या कलाकृतीचे विषयही महाराष्ट्रीयन आणि भारतीय सांस्कृतिकतेशी नाळ जोडलेलेच निवडले. या प्रदर्शनातील त्यांच्या कलाकृती विविध संग्राहकांकडून प्रदर्शनासाठी प्राप्त केलेल्या असून त्यांची कन्या सेवानिवृत्त प्राध्यापिका गौरी क्षीरसागर आणि त्यांचे चिरंजीव कृष्णा सोलेगांवकर यांच्या संग्रही जतन असलेल्या बव्हंंशी कलाकृती या प्रदर्शनात मांडलेल्या आहेत.

 

त्यांच्या सन्मानप्राप्त कलाकृती

 

) 'महियारी' नावाच्या त्यांच्या चित्राला मुंबईच्या टाऊन हॉल येथे भरलेल्या प्रदर्शनात लेडी ब्रेबोर्न यांच्या हस्ते पारितोषिक मिळाले. (१९३५)

 

) १९३० ते १९३२ या काळात जे. जे. स्कूलची डिप्लोमा परीक्षा पास होण्यापूर्वीच 'दधिमंथन' या त्यांच्या चित्राला 'उत्कृष्ट चित्र' म्हणून सन्मान तर प्राप्त झालाच, तथापि या चित्रमालिकांच्या 'म्युरल'ला तत्कालिक बॉम्बे गव्हर्नमेंटची सिनियर स्कॉलरशिप मिळाली. लागलीच पुढील वर्षीही 'लॉर्ड हॉर्डिंज सीनियर मोस्ट स्कॉलरशिप' देखील देण्यात आली.

 

) जेजेत शिकत असताना त्यांना विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामास दिली जाणारी दोन पारितोषिके मिळाली. २०० रुपयांचे 'वॅडिंग्टन प्राईज' आणि ६०० रुपयांचे 'मिस डॉली कसेंटजी' स्पर्धेचे पारितोषिक (१९५२, ५४)

 

) मुंबईच्या प्रदर्शनात 'प्रेमयात्रा' या प्रसिद्ध चित्रास निवडले जाऊन लंडन येथील 'इंडियन आर्ट एक्झिबिशन'ला पाठविण्यात आले. त्यांचे हे चित्र लंडनच्याच संग्रहालयात आहे.

 

) छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय (प्रिन्स ऑफ वेल्स) येथे त्यांचे 'महियारी' हे चित्र संग्राह्य चित्र म्हणून प्रदर्शित केलेले आहे.

 

) 'फ्लाईंग हाय', 'सायमल्टेनिटी', 'रिफ्लेक्टेड', 'जोग फॉल्स', 'कन्हैया', 'टॉप्स', 'अप्रोचिंग बोट', 'सर्कशीतील हत्ती' 'मासेवाली' 'नारळांची झाडांची गर्दी' 'फिडींग दे पेट्स' अशी अनेक चित्रे जगप्रसिद्ध ठरलीत.

 

) १९४८ ला 'आर्ट सोसायटी ऑफ इंडिया'ची 'पटेल ट्रॉफी' त्यांच्या 'फिडींग द पेट्स' या अजरामर चित्राला मिळाली.

 

) 'महात्मा गांधी आणि चरखा' हे चित्र जगप्रसिद्ध आहे.

 

नोंद असलेल्या या काही सन्मानप्राप्त कलाकृतींसह १९३० ते १९७६ अशा सुमारे पाच तपांच्या कलासाधनेत सोलेगांवकरांची कला दीर्घायु वटवृक्षाप्रमाणे बहरली. इतका मोठा धार्मिक आणि आध्यात्मिक कलासाधक, त्यांच्या समकालीन कलाकारांच्या तुलनेत प्रसिद्धीच्या झोतात आला नाही. त्यांची कन्या आणि सेवानिवृत्त प्राध्यापिका गौरी क्षीरसागर आणि त्यांचे चिरंजीव कृष्णा सोलेगांवकर यांना त्यांनी कलेच्या क्षेत्राला 'करिअर' म्हणून निवडू दिले नाही. 'मी या क्षेत्रात अनेक अडीअडचणींसह उभा आहे, तो स्ट्रगल माझ्या मुलांना नको,' ही त्यांची भावना होती. यावरून ध्यानी येते की, तत्कालीन कलाक्षेत्रातील परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती यांच्यामध्ये आत्ताच्या गटबाजी वा तत्सम परिस्थितीप्रमाणेच वातावरण असावे. मात्र, चित्रकार सोलेगांवकर हे बाल्यावस्थेपासून धार्मिक, सुसंस्कारित वातावरणात घडलेले असल्याने त्यांची एक आध्यात्मिक बैठक होती. त्यामुळे त्यांना होणारा त्रास वा अडचणी यावर ते सक्षमतेने मात करत होते. कदाचित यामुळेच ते प्रसिद्धीपराङ्मुख राहणे पसंत करीत असावे. असो...

 

सोलेगांवकर हे सिद्धहस्त आणि स्वयंभू कलाप्रज्ञा असलेले चित्रकार होते. म्हणूनच अनेक पारितोषिके, पुरस्कार, स्मृतिचिन्ह, मेडल्स अशा सन्मानांचे ते मानकरी ठरले. ते अवलिया वृत्तीने कलाजीवन जगले. रंग आणि आकार यातील आनंद घेण्यासाठी त्यांनी काळ-वेळ, यांच्या बंधनाला मुक्त केले होते. त्यांच्या पत्नीचा त्यांच्या सर्व कलाविषयक तसेच कुटुंबविषयक विचारांना पाठिंबा आणि सक्रिय सहकार्याचा हात असायचा. एकदा ते त्यांच्या पत्नीला अगदी सहजपणे म्हणाले, "मी युरोपला जाऊन येतो." पत्नीनेही होकार दिला. युरोपला जाणे एवढे सोपे होते का त्याकाळी? परंतु, सोलेगांवकर तब्बल दोन वर्षे युरोपात राहिले. त्यांच्या कलासाधनेचा एक भाग म्हणून तत्कालीन युरोपियन वा पाश्चात्त्य कलाकारांच्या कलाशैली व तंत्रांचा, सोलेगांवकरांच्या कलाशैलीवर प्रभाव पडला. परंतु, त्यांनी त्याकडे अभ्यास म्हणूनच पाहिले.

 

सोलेगांवकरांची चित्रशैली

 

सोलेगांवकरांनी आणि त्यांच्या चित्रकलेने युरोपियन कलारसिकांना भुरळ घातली, वेड लावलं. 'चरख्यावर बसलेले गांधी' हे चित्र जगप्रसिद्ध झालं. तो काळही 'गांधीविचारांनी' भारलेला होता. प्राप्त परिस्थिती, सुरू असलेला वर्तमान प्रसंग यांचं चपखलपणे चित्रकलेत स्वतःच्या शैलीने बंदिस्त करण्याचं दिहीमान असं कौशल्य आणि विचारांच्या बैठकीचं व्यासपीठ सोलेगांवकरांच्या चित्रांना लाभल्यामुळे ती अजरामर ठरली. त्यांनी 'इकोफ्रेंडली' रंगनिर्माण आणि रंगलेपन तंत्र विकसित केले होते. अजिंठा डोंगराजवळील ओढ्यांमध्ये व नद्यांमध्ये सापडणारे रंगीत दगड, रंगीत फुले, माती अशा नैसर्गिक घटकांपासून त्यांनी नैसर्गिक रंग बनवले होते. त्याच रंगातील त्यांची चित्रे आजही ताजीतवानी दिसतात. त्यांची व्यक्तिचित्रे आणि भित्तीचित्रे ही समतुल्य सफाईने कौशल्यपूर्ण ठरलेली असायची. रंगचित्रणे आणि रेखाचित्रणे या कलाप्रकारात त्यांनी सातत्याने अनेक प्रयोग केले. त्यामुळे भित्तीचित्रकार (Muralist) अर्थात 'म्युरल आर्टिस्ट' ही त्यांना मिळालेली ओळख क्वचितच चित्रकारांना मिळाली असेल. त्यांच्या या कलेद्वारा अनुभवायला मिळणारा भव्यतेचा प्रत्यय थक्क करणारा होता. रंगाचे विविध छटांचे सपाट (फ्लॅटटोन) आकार 'ओव्हरलॅप' म्हणजे एकावर एक लेपून निर्माण केले जाणारे आल्हाददायक सौंदर्याविष्कार, हे अजिंठा चित्रशैली आणि बाग (बाघ) शैलींचा त्यांच्यावरील प्रभाव किती होता, याची साक्ष देतात.

 

जेव्हा युरोपातून दोन वर्षांनी ते परत आले, तेव्हा एक सोलो शो करून पुढे ते व्रतस्थ जीवनाची अनुभूती घेण्यासाठी अजिंठ्याच्या कुशीत राहू लागले. अजिंठ्यासारखी चित्रे कालौघात नष्ट होण्याची भीती त्यांना वाटत होती. त्यांनी तत्कालीन सरकारकडे एक प्रस्तावही दिला होता. अजिंठा लेण्यांची प्रतिकृती करण्यासंबंधीचा तो प्रस्ताव होता. त्यानुसार खानदेशातील ज्येष्ठ चित्रकार प्रकाश तांबटकर यांनीही त्यांच्याबरोबर काम केले होते. मुंबईचे पहिले 'आधुनिक' चित्रकार म्हणून १९३२-३५च्या काळापासून सोलेगांवकरांना ओळख मिळाली होती. कारण, पारंपरिक कलाशैलींना आधुनिक तंत्र कौशल्यांमध्ये रूपांतरीत करून विविध आणि वैविध्यपूर्ण कलाचित्र निर्माण करणे, हे केवळ सव्यसाची अभिजात कलाकारच करू शकतो. तत्कालीन कलालेखन करणारे स्तंभलेखक व. र. आंबेरकर यांनी त्यांच्याविषयी लिहिताना म्हटले आहे की, "सोलेगांवकर हे केवळ जुन्या परंपरेची नक्कल करणारे चित्रकार नाहीत. त्यांच्यात ताजेपणा आहे, पण आधुनिकतेचा फसवा आव नाही. रंग आणि रेषा यांची त्यांच्या चित्रणातली जादू कल्पनारम्य, स्वप्नसृष्टीच्या पातळीवरची आहे. या अद्भुत कौशल्यामुळेच अगदी नीरस विषयदेखील सोलेगांवकरांच्या चित्रात चैतन्यपणे न्हाऊन निघतो." मला वाटतं, इतका नितळ, कलेशी तसेच कलातत्त्वांशी प्रामाणिक आणि सजग प्रयोगशील तरीही अवलिया वृत्तीचा हा कलायोगी नेहरू सेंटरमध्ये पुन्हा प्रकट झालेला आहे. त्यांच्या कलाकृतींच्या रूपाने. मग कलारसिकांना लाभणार्‍या या दर्शनाचा योग दुर्लभच!

 

- प्रा.गजानन शेपाळ