'वंद्य वंदे मातरम्'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2019   
Total Views |


asf_1  H x W: 0


भारताचे राष्ट्रीय गान 'वंदे मातरम्'चा जागर 'वंद्य वंदे मातरम्' या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिकमध्ये जानेवारी महिन्यात होणार आहे. त्या दृष्टीने 'वंदे मातरम्'चे महत्त्व, कार्यक्रमाचे स्वरूप, 'वंदे मातरम्'ला होत असलेल्या विरोधाकडे पाहण्याचा दृष्टिकोन याबाबत आयोजकांशी साधलेला संवाद लेख रूपाने...


भारतीय म्हणून 'वंदे मातरम्'चे महत्त्व आणि स्थान हे खऱ्या देशभक्तांच्या मनात अढळ आहे. हाच भाव पुन्हा जागृत करण्यासाठी ७०व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २५ जानेवारी रोजी देशभक्ती भाव जागरण हेतूने नाशिकमध्ये 'वंद्य वंदे मातरम्' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजवर सामान्यत: 'वंदे मातरम्'ची पहिली दोन कडवी गायली जात असल्याचे आपण सर्वच पाहतो. मात्र, संपूर्ण 'वंदे मातरम्' हे एकूण पाच कडव्यांचे आहे. ज्या काळात आणि परिस्थितीत 'वंदे मातरम्' लिहिले गेले, त्याचा परिणाम भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर दूरगामी व प्रेरणादायी असाच झाला. मात्र, शालेय जीवन संपल्यानंतर प्रत्येक भारतीयाचा 'वंदे मातरम्'शी संबंध तुटतो. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रज रेकॉर्डप्रमाणे ३२ हुतात्म्यांनी 'वंदे मातरम्'चा जयघोष करत हौतात्म्य पत्करले. यात नाशिकचे अनंत कान्हेरे, विनायकराव देशपांडे, कृष्णाजी कर्वे या स्वातंत्र्यसेनानींचादेखील समावेश आहे. सर्व स्त्री-पुरुष, जाती-धर्म व प्रांताच्या स्वातंत्र्यसेनानींनी 'वंदे मातरम्' म्हणत आपले प्राण राष्ट्रासाठी समर्पित केले. या सर्वांच्या मनात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग 'वंदे मातरम्'मुळे जागृत झाले होते. त्यामुळे आजच्या काळातदेखील भारताच्या भावी पिढीत राष्ट्रभाव जागृत होण्याकरिता “वंदे मातरम्” मुखोद्गत असणे आवश्यक आहे. 'वंदे मातरम्'च्या प्रेरणेने श्री अरबिंदो यांनी 'भवानी भारती' नावाचे खंडकाव्य लिहिले. 'भारतमाता मंदिर' संकल्पना मांडली. यामुळे 'वंदे मातरम्' हे निश्चितच महत्त्वाचे आहे. भारतीय स्वातंत्रलढ्यातील इतिहासाचा धागा आजच्या काळातदेखील जोडलेला आहे. मनात राष्ट्रप्रेम असेल तर देश सुरक्षित राहतो, प्रगतिपथावर जातो. या सर्वसमावेशक विचाराने 'वंद्य वंदे मातरम्' या कार्यक्रमाचे आयोजन गोदा तीरावर करण्यात आले असल्याची माहिती नववर्ष स्वागत समितीचे सचिव जयंत गायधनी यांनी दिली.

 

सांगितिक व सांस्कृतिक स्वरूपाचा हा कार्यक्रम असून संध्याकाळी ५ ते ७ असा दोन तासांचा असेल. कार्यक्रमाच्या शेवटी 'वंदे मातरम्' गायले जाणार आहे. यावेळी एकत्रित १० हजार लोक संपूर्ण 'वंदे मातरम्' मुखोद्गत करून म्हणणार आहेत. 'वंदे मातरम्' लोकांपर्यंत पोहोचावे, या भावनेने या संकल्पनेचा जन्म झाला असून केवळ राष्ट्रभाव जागृत करणे हाच यामागील उदात्त हेतू आहे, हे विशेष. नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातून गत तीन वर्षांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्यात शहरातील विविध ढोल पथकांचे एकत्रित वादन (गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी) 'सेवाकार्य' या संकल्पनेवर महारांगोळी ज्यात ७०० ते ८०० महिलांचा सक्रिय सहभाग असतो. तसेच १००० कलाकारांचा सक्रिय सहभाग असणारा 'अंतर्नाद' नावाचा नृत्य, गायन आणि वादनाचा कार्यक्रम समितीच्या माध्यमातून होत असतो. या विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतानाच 'वंद्य वंदे मातरम्'चे सूक्ष्म नियोजन सुचले. नववर्ष स्वागतयात्रेच्या माध्यमातून वर्षातून केवळ एक कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी वर्षभर कार्यक्रमांची शृंखला सादर करणे, हा उद्देश असल्याचे गायधनी यांनी सांगितले. 'वंद्य 'वंदे मातरम्'च्या माध्यमातून जिल्ह्यात पहिल्यांदाच अशाप्रकारे एकत्रित 'वंदे मातरम्' गायले जाणार आहे. याच्या नोंदणीसाठी कुटुंब हा आधार ठरविण्यात आला आहे. तसेच, व्यावसायिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्व संस्थांचादेखील यात सहभाग असणार आहे. विशेष म्हणजे यासाठी नाशिकचे कलाकार ज्ञानेश्वर कासार यांनी चाल दिली आहे. तसेच देवश्री भार्गवे, मीना निकम या गायक कलाकारांचादेखील सहभाग आहे. 'वंदे मातरम्'ची धून तयार करून समाजमाध्यमांद्वारे ती लोकांपर्यंत पोहोचविली जात आहे. ही चाल समजून घेऊन लोकांनी सराव करावयाचा आहे. यासाठी खास कराओके ट्रॅकदेखील तयार करण्यात आला आहे. तसेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून शहरात अनेक ठिकाणी प्रशिक्षण केंद्रदेखील यासाठी सुरू करण्यात येणार आहे. गोदाकाठी होणाऱ्या हा पहिल्याच कार्यक्रमासाठी आघाडीचे संगीतकार आणि गायक कौशल इनामदार व अवधूत गुप्ते हे मान्यवर म्हणून लाभणार आहेत. लोकांनी देशभक्तीचा भाव सदैव जागृत ठेवावा, त्यानुसार जीवनक्रम आखावा, पिढीजात राष्ट्रभक्ती संक्रमित व्हावी, सज्जन शक्तीचे एकत्रीकरण व्हावे हीच निरपेक्ष अपेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजकांची आहे.

 

'वंदे मातरम्' हा केवळ एक उपचार नसून ते आपले राष्ट्रीय गीत आहे. त्यामुळे त्यातील देशभक्तीपर भाव जागृत व्हावा यासाठी पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक यांच्या मनात 'वंदे मातरम्'बद्दल आस्था, प्रेम आणि त्याचे महत्त्व अधोरेखित व्हावे, यासाठी समाजातील सर्वच घटकांनी स्वप्रेरणेने कार्य करावे, हीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाकडून अपेक्षा आहे. 'वंदे मातरम्' एकसंध आणि समरस समाजासाठीचा मंत्र असून समृद्ध आणि सुरक्षित देशासाठीचे ते प्रेरणास्थान आहे. त्यामुळे 'वंदे मातरम्'ला जो विरोध होत असतो, तो केवळ राजकीय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक क्रांतिकारकांनी 'वंदे मातरम्' म्हणतच हौतात्म्य पत्करले आहे, याची जाणीव विरोधकांनी ठेवायास हवी. 'वंदे मातरम्' हे स्तवन अखंड भारतमातेच्या स्मरणाचे गीत आहे. भारतमाता अबला नाहीये, ती दशप्रहरधारिणी आहे. त्याचे चित्र 'वंदे मातरम्'मध्ये आहे, अशी भावना यावेळी 'वंद्य 'वंदे मातरम्'च्या निमिताने आयोजक व्यक्त करत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'वंद्य वंदे मातरम्'च्या रूपाने गोदाकाठी राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग जागृत होणे, हे समस्त नाशिककरांसाठी निश्चितच स्पृहणीय आणि अभिमानास्पद आहे.

 

येथे करता येणार नोंदणी

 

भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमाची नोंदणी नागरिकांना ५० रु. शुल्क भरून vandemataram.info येथे करता येणार आहे.

 

हुतात्म्यांच्या जीवनाचा सारीपाट मांडणारे प्रदर्शन

 

या निमित्ताने हुतात्म्यांच्या जीवनाचा सारीपाट मांडणारे प्रदर्शन दि. २३ ते २५ जानेवारी या काळात आयोजित करण्यात येणार आहे. यात शस्त्रास्त्रे, परमवीरचक्र विजेते सैनिक यांच्या कार्याची माहिती देण्यात येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@