जगाच्या पाठीवर पत्रकार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2019   
Total Views |


asf_1  H x W: 0


'वॉशिंग्टन पोस्ट'चे पत्रकार जमाल खशोगी यांचा तुर्कस्थानमध्ये खून झाला. या घटनेने पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. ज्या देशात युद्धजन्य परिस्थिती आहे किंवा गृहयुद्ध सुरू आहे, तिथे तर पत्रकारांना ओलीस ठेवण्याची प्रकरणे अगदी राजरोस होतात. यात प्रामुख्याने दहशतवादी संघटना गुंतलेल्या आहेत.


'रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर' या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार या वर्षी जगभरात ४९ पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू नैसर्गिक नसून या सगळ्या पत्रकारांचा खून झाला आहे. येमेन, सीरिया आणि अफगाणिस्तान येथील पत्रकारांसाठी 'भय इथले संपत नाही' असेच वातावरण कायम आहे. मात्र, लॅटिन अमेरिकेमध्येही पत्रकारांची स्थिती धोकादायकच आहे. सीरिया, इराक, युक्रेन आणि येमेन येथे ५७ पत्रकारांना ओलीस ठेवण्यात आले होते, तर चीन, इजिप्त, सौदी अरेबिया या देशांमध्ये पत्रकारांना तुरुंगात डांबण्याच्या घटना सर्वसाधारण आहेत. यावर्षी 389 पत्रकारांना विविध कारणांसाठी तुरुंगात डांबण्यात आले. अर्थात, कारण हेच असेल की, ते पत्रकार तेथील राजसत्तेच्या विरोधात लिहित असतील किंवा त्यांच्या विरोधात जनक्षोभ निर्माण करत असतील किंवा वैयक्तिक हितसंबंधांसाठी, स्वार्थासाठी काहीही खोटेनाटे प्रसिद्ध करत असतील. काय असेल ते असो, पण शेकडो पत्रकार या ना त्या कारणाने तुरुंगात डांबले गेले, हे महत्त्वाचे आहे. एकट्या चीनमध्येच एक तृतीयांश पत्रकारांना कारावासाची शिक्षा भोगावी लागत आहे.

 

'रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर' या संस्थेच्या अहवालाला निश्चित महत्त्व आहे. कारण, रूढार्थाने सत्य समाजासमोर यावे यासाठी पत्रकार काम करतात. कोणताही पूर्वग्रह न ठेवता, जे आहे, ते तसे लोकांसमोर ठेवून लोकांना सत्य परिस्थिती अवगत करून देणे हे पत्रकाराचे काम. हे सगळे करत असताना साहजिकच अनेक हितशत्रू निर्माण होतात. कारण, न्यायाची आणि सत्याची गोष्ट करताना 'न्याय' आणि 'सत्य' बहुधा एकाच्याच पारड्यात जाते. त्यामुळे दुसरा बिथरून जाणारच. बिथरलेला पत्रकारांना शत्रूच मानणार. दुसरीकडे कम्युनिस्ट विचारधारेचे समर्थन करणारे चीनसारखे राष्ट्र, कायमच जगासमोर चिरेबंदी वाड्यासारखे प्रतिमा बनवत आहे. देशांतर्गत काय चालले आहे, हे बाहेरच्या जगाला कळूच नये, उलट दडपशाही आणि एक प्रकारच्या हुकूमशाहीसमोर देशवासीयांनी मान तुकवायलाच हवी, अशीच चीनची इच्छा. पण, आता प्रसिद्धीमाध्यमांचे स्वरूपही बदलले. त्यामुळे जगभरात काहीही घडले, तरी त्याचे पडसाद जगभर उमटतात. त्यामुळे चिनी सत्तेचे रूपही जगाला दिसते. ते रूप जगाला दाखवायचे काम प्रामुख्याने पत्रकार करतात. पत्रकारांनी असे वास्तव जगासमोर आणू नये म्हणून मग पत्रकारांना तुरुंगात डांबले जाते. चीनला नुसता संशय जरी आला की, अमुक एक परदेशी पत्रकार मानवी हक्काबिक्काची भाषा करतोय, तर त्याच्या तिथला वास्तव्याचा अधिकारही नाकारला जातो. कारण स्पष्ट आहे की, चीनमध्ये काय घडतेय, हे जगाला कळू नये. पण हे वेड इतक्या थराचे आहे की, मागे तिथे एका महिला पत्रकारालाही तुरुंगात डांबण्यात आले. कारण काय तर, तिने तिच्या स्थानिक चॅनेलवर एक बातमी चालवली होती. ती बातमी होती स्वाईन फ्लूवर. चीनमध्ये स्वाईन फ्लूचा जोर वगैरे वगैरे अशी निरूपद्रवी बातमी होती. पण, या महिलेला तुरुंगात डांबण्यासाठी १४ पोलिसांची फौज उतरली. तिची चौकशी करण्यात आली. चीन सरकार जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते, असा अर्थ या बातमीचा आहे, असे म्हणत तिला गजाआड करण्यात आले.

 

असो, चीनचे हे असे तर मध्यपूर्वेच्या देशामधल्या पत्रकारांनाही बऱ्याच संकटांना तोंड द्यावे लागते. एक तर तिथल्या धर्मावर आधारित कायदे. जरा जरी शब्द इकडेतिकडे गेला तर ईशनिंदेच्या कायद्याने पत्रकारिता काय, जीवही गमवायची भीती. दुसरे म्हणजे, हे देश कायम अंतर्गत दहशतवादाच्या छायेत. त्यामुळे दहशतवाद्यांच्या क्रूर कारवायांचेही हे पत्रकार लक्ष्य बनतात. इथली राजेशाहीही अशीच विचित्र. 'वॉशिंग्टन पोस्ट'चे पत्रकार जमाल खशोगी यांचा तुर्कस्थानमध्ये खून झाला. या घटनेने पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. ज्या देशात युद्धजन्य परिस्थिती आहे किंवा गृहयुद्ध सुरू आहे, तिथे तर पत्रकारांना ओलीस ठेवण्याची प्रकरणे अगदी राजरोस होतात. यात प्रामुख्याने दहशतवादी संघटना गुंतलेल्या आहेत. कारण, पत्रकारांना ओलीस ठेवले की, त्यांना आपोआप प्रसिद्धी मिळते. लोकांमध्ये दहशत बसवण्यासाठी हा सोपा मार्ग आहे. या पार्श्वभूमीवर भारतामध्येही पत्रकारांचा खून केला जातोच. भ्रष्टाचार खणून काढला म्हणून किंवा बदनामीजनक खोटे आरोप केले म्हणून पत्रकाराचा खून झाला, अशा घटना भारतातही घडतात. काहीही असो, पण लोकशाहीचा चौथा स्तंभ इमानेइतबारे जीवित ठेवणाऱ्या पत्रकारांचा जीव अमूल्य आहे आणि त्याची जबाबदारी ही सरकारचीच आहे, हे निश्चित.

@@AUTHORINFO_V1@@