सुप्रजा भाग २२

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


asf_1  H x W: 0


बाळाच्या वाढीमध्ये त्याच्या आहाराप्रमाणे ३ टप्पे आयुर्वेदात सांगितले आहेत. क्षीराद, क्षीरान्नाद आणि अन्नाद. आजच्या लेखात सविस्तर माहिती घेऊया यापैकी क्षीराद आणि क्षीरादान्न या दोन टप्प्यांबद्दल...


बाळाच्या वाढीमध्ये त्याच्या आहाराप्रमाणे ३ टप्पे आयुर्वेदात सांगितले आहेत. क्षीराद, क्षीरान्नाद आणि अन्नाद. क्षीराद म्हणजे क्षीर (दुधावर). याच आहार घटकावर वाढणारा ज्याचा आहार केवळ क्षीर आहे, असे बाळ (हे वय ६ महिने ते १ वर्ष इतके बदलू शकते) ० ते १ वर्ष हा ढोबळमानाने सांगितला जाणारा क्षीराद काळ होय. या काळात मातेचे स्तन्य, धात्रीचे स्तन्य अथवा गाईचे दूध, बकरीचे दूध इ. दुधाचे प्रकार द्यावेत. (शक्यतो हा नियम मोडू नये) यानंतरचा काळ म्हणजे क्षीरान्नाद. हा शब्द २ शब्दांनी बनला आहे. क्षीर आणि अन्नाद. नावाप्रमाणेच यात दुधाचा समावेश आणि त्याचबरोबर अन्नाचा समावेश अपेक्षित आहे. या क्षीरान्नाद अवस्थेतील मुले १-५ वर्षे या वयोगटातील असतात. दात येऊ लागणे, कणी दिसू लागणे, पुढचे २ दात येणे इ. टप्पे पहिले वर्ष पूर्ण व्हायच्या आत पूर्ण होतात. १ ते ५ या वयात न धरता चालता येणे, बोलणे, शू व शी लागली आहे, ही संवेदना कळणे आणि सांगणे, हाताने जेवणे, बोललेलं समजणे, हळूहळू लिहिता येणे, चित्र ओळखणे, दात येणे इ. अनेक अन्य गोष्टी या लहान वयात मुलांना जमू लागतात. किंबहुना, जमावी अशी अपेक्षा. या वाढत्या वयात दुधाचीही गरज तितकीच आहे, जितकी अन्य पोषक आहाराची. पण, एक वर्षानंतर, विशेषतः रात्री झोपतेवेळेस स्तनपान अजिबात करू नये. याची कारणे खालीलप्रमाणे-

 

) रात्री तोंडात दुधाचे कण (अंश तसेच राहतात) दातांच्या मुळाशी ते राहून, दात किडण्याची प्रक्रिया सुरू होण्यास हातभार लागतो.

 

) या वयातील मुलांची शारीरिक गरज दुधाने भागत नाही. स्तन्य चोखत राहणे, हा एक चाळा होतो. यातून अपुरे पोषण मिळते आणि बाळ चिडचिड करणारे व हट्टी होते. याचबरोबर ते बारीकही होऊ लागते आणि

 

) मातेच्या शरीरात स्तन्यनिर्मितीसाठी अपुरे घटक पोहोचतात. मातेच्या शरीराची झीज होते व कंबरदुखी, केस गळणे, निस्तेज चेहरा आणि सदैव थकणे इ. लक्षणे मातेमध्ये उद्भवतात.

 

या बाबी लक्षात ठेवून स्तनपान वय वर्ष १ नंतर काटेकोरपणे बंद करावे. जसजसे दात येतील, तसतसे आहाराचे घनत्व वाढवत जावे. आधी (१ वर्षाचे असताना) थोडा घन आहार, पण शिजलेला असा द्यावा. भाताची पेज, लापशी याने सुरुवात करावी. मऊ भात, मुगाची खिचडी इ. हळूहळू सुरू करावे. नंतर वरणभात व भाज्या घालून भात असे सुरू करावे. कुठलाही पदार्थ सुरू करताना एकच धान्य एका वेळेस सुरू करावे. म्हणजे तांदूळ सुरू केल्यावर किमान एक आठवडा इतर काही नवीन अन्नपदार्थ सुरू करू नये. ते सात्म्य/र्डीळीं होतेय का, हे बघून मग अन्यधान्य त्याच्याबरोबरीने सुरू करावे. र्डीळीं होणे म्हणजे त्याचा त्रास न होणे, अन्न नीट पचणे, पोट न दुखणे, शी नेहमीसारखी आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे होणे. शीचा रंग, वास आणि Consistency बदललेली नसावी. (फेसाळ, भसरट, आमांश असलेली, दुर्गंधित इ.) नसावी. पोट फुगणे, तडस लागणे, मळमळणे, अंगावर गांधी उठणे, अंगाला कंड येणे इ. गोष्टी होत नाही ना? याकडे लक्ष द्यावे. यानंतर तांदळाबरोबर एखादी डाळ (प्रामुख्याने मुगाची) सुरू करावी. कांजी, पेज, खिमट, मऊ भात, गुरगुट्या भात इ. भाताच्या फेजेसमधून गेल्यानंतर तांदूळ आणि मुगाची डाळ हे सुरू करावे. एकत्र शिजवून भात करून भरवावा/खायला द्यावा. त्यानंतर अन्य डाळी. मग एखादी भाजी वाफवून, त्यात मिक्स करून भरवावी. मग चव बदलावी म्हणून कधी जिरं, कधी आलं, कधी लसूण (पण बेताचेच) घालावे. आहार (घन आहार) भरवताना तो ताजा व खाताना गरम (खाता येईल इतका गरम) असावा आणि त्यात आवर्जून लोणकढी तूप घालावे. यामुळे पचनास मदत होते. तुपाने जठराग्नी (पाचकाग्नि/पचनशक्ती) सुधारते, नीट राहते आणि शौचास खडा होणे टाळता येते. जसे यज्ञ, होमहवन करताना मध्ये-मध्ये थोडे तूप घातल्याने अग्नि तेवत राहतो, भडका उडत नाही, तसेच जेवणातून थोडं तूप अवश्य पोटात जायला हवे. याचबरोबर मेतकूट भातही सुरू केल्यास हरकत नाही. काही फळांचा समावेश आहारात करावा.

 

लहानपणी कफाची अवस्था असते म्हणजे ०-१६ या वयोगटात, वाढीच्या काळात कफाचे शरीरात अधिक कार्य असते. जोपर्यंत कफ हा प्राकृत (अबाधित) आहे, तोपर्यंत तो आपले कार्य अबाधित ठेवतो. पण ज्या वेळेस त्यात दुष्टी (बिघाड) उत्पन्न होतो, तेव्हा विविध कफाच्या तक्रारी सुरू होतात. असे होऊ नये म्हणून खूप गोड खाणे टाळावे. क्रीमची बिस्किटे, साखरेचे पदार्थ, कोल्ड्रिंक्स, ज्यूस, मिठाया, चॉकलेट्स देऊ नयेत. याने कफ बिघडतोच, त्याचबरोबर जंतांच्याही तक्रारी सुरू होऊ शकतात. फळांमध्येही पेरू, सिताफळ व तत्सम कफ वाढवणारी फळे टाळावीत. डाळिंब, आंबट नसल्यास संत्रे, मोसंबी, सफरचंद, वेलची केळी, पपई इ. फळे खावीत. पण फळे कधीही एकत्र (फ्रूट प्लेट) खाऊ नयेत. एका वेळेस एकच प्रकार खावा. ज्यूसपेक्षा अख्खं फळ अति गुणकारी. जी फळं सालासकट खाता येतात, ती सालीसकट खावीत. फक्त स्वच्छ धुवून घ्यावीत. सफरचंदाचे साल, ज्यावर मेण लावले जाते, ते साध्या पाण्याने धुवून निघत नाही. अशा वेळेस ३-५ मिनिटांसाठी गरम पाण्यात सफरचंद बुडवनू ठेवावे. यामुळे त्या सालीवरचे मेण वितळून पाण्यात जाते व सफरचंद खायला स्वास्थ्यकर ठरते.

 

जसे फ्रूट प्लेट खाऊ नये तसेच जेवणानंतर लगेच फळ खाऊ नये. सकाळच्या न्याहारीनंतर किंवा दुपारच्या जेवणानंतर मधल्या वेळेस जेव्हा थोडी भूक असते, अशा वेळेस फळ द्यावे. फळ देताना ते चावून खाणे अपेक्षित आहे. त्यामुळे दात आले नसतील, तर फळ लगेच सुरू करू नये. सफरचंदाचा गर चमच्याने बारीक करून तो भरवावा. तसेच केळं कुस्करून भरवावे. हळूहळू दात आल्यावर चावून खायला सुरुवात करावी. दात नाहीत म्हणून मिल्क शेक बनवून देऊ नये. दूध आणि फळ एकत्र करून खाऊ नये, असे आयुर्वेदात सांगितले आहे. याला केवळ अपवाद तो म्हणजे आंबा. आंब्याच्या रसात दूध, किंचित तूप आणि मिरी घालून खावे, असे नमूद केले आहे. आहारशास्त्राच्या काटेकोर नियमांचे पालन जर केले तर आरोग्य अबाधित राहते. लहानपणीच जर चांगल्या सवयी लावल्या तर मोठेपणी त्याचा खूप फायदा होतो. क्षीरान्नाद अवस्थेमधील विविध सवयी किती उपयोगी आणि गरजेच्या आहेत, याबद्दल सविस्तर पुढील लेखात मांडेन. आहार प्रकाराने बाल्यावस्थेतील तिसरा टप्पा म्हणजे अन्नाद अवस्था होय. यात आहाराची गरज सर्वाधिक असते (दुधापेक्षाही अधिक)आणि त्यामुळे दिवसातून १-२ वेळाच फक्त दूध प्यायले तरी पुरेसे आहे. मोठेपणी दूध जास्त पचतही नाही. त्यामुळेही विविध तक्रारी उत्पन्न होतात. ५ ते १६ या वयोगटात आहारातील सहाही चवी (गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट) तसेच सगळ्या जिन्नसांचा ऋतुमानाचा विचार करून आहारात समावेश करावा. आहाराबरोबर व्यायामाचीही सवय या वयोगटात लागणे अतिशय गरजेचे आहे. मैदानी खेळ, सांघिक खेळ खेळणे या वयाची गरज आहे. पुढील भागापासून आहार आणि आचार याचा वयोपरत्वे कसा विचार करायचा आणि प्रॅक्टिकली कशी सांगड घालायची, याबद्दल सविस्तर बघू.

 

- वैद्य कीर्ती देव

(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट

व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@