४० हजार परत पाठवल्याचा दावा खोटा : मुख्यमंत्री कार्यालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2019
Total Views |


 


मुंबई : "केंद्र सरकारकडून ४० हजार कोटींची मदत पाठवण्यात आली होती. नव्या सरकारने या निधीचा दुरुपयोग होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.", असा खळबळजनक दावा भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी शनिवारी एका कार्यक्रमादरम्यान केला. मात्र, हा दावा पूर्णतः चुकीचा असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनीही खासदार हेगडे यांचा दावा फेटाळला आहे.

 

राज्य सरकारला करण्यात आलेली मदत अशाप्रकारे पुन्हा केंद्र सरकारकडे परत करता येत नाही, केवळ व्हॉट्सअप फॉवर्ड मेसेजद्वारे खासदार हेगडे यांनी केलेले हे वक्तव्य असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. अशा प्रकारचे विधान करताना अशा संदेशांची सत्यता पडताळूनच विधान करावे, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.
 

अनंतकुमार हेगडे नेमके काय म्हणाले

देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीबद्दल अनंतकुमार हेगडे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यांनी ८० तासांचा हा खेळ केंद्रकडून देण्यात आलेल्या निधीची व्यवस्था करण्यासाठी केला. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर या निधीत भ्रष्टाचार झाला असता त्यामुळे त्यांनी हा निधी पुन्हा केंद्रकडे पाठवून दिला.", असे विधान खासदार हेगडे यांनी केल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली होती.

 

महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी : राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणी टीका केली. अनंतकुमार हेगडे यांच्या विधानाचा हवाला देत महाराष्ट्रासोबत ही गद्दारी केल्याची टीका राऊत यांनी केली आहे.


मदत पुन्हा केंद्राला पाठवता येत नाही
: नवाब मलिक

खासदार अनंत कुमार हेगडे यांनी दिलेल्या प्रतिक्रीयेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक म्हणाले की, "केंद्राकडे कुठलाही निधी पुन्हा पाठवण्यात आलेला नाही, केंद्राला मदत पुन्हा पाठवता येत नाही. तसे झाले तर केंद्राला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तसा कोणताही प्रकार घडला नाही."



@@AUTHORINFO_V1@@