'विद्या विकासा'चे वटवृक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2019
Total Views |
Pga _1  H x W:

 

विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांतातर्फे दि. २२ डिसेंबर रोजी मुंबईत 'सेवाकुंभ'चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आजपासून पुढील चार दिवस विहिंपने उभारलेल्या, मदतीचा हात देऊ केलेल्या अशाच काही महत्त्वाच्या सेवाप्रकल्पांचा आपण आढावा घेणार आहोत. आज जाणून घेऊया नेरळच्या 'विद्या विकास मंदिर' या शाळेबद्दल...

 


नेरळ हे माथेरानच्या पायथ्याशी वसलेले एक गाव. तिथेच निसर्गाच्या सान्निध्यात 'विद्या विकास मंदिर' ही प्रशाला आहे. १९८५ मध्ये 'विद्या विकास मंदिर' या शाळेची स्थापना करण्यात आली. केवळ २५ विद्यार्थीसंख्येने सुरू झालेल्या या शाळेत, आज बालवाडी ते इयत्ता दहावीचे वर्ग असून १३०० च्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच येथे इयत्ता पहिली ते दहावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर संस्थेने इंग्रजी माध्यमाची शाळादेखील सुरू केली आहे.

 

सुरुवातीला भाड्याच्या जागेत, गावातील मंदिरात भरणार्‍या या शाळेला विश्व हिंदू परिषदेने मदतीचा हात दिला.वा. श. फडके यांनी आपली जागा विश्व हिंदू परिषदेला शैक्षणिक कार्यासाठी देणगी म्हणून दिली. विश्व हिंदू परिषदेने ही जागा 'विद्या विकास मंडळा'स दिली. आज या जागेत शाळेची टुमदार इमारत उभी आहे. उत्तम, प्रेमळ, मनमिळावू शिक्षकांनी पहिल्याच वर्षी सर्व नेरळ गावाचे लक्ष वेधून घेतले. धोंगडेबाई, काळेबाई आणि बागुलमामी यांनी तनमन वेचून निश्चयाचे खतपाणी या विद्या विकास मंदिराच्या रोपट्यास घातले. 'निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ' या संत वाक्याप्रमाणे अनेकांचा मदतीचा हात मिळाला. 'विद्या विकास मंडळा'च्या सर्व पदाधिकार्‍यांच्या अथक परिश्रमातून इमारतीचा पाया रचला गेला. १९८९ साली शाळेला शासकीय मान्यता मिळाली आणि २००५ साली संस्थेच्या माध्यमिक विभागाचा म्हणजे आठवीचा वर्ग सुरू झाला. नैसर्गिक वाढीने सन २००७ साली दहावीचा वर्ग सुरू झाला आणि शाळेचा निकाल १०० टक्के लागला. कु. अमर प्रमोद पाटील हा विद्यार्थी कर्जत तालुक्यात पहिला आला.

 

बीज अंकुरे-अंकुरे

ओल्या मातीच्या कुशीत,

तसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात

बीजा हवी निगराणी,

हवी मायेची पाखर

स्वच्छ प्रकाश निर्मळ

आणि चांदणे शीतल

 

अशा प्रकारे निगराणी करून वाढविलेले हे 'विद्या विकास'च्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.ग्रामस्थ, पालक यांचे शाळेवर नितांत प्रेम असल्यामुळे त्यांच्या सहकार्यातून या वास्तूचा विकासही होत आहे. संस्थेचे आजी-माजी पदाधिकारीही शाळेसाठी झटत असतात. विद्यादानाचे कार्य हे प्रत्येक शाळेतला शिक्षक करतोच परंतु, अत्यंत तळमळीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सदैव उपक्रमशील असलेला आमचा शिक्षक नक्कीच महत्त्वाचा घटक आहे. शाळेतील शिक्षक हे उच्चशिक्षित आहेत. अनेक शिक्षकांना 'तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार' मिळाला आहे. लिपिक हा शाळेचा आत्मा आहे. सेवकवर्गही अतिशय मेहनती व कष्टाळू आहे. या सर्वांच्या सहकार्याने शाळावाढीस नक्कीच मदत झाली.

 

बालवाडीत विद्यार्थ्यांवर संस्कार होण्यासाठी पाठांतर घेतले जाते. बौद्धिक खेळ घेतले जातात. एकात्मतेसाठी विविध सण साजरे केले जातात. सध्याचे युग हे स्पर्धेचे असल्यामुळे इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजीवर प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी छोटे उतारे इंग्रजीतून पाठांतरासाठी दिले जातात. प्राथमिक, माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सांस्कृतिक, बौद्धिक क्रीडाविषयक असे विविध उपक्रम शाळेत राबवले जातात. वक्तृत्व, कथाकथन, हस्ताक्षर, स्मरणशक्ती, चित्रकला, पाठांतर अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते. विविध क्रीडास्पर्धा, कवायती खेळ, सूर्यनमस्कार, साधन कवायती यांची प्रात्यक्षिके क्रीडामहोत्सवात साजरी केली जातात. शिष्यवृत्ती परीक्षा, टि.म.वि. गणित, संस्कृत, इंग्रजी परीक्षांना विद्यार्थ्यांना बसविले जाते. त्यातून अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत विद्यार्थी सहभागी होतात व प्राविण्य मिळवितात.

 

शाळेत संस्कारवर्ग घेतले जातात. गणपती अथर्वशीर्ष, रामरक्षा इ. स्तोत्रे विद्यार्थी उत्तम म्हणतात. शाळेतील विद्यार्थ्यांवर उत्तमोत्तम संस्कार तर कले जातातच, पण सामाजिक बांधिलकी म्हणून आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी संस्कारवर्ग घेण्यासाठीही शिक्षक जातात. शाळेत सुसज्ज वाचनालयाची सोय आहे. वाचनालयामध्ये विद्यार्थी अभ्यासक्रमातील पुस्तकांबरोबरच अवांतर पुस्तकेदेखील वाचतात. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडते. कल्पनाशक्ती वाढते तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावतो. विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थी प्रयोगशील बनावेत यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे. प्रयोगशाळेत विद्यार्थी स्वत: प्रयोग करतात. त्यामुळे ती अधिक प्रयोगशील होण्यास मदत झाली आहे. 'ई-लर्निंग'द्वारेही विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. शाळेत इंटरनेट सुविधेसह सुसज्ज संगणक कक्ष आहे. दरवर्षी शाळेचा इ. दहावीचा निकाल १०० टक्के लागतो.

 

खा. बाळासाहेब आपटे यांच्या खासदार निधीतून संस्थेला वर्गखोल्या बांधण्यास आर्थिक सहकार्य मिळाले आहे. 'ग्लोबअप कंपनी' व 'सेवा सहयोग फाऊंडेशन' यांनी सुसज्ज भौतिकशास्त्राची प्रयोगशाळा संस्थेला तयार करून दिली आहे. सुधाताई कामतेकर यांनी संगणक कक्षासाठी संगणक देणगी म्हणून दिले आहेत. आज या प्रकल्पाच्या छोट्या रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात झाले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा वाढता ओघ लक्षात घेऊन संस्थेने आणखी एक नवीन इमारत बांधण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पपूर्तीसाठी आपल्या आर्थिक सहकार्याची आवश्यकता आहे. तरी आपण आम्हास भरघोस आर्थिक सहकार्य करून हे बांधकाम पूर्णत्वास नेण्यास मदत करावी, ही नम्र विनंती.

- शशिकांत करंदीकर

९३२२४४२७६७, ९०२९५९१४००

अधिक माहितीसाठी संपर्क:

विद्या विकास मंडळ, ब्राह्मण आळी, नेरळ. ता. कर्जत, जि. रायगड

दूरध्वनी क्रमांक- ०२१४८- २३७०२४

@@AUTHORINFO_V1@@