लाचारांचे इमान सोनियाचरणी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0

 

 

आपल्या विचार-वारशाशी बेइमान झालेल्या उद्धव ठाकरेंना आपले इमान नेमके कोणापुढे गहाण टाकलेले आहे, हे दाखविण्याची खुमखुमी वेळोवेळी येत असते. त्याचीच प्रचिती त्यांनी गेल्या काही काळापासून ते कालपर्यंत करून देत आपण गांधी घराण्याच्या कृपाकटाक्षासाठी लाचार झालेले क्रमांक एकचे गुलाम असल्याचे सिद्ध केले.


जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या हिंसाचारावर राजकारणाची पोळी भाजण्यासाठी देशातील 'टुकडे-टुकडे गँग' उड्या मारत असतानाच त्यात शिवसेनेचीही भर पडली. एरव्ही स्वतःला हिंदुत्व आणि राष्ट्रवादाच्या शाळेचे हेडमास्तर समजणाऱ्या शिवसेनेने या प्रकरणावर नेमकी वरील दोन्ही तत्त्वांशी द्रोह करणारी भूमिका घेतली. शिवसेनेच्या वागणुकीतील हा बदल अर्थातच सत्तेसाठी ज्यांच्या पायाशी लोळण घेतली, त्या दिल्लीच्या नव्या 'मातोश्रीं'ना खुश करण्यासाठीच आहे. म्हणूनच आपल्या विचार-वारशाशी बेइमान झालेल्या उद्धव ठाकरेंना आपले इमान नेमके कोणापुढे गहाण टाकलेले आहे, हे दाखविण्याची खुमखुमी वेळोवेळी येत असते. त्याचीच प्रचिती त्यांनी गेल्या काही काळापासून ते कालपर्यंत करून देत आपण गांधी घराण्याच्या कृपाकटाक्षासाठी लाचार झालेले क्रमांक एकचे गुलाम असल्याचे सिद्ध केले. आजपासून १०० वर्षांपूर्वी तिरंग्यासाठी छातीवर ब्रिटिशांच्या गोळ्या झेलणाऱ्या वीर हुतात्म्यांशी शिवसेना पक्षप्रमुखांनी तिरंग्याच्या जीवावर उठलेल्या देशविरोधी वळवळ्यांची तुलना केली. जालियनवाला बागेत ब्रिटिशांच्या जुलूमशाहीविरोधात एकवटलेल्या भारतमातेच्या सुपुत्रांच्या अपमानाचा विडा उचललेल्या उद्धव ठाकरेंनी देशविघातक शक्तींची वकिली सुरू केली. "युवकांचे आंदोलन चिरडून देशात पुन्हा एकदा जालियनवाला बाग घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे," असे ते म्हणाले आणि त्याला त्यांच्या पुढेमागे फिरणाऱ्या झिलकऱ्यांनी 'तोफ' वगैरे म्हटले. मात्र, मुस्लीम घुसखोरांचा कैवार घेणाऱ्या उद्धव ठाकरेंनी विध्वंसक, हिंसक आणि देशतोडू घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देत, त्यांना जालियनवाला बागेतील क्रांतिकारकांसम ठरवत सरकारवर तोफ वगैरे डागलेली नाही, तर उडता तीर अंगावर घेतला आहे आणि हा तीरच त्यांच्या स्वार्थलोलुप, सत्तापिपासू राजकारणाचा खुर्दा उडवेल. कारण, देशाचे तर सोडा, महाराष्ट्राच्याच मातीला मातृभूमीशी गद्दारी केलेली चालत नाही, पटत नाही आणि तसा कोणी उर्मट-उद्धट निपजलाच तर हा सह्याद्री पेटून उठल्याशिवाय राहत नाही.

 

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी भारत विखंडन शक्तींना पाठिंबा देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. तत्पूर्वी त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशद्रोही घोषणाबाजी करणाऱ्यांच्या-कन्हैय्या कुमार वगैरेंच्या तसेच बांगलादेशी घुसखोरांकरिता पायघड्या घालणाऱ्या ममता बॅनर्जींच्या समर्थनाचे वा त्यांच्या भेटीगाठी घेण्याचे उद्योग केलेच होते. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना खिशात राजीनाम्याचे भेंडोळे कोंबून भाजपसारख्या राष्ट्रवादी शक्तीबरोबर राज्यातल्या सरकारात भागीदार होती. आता मात्र, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापायी भाजपची साथ सोडली व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची संगत धरली. तीन भिन्न विचारांचे पक्ष सत्तेवर आले व त्याचवेळी शिवसेना भगवी शाल फेकून देऊन सेक्युलर उपरणे गळ्यात बांधेल, हे नक्की झाले. तेव्हा सेनाकार्यकर्त्यांनी मात्र, फुशारक्या मारत 'आम्हीच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला हिंदुत्ववादी करू' छापाच्या वल्गनाही केल्या. परंतु, आज उद्धव ठाकरेंनी जालियनवाला बागेतील देशभक्तांचे हौतात्म्य पायदळी तुडवत आपली व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची जातकुळी तोडीसतोड झाल्याचे जाहीर केले. सत्तेसाठी सोनिया गांधी आणि शरद पवारांचे आश्रित झालेल्यांच्या तोंडातून याहून निराळे शब्द बाहेर पडू शकतही नाही म्हणा. कारण, तसे काही करण्याची हिंमत दाखवलीच तर झोळीतल्या सत्तापदांची किंमत मोजावी लागेल, जे उद्धव ठाकरेंसारख्या लाचार सेनाध्यक्षाला परवडणारे नाही. त्यापेक्षा होऊ द्या राष्ट्रभक्तांचा अपमान, तळमळू द्या त्यांचे आत्मे, गाळू द्या अश्रू भारतमातेच्या नेत्रांना, दुखवू द्या देशप्रेमींच्या भावना आणि श्रद्धा! हे सर्वांत सोपे काम आणि तेच उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधी, राहुल गांधी व शरद पवारांना रुचेलशी भाषा वापरत करून दाखवले. मात्र, यातून सत्तेसाठी गांधी घराण्याची लाचारी पत्करलेल्या उद्धव ठाकरेंनी अकलेची दिवाळखोरी मांडत जनाची नाही, तर मनाचीदेखील लाज विकून टाकल्याचेच स्पष्ट होते. म्हणूनच इथून पुढे अशा व्यक्तीने स्वतःला आणि स्वतःच्या पक्षालाही हिंदुत्वाचा वा राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे सांगू नये. तथापि, त्यांनी जरी तसे सांगितले तरीही त्यांची ही बनवेगिरी फार काळ काही चालणार नाही, हे लक्षात ठेवावे.

 

केवळ बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांसाठी गळे काढणाऱ्या व हिंदूंना अन्य देशांत दैन्यावस्थेत खितपत ठेऊ इच्छिणाऱ्या ठिकठिकाणच्या विद्यापीठातील हिंसक प्रवृत्तींना आपले अशील केलेल्या शिवसेनेने याआधी नागरिकत्व विधेयकावरूनही दुटप्पीपणा केला होताच. लोकसभेतील शिवसेनेच्या अडाणी खासदारांनी विधेयकाचा मसुदा न वाचता, न समजून घेता त्याला पाठिंबा दिला तर राज्यसभेतून मतदानावेळी काहीतरी बरळून पळ काढला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील अपमानास्पद वक्तव्यावर आपले तोंड उघडले व ते भाजपद्वेषाच्या गुळण्या करू लागले. इथे त्यांनी आपल्या बालिश बुद्धीची कमाल दाखवत नागरिकत्व विधेयकच सावरकरांच्या विचारांच्या विरोधात असल्याचे ठोकून दिले. राहुल गांधींविषयी चकार शब्द न काढणाऱ्या उद्धव ठाकरेंनी असे करणे अपेक्षितच होते. कारण, सेक्युलॅरिझमचा झेंडा खांद्यावर घेतला की, हिंदुहताचा, हिंदुत्वाचा विचार लाथाडून देणे व मुस्लिमानुनयाचे पाठीराखे होणे, हे क्रमप्राप्तच. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील अन्याय-अत्याचारग्रस्त हिंदूंना आणि अन्य अल्पसंख्याकांना भारतात आश्रय देणारा खरेतर हा कायदा. पण, स्वतःला 'सावरकरानुयायी' म्हणवणाऱ्यांनीच त्यांच्या "तुम्ही आम्हीं सकल हिंदू, बंधू बंधू... तो महादेवजी पिता आपुला चला तयां वंदु..." या मंत्राला हरताळ फासत नागरिकत्व कायद्याला विरोध केला. जामिया मिलिया इस्लामियातील विद्यार्थ्यांचा उपद्रव व हिंसाचार हा सावरकरांच्याच विचारांशी प्रतारणा करणारा प्रकार आणि त्याच विद्यार्थ्यांचा उमाळा उद्धव ठाकरेंना आला व त्यांना ते सगळेच विद्यार्थी क्रांतिकारक वाटू लागले. परंतु, उद्धव ठाकरेंनी त्यांना कितीही क्रांतिकारक ठरविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेल्या निकालाचा नक्कीच अभ्यास करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करण्याचा अनुभव नसेल तर त्यांनी आपल्या सल्लागारांकडून त्याची माहिती करून घ्यावी. म्हणजे आपण नेमके कोणते बेताल बोल बाहेर काढले, हे शिवसेना पक्षप्रमुखांना समजेल. तसेच ज्यांनी दिलेल्या सत्तादानावर उद्धव ठाकरे सरकार चालविण्याचे स्वप्न पाहत आहेत, तेदेखील हिंदूद्रोह केल्याने कसे रसातळाला गेले, हेही त्यांनी समजून घ्यावे; अन्यथा आज गांधी घराण्याची लाचारी वंद्य मानून खुर्चीवर बसल्याने आलेली गुर्मी उतरायला फार वेळ लागणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@